आणखी 275 एसटीत वाय- फाय सेवा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

पुणे - एसटी गाड्यांमध्ये बसविण्यात आलेल्या वाय-फाय सेवेला वाढता प्रतिसाद बघून, एसटी महामंडळाने आणखी 275 गाड्यांमध्ये ही सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या पंधरा दिवसांत प्रवाशांनी एक लाख साठ मिनिटे या सुविधांचा वापर केला असल्याचे समोर आले आहे. त्यावरून महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. 

पुणे - एसटी गाड्यांमध्ये बसविण्यात आलेल्या वाय-फाय सेवेला वाढता प्रतिसाद बघून, एसटी महामंडळाने आणखी 275 गाड्यांमध्ये ही सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या पंधरा दिवसांत प्रवाशांनी एक लाख साठ मिनिटे या सुविधांचा वापर केला असल्याचे समोर आले आहे. त्यावरून महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. 

एसटी महामंडळाने ऑगस्टपासून स्वारगेट व शिवाजीनगर आगारातील "हिरकणी' आणि "परिवर्तन' या प्रकारातील पन्नास गाड्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर वाय-फाय सेवा देण्यास सुरवात केली. या सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आणखी 275 गाड्यांमध्ये ही सेवा देण्यास सुरवात केली आहे. हिरकणी, परिवर्तन पाठोपाठ आता शिवनेरी आणि शीतल या प्रकारच्या बसमध्येही वायफाय सुविधा देण्यात आली आहे. 
खासगी प्रवासी वाहतूकदारांशी स्पर्धा करण्यासाठी एसटीमध्येही आधुनिक सोयीसुविधा देण्यास सुरवात करण्यात आली. त्यामध्ये पूश बॅक सीटपासून वायफायचा समावेश करण्यात आला. एसटीने यंत्र मीडिया सोल्यूशन या कंपनीशी करार करून, त्यांच्याद्वारे गाड्यांमध्ये वायफाय हॉटस्पॉट बसविण्यात आले आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये 50 गाड्यांतील प्रवाशांनी 1 लाख 60 मिनिटे इंटरनेटचा वापर केला आहे, अशी माहिती यंत्र मीडिया सोल्यूशनच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

आतापर्यंत एसटीच्या गाड्यांमध्ये वायफाय हॉटस्पॉट बसविण्यात आले आहे. हॉटस्पॉटची कार्यपद्धती आणि त्याचा वापर याची पाहणी नोव्हेंबर अखेरपर्यंत केली जाणार आहे. गाडीतील शेवटच्या रांगेतील सीटवर बसणाऱ्या प्रवाशांना वायफायची रेंज मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारी डिसेंबरअखेरपर्यंत सोडविण्यात येणार आहे. या सेवेची पडताळणी झाल्यानंतर पुढील वर्षीच्या डिसेंबरपर्यंत एसटी महामंडळाच्या 18,994 गाड्यांमध्ये वायफाय हॉटस्पॉट यंत्रणा बसविण्याचे महामंडळाचे उद्दिष्ट आहे, असेही यंत्र मीडियाच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

Web Title: Wi-Fi service in 275 st bus