महाराष्ट्रातील पहिलं मोफत वायफाय सुविधा देणारं ‘हे’ गाव गेल्या वर्षभरापासून झालं डिसकनेक्ट...

सुस्मिता वडतिले
Wednesday, 24 June 2020

सरकारने मोठा गाजावाजा करत महाराष्ट्रातील पहिले वायफाय सुविधा देणा-या गावाचं कौतुक केलं खरं पण या सुविधेचा लाभ नव्याचे नऊ दिवसाप्रमाणे जेमतेम तीन-चार वर्षच सुरु राहिलं. २०१९ पासून पाचगावांमधील वायफायची सुविधाच बंद पडलेली पाहावयास मिळत आहे.

आजकाल अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच आणखी एक गरज निर्माण झाली आहे ती म्हणजे वायफाय. मंडळी, या इंटरनेटशिवाय लहानांपासून ते मोठ्यापर्यंत अनेकांच पानही हालत नाही. इंटरनेट नसेल तर जणू काही विश्वच नाही अशी स्थिती झाली आहे. अशीच वायफाय सुविधा महाराष्ट्रात २०१५ ला पहिल्यांदा सुरु करण्यात आली. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात फ्री वायफाय आणि ई-लायब्ररी सेवा देणारे देशातील पहिले गाव म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत दत्तक घेतलेले नागपूर जिल्ह्यातील ‘पाचगाव’ हे नावारूपास आले होते.

सरकारने मोठा गाजावाजा करत महाराष्ट्रातील पहिले वायफाय सुविधा देणा-या गावाचं कौतुक केलं खरं पण या सुविधेचा लाभ नव्याचे नऊ दिवसाप्रमाणे जेमतेम तीन-चार वर्षच सुरु राहिलं. २०१९ पासून पाचगावांमधील वायफायची सुविधाच बंद पडलेली पाहावयास मिळत आहे. पाचगावातील वायफाय सुविधेवर लाखोंनी रुपये खर्च करुनही वायफायसेवा बंदच पडली आहे. त्यानंतर सुविधा बंद पडल्यापासून कोणीही दखल घेतली नसल्याचे पाचगावमधील नागरिकांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत गडकरी यांनी पाचगावची निवड केल्यानंतर अनेक विकासकामे केली. अशी सेवा देणारे पाचगाव हे देशातील पहिले गाव ठरले आहे. परंतु आता कसल्याहीप्रकारची वायफाय सुविधा या गावात सुरु राहिलेली नाही. वायफाय सुविधा उपलब्ध करुन दिली खरी परंतु हि सेवा बंद पडल्याने गावकरी नाराज झाले आहे.

इंटरनेटमुळे आज अनेक गोष्टी सहज आणि सोप्या झाल्या आहेत. आजकाल कॉलेज कट्टा, ठराविक काही चौक, लायब्ररी, हॉटेल्स, बसस्थानक, रेल्वे स्टेशन या भागात वायफाय असतोच. सर्वत्र यू-ट्यूबच्या माध्यमातून अनेकांची कला आणि कामे जगभर पोहोचवत आहे. मोबाइलचा वापर कमालीचा वाढला आहे. इंटरनेटची सुविधा विशेषकरून ‘वायफाय’च्या माध्यमातून मिळत आहे. 

जर आपण एखाद्या बाहेरच्या परिसरात गेलो आणि फ्री वायफाय मिळालं तर अगदी आपली ‘सोने पे सुहागा’ अशी स्थिती होऊन जाते. कारण मोबाईल डेटापेक्षा वायफायचा स्पीड चांगला असतो असे अनेकांचे बोल आहेत. हल्ली सार्वजनिक ठिकाणी  ‘फ्री वायफाय’ असे बोर्ड लावलेले आपल्याला दिसतात. पाचगावातील गावक-यांना वायफाय सुविधा मनोरंजन तसेच माहिती मिळविण्यासाठी सोयीची झाली होती. परंतु आता सरकारची ही सेवा गेली कुठे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

वाय-फाय प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनले आहे. घरी तसेच व्यवसायाकरीता, खरेदी करण्यासाठी, बँकांचे ऑनलाईन कामे करण्याकरिता, लोकांसोबत जोडून राहण्याकरिता तसेच आयुष्याचा समतोल राखण्याकरिता इंटरनेटचा वापर करणारे विशेषतः महिला वाय-फाय डिव्हाइसेसवर अवलंबून असतात. वायफाय कनेक्ट केल्यानंतर संगणक, लॅपटॉप किंवा स्मार्टफोनला कनेक्ट करू शकतात.

वाय-फायमुळे इंटरनेट फक्त घरात, ऑफिसमध्ये म्हणजेच ज्या ठिकाणी वाय फायचे राऊटर बसवलेले आहे त्याच ठिकाणी वापरता येते. महाराष्ट्रातल्या पहिले मोफत वायफाय सुविधा देणा-या नागपूर जिल्ह्यातील पाचगावातील सुविधेचा बोजवारा उडालेला दिसून येत आहे. 

यावेळी या विषयावर बोलताना पाचगावमधील सरपंच उषा ठाकरे म्हणाल्या की, महाराष्ट्रातील पहिले वायफाय सुविधा देणारे नागपूर जिल्ह्यातील ‘पाचगाव’ हे सुरु होवून चार-पाच वर्ष झाली आहे. परंतु २०१९ पासून पाचगावांमधील वायफायची सुविधा बंद पडली आहे. वायफायची सुविधा बंद पडली तेव्हापासून अद्यापही पुन्हा वायफाय सुविधा सुरुवात केलीच नाही. सरकारने या सुविधेसंदर्भात कसलीही दखल घेतली नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WiFi facility in Pachgaon closed