राज्यात १८ नवी संवर्धन राखीव क्षेत्रे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

wildlife Conservation 18 new land reserves in the state

राज्यात १८ नवी संवर्धन राखीव क्षेत्रे

मुंबई : वन्यजीवांच्या संवर्धनासाठी राज्यात १८ नवी आणि सात प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यता दिली. त्यामुळे सुमारे १३ हजार चौरस किलोमीटर क्षेत्र संरक्षित होण्यास मदत होणार आहे. राखीव क्षेत्रातील वन्यजीवांचे संवर्धन करताना स्थानिक ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनात अडचण येणार नाही, त्यांचे हक्क बाधित होणार नाही, याचीही दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेत राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. वाय एल पी राव, वन्यजीव मंडळाचे सदस्य सचिव व प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये आदी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत राज्यात १८ नवी संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करण्यात आली.

राष्ट्रीय उद्यानालगत आणि अभयारण्यालगत किंवा दोन संरक्षित क्षेत्र जोडणाऱ्या भूप्रदेशातील प्राणी, वनस्पती यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्याच्या हेतूने संवर्धन राखीव क्षेत्र घोषित केली जातात. प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्रांमध्ये नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गड, ठाणे जिल्ह्यातील मोरोशीचा भैरवगड, औरंगाबाद जिल्ह्यातील धारेश्वर, त्रिकुटेश्वर, कन्नड, पेडकागड, तर नांदेड जिल्ह्यातील किनवटचा समावेश आहे.

नवी संरक्षित क्षेत्रे (चौ.किमीमध्ये)

 • घेरा माणिकगड, जि. रायगड - ५३.२५

 • अलिबाग, जि. रायगड - ६०.०३

 • राजमाची, जि. ठाणे-पुणे - ८३.१५

 • गुमतारा, जि. ठाणे - १२५.५०

 • जव्हार, जि. पालघर - ११८.२८

 • धामणी, जि. पालघर - ४९.१५

 • अशेरीगड, जि. पालघर - ८०.९५

 • वेल्हे-मुळशी, जि. पुणे-रायगड - ८७.४१

 • लोणावळा, जि. पुणे-रायगड - १२१.२०

 • नाणेघाट, जि. पुणे-ठाणे - ९८.७८

 • भोरगिरीगड, जि. पुणे - ३७.६४

 • दिंडोरी, जि. नाशिक - ६२.१०

 • सुरगाणा, जि. नाशिक - ८६.२८

 • ताहाराबाद, जि. नाशिक - १२२.४५

 • कारेघाट, जि. नंदूरबार - ९७.४५

 • चिंचपाडा, जि. नंदूरबार - ९३.९१

 • आटपाडी, जि. सांगली - ९.४८

 • एकारा, जि. चंद्रपूर - १०२

खासगी प्रकल्पांकडून चार टक्के रक्कम

अभयारण्य, पर्यावरण संवेदनशील क्षेत्र आणि व्याघ्रभ्रमण मार्गात ज्या प्रकल्पांना वन्यजीव मान्यता आवश्यक आहे. त्यांच्याकडून बाधित क्षेत्रातील प्रकल्प किमतीच्या दोन टक्के रक्कम वन्यजीवांच्या संवर्धनासाठी जमा केली जाते. आता खासगी प्रकल्प यंत्रणेकडून चार टक्के रक्कम घेण्याबाबतची सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली. त्याला यावेळी मान्यता देण्यात आली. ही रक्कम जमा करण्यासाठी राज्य वन्यजीव निधी स्थापन करण्याच्या सूचना देखील मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या. या चार टक्के रकमेतील एक टक्का निधी हा राज्यातील जैवविविधतेसाठी वापरण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Web Title: Wildlife Conservation 18 New Land Reserves In The State

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..