कोणतीही निवडणूक लढवणार नाही : शरद पवार 

कोणतीही निवडणूक लढवणार नाही : शरद पवार 

मुंबई : मी स्वतः किंवा पवार कुटुंबातील अन्य कुणीही लोकसभा निवडणूक लढणार नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पवार पुण्यातून, तर अजित पवार यांचे पुत्र पार्थ मावळ लोकसभा निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चेला पवार यांनी पूर्णविराम दिला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत पक्षाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. 

'राष्ट्रवादी'ची शनिवार आणि रविवार असे दोन दिवस मुंबईत मुख्य कार्यालयात शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित मतदारसंघातील पदाधिकारी यांच्याशी बैठक आयोजित करण्यात आली आहे. शरद पवार यांनी मागील सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी कोणतीही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या वेळी शरद पवार निवडणूक लढवणार, अशी अचानक चर्चा रंगली होती. मात्र, पवार यांनी या चर्चेला आज पूर्णविराम दिला. दरम्यान, या बैठकीत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक मैदानात उतरतील, अशी चर्चाही अनेक दिवसांपासून सुरू होती. यावर, घरातल्या सर्वांनी निवडणूक लढवली तर कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार, असा सवालच शरद पवारांनी केला. त्यामुळे पार्थ यांच्या राजकीय एंट्रीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

या बैठकीत मावळ, शिरूर, बारामती, कोल्हापूर, हातकणंगले, बीड, जळगाव, रावेर यासह पुणे शहर लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. वास्तविक पुणे मतदार संघ हा कॉंग्रेसकडे असताना 'राष्ट्रवादी'च्या आजच्या बैठकीत पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्याने सर्वांच्या भुवया उंचविल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com