
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही लढविली होती.
मुंबई : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारीचे अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी (ता.4) संपल्यानंतर सर्व पक्षांनी पुढील कार्यक्रमांची योजना आखली आहे. आपापल्या पक्षांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाल्या आहेत. यामध्ये ज्येष्ठ नेत्यांपासून सेलेब्रिटीमंडळींचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.
शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यामध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, सरचिटणीस प्रियांका गांधी, ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, गुलाब नबी आझाद यांचा समावेश आहे.
तसेच राज्यातील प्रमुख नेत्यांमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, राजीव सातव, रजनी पाटील, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, ज्येष्ठ नेते नाना पटोले, नितीन राऊत, माणिकराव ठाकरे, एकनाथ गायकवाड, सचिन सावंत, हुसेन दलवाई, नसीम खान, बसवराज पाटील मुरूमकर, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, अमर राजूरकर, सुस्मिता देव, कुमार केतकर, चारुलता टोकस, मुकुल वासनिक, अविनाश पांडे यांचा समावेश आहे.
#Breaking अभिनेत्री उर्मिला मातोंडकरची काँग्रेसकडून मनधरणी सुरु - सूत्रांची माहिती | उर्मिलाला निवडणूक प्रचारात उतरवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न.. @UrmilaMatondkar @INCMaharashtra #Vidhansabha2019 pic.twitter.com/83nBhE9jUq
— sakalmedia (@SakalMediaNews) October 5, 2019
मात्र, या यादीत प्रसिद्ध अभिनेत्री 'रंगिला गर्ल' उर्मिला मातोंडकर यांचे नाव कुठेच आढळून आले नाही. मुंबई काँग्रेसमधील पक्षांतर्गत कुरघोडींमुळे त्यांनी सप्टेंबर महिन्यात पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही लढविली होती. मात्र, त्यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. भाजप नेते गोपाळ शेट्टी यांनी तब्बल 4 लाख 65 हजार मतांनी पराभूत केले होतेे.
मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्या मतभेदांमुळे पक्षाच्या कामगिरीवर परिणाम होत असून या प्रकरणी पक्ष श्रेष्ठींनी दखल घ्यावी, अशा आशयाचे पत्र त्यांनी दिल्ली दरबारी पाठवले होते. मात्र, या पत्राची दखलही घेतली गेली नसल्याने मातोंडकर कमालीच्या नाराज झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामाही दिला होता.
मध्यंतरी कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांना त्यांनी भेट दिली होती. मुंबईतून त्यांनी मदतही पाठविली होती. मात्र, पक्षांतर्गत कुरघोडी करण्यात काँग्रेस नेते व्यस्त असल्याने त्यांनी त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी काँग्रेसला त्यांची आठवण झाल्याने आता मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांमध्ये जागा वाटप झाल्यानंतर आता प्रचारासाठी स्टार प्रचारकांची पक्षाला गरज भासत आहे. मातोंडकर यांचे फॅन फॉलोअर्स आणि त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी असल्याने त्याचा काँग्रेसला फायदा होऊ शकतो, हे शहाणपण काँग्रेस नेत्यांना खूप उशीरा आले.
आज सकाळपासूनच काँग्रेसच्या काही नेत्यांनी उर्मिला यांची घरी जाऊन भेट घेतली. तर काहींनी फोनवरून संपर्क साधत त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न केला. त्यावर येत्या दोन दिवसांत मी माझा निर्णय कळवेन असे स्पष्टीकरण मातोंडकर यांनी दिले आहे.
- Vidhan Sabha 2019 : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा
- महिलेची 5 लाखांची फसवणूक करणाऱ्या फेसबुक फ्रेंडला दिल्लीत अटक
- Vidhan Sabha 2016 : चाळीसगावमधील बंडखोरी भाजप रोखणार तरी कशी?