आर्थिक उन्नतीत महिलांचा वाटा सिंहाचा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

नगर - आदर्श गावांच्या यशस्वी वाटचालीत महिलांचा वाटा सिंहाचा आहे. गावाचे वेगळेपण निर्माण करताना त्या कुटुंबाकडे आवर्जून लक्ष देतात. गावाबरोबरच घरातील स्वच्छता, पूरक व्यवसायाला अग्रक्रम देतात. त्यामुळे कुटुंबाचे आर्थिक सक्षमीकरण, भरभराटीत महिलांचे योगदान मोठे आहे. घरातील कर्ता पुरुष शेतीतील ठोस उत्पन्नाचा हिशोब करतो. महिला किरकोळ उत्पन्नावरही भर देत दैनंदिन खर्च भागवतात. बचत गटांत त्यांचा सहभाग वाढला. त्यांचे सक्षमीकरण होत असतानाच आत्मविश्वासही वाढलेला दिसतो.

आदर्श गावातील युवकांना गावांतच रोजगारासाठी प्रयत्न होताहेत. सूक्ष्म उद्योजकता घटकांतर्गत साह्य मिळते. विविध योजनांद्वारे स्वयंरोजगाराचे प्रयत्न होतात. गाव आदर्श करताना व्यसनमुक्तीला महत्त्व आहे. त्यासाठी प्रबोधन होते. हटकर मांगेवाडीतील (जि. सोलापूर) लहान मुलींनी आपल्या पित्यांचे व्यसन सोडवल्याचे उदाहरण आहे. अकरा वर्षाच्या अनिता भुसनावळने पित्याची दारू तर अनितापासून प्रेरणा घेऊन दीपाली होवाळने पित्याची तंबाखू सोडली.

सर्वधर्म समभाव
सर्वधर्म समभाव, हा संदेश आदर्श गाव योजनेतून दिला जातो. आदर्श गावात सर्वच धार्मिकस्थळांची डागडुजी केली जाते. त्यासाठी श्रमदान केले जाते. त्यात सर्वधर्मीय सामील होतात. साहजिकच सर्व धर्म-जाती एका छताखाली येतात. धार्मिक वाद, तंटे टळतात. साहजिकच कोर्ट-कचेऱ्यांमधील चकरांपासून मुक्तता होते. गावांत शांतता नांदते.

आर्थिक आलेखाचे आफ्रिकेत अध्ययन
हिवरे बाजारने आर्थिक विकास कसा साधला, याचा अभ्यास आफ्रिकेतील दुष्काळग्रस्त देशांच्या प्रतिनिधींनी केला. इजिप्तचे प्रतिनिधी महंमद स्याडवी, सुदानचे इल्वाद सेडींग, नायजेरियाचे अमिना बुकोला, मालावीचे व्हर्जिनिया चीसले यांनी फेब्रुवारीमध्ये हिवरेबाजारला भेट दिली. त्यांना गावाचा सर्वांगीण आर्थिक विकास खूपच भावला. आदर्श गाव हीच संकल्पना आफ्रिकी देशांना तारेल, असा निष्कर्ष त्यांनी काढला.

पाणीदार भगाईवाडी
सोलापूर ः भागाईवाडीने (ता. उत्तर सोलापूर) पाणी फाउंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत सहभाग घेत गावचा कायापालट केला. स्पर्धेत गाव तिसरे आले. आता गावात पाणी फाउंडेशनचे प्रशिक्षण केंद्र आहे. पाणीदार भगाईवाडीत सीसीटीव्ही कॅमेरे, सरकारी कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक्‍स हजेरी, महिलांच्या आरोग्यासाठी पाच रुपयांमध्ये सॅनिटरी नॅपकिन असे उपक्रम राबवले. सरपंच कविता घोडकेंनी लोकसहभागातून गावचा चेहरा बदलला. बहुतांश महिला बचत गटांद्वारे सॅनिटरी नॅपकिन, कापडी पिशव्यांची निर्मिती, बारमाही अंडी देणाऱ्या कोंबड्यांचे पालन यांसारखे व्यवसाय सुरू आहेत. महिलांना रोजगाराने कुटुंबाचे उत्पन्न वाढले.

बुबनाळमधील आदर्श महिलाराज
कोल्हापूर - जिल्ह्यातील बुबनाळ (ता. शिरोळ) तीन हजार लोकसंख्येचे गाव. उसासह अन्य नगदी पिके आणि शेतीत अग्रेसर गाव राजकीय इर्षेबाबत कुप्रसिद्ध होते. टोकाचे वादविवाद होते. अखेर ग्रामस्थांनीच बदलायचे ठरवले. गावातील सुकाणू समितीच्या पुढाकारातून 2010 मध्ये पहिल्यांदा निवडणूक बिनविरोध झाली. 2015 मध्ये सर्व सत्ता महिलांकडे दिली. आसमा जमादार बिनविरोध सरपंच झाल्या. या लक्षवेधी कामगिरीची नोंद घेत श्रीलंकेच्या शिष्टमंडळाने गावाला भेट दिली. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनीही भेट देऊन गावाचे कौतुक केले.

लोधवडेत महिलांची आघाडी
सातारा - आदर्श गाव योजनेत भाग घेऊन लोधवडे, किरकसाल, पांढरवाडी, दिवडी, कोळेवाडी, बिदाल, अनभुलेवाडी, परकंदी या गावांचा पारंपरिक चेहेरा बदलला. लोधवडे (ता. माण) अनेक बाबतीत राज्याला दिशा देणारे ठरले. गावाचे दूध उत्पादन 60 टक्‍क्‍यांनी वाढले, कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली. हे गाव 1995-96 पासून आदर्श गाव योजनेत आहे. इंडो जर्मन, एकात्मिक पाणलोट विकास, जलयुक्त शिवार अभियान यांच्याद्वारे गावात जलसंधारणाची उत्कृष्ट कामे झाली. घर "गृह स्वामिनीचे' हा महाराष्ट्रातील पहिला उपक्रम ठरला. गावात 1020 पुरुष, तर 1050 महिला आहेत. जलसंधारणातून 650 सहस्र घन मीटर पाणीसाठा वाढला. दारिद्य्र रेषेखालील कुटुंबांमध्ये वीस टक्के घट झाली आहे.

मांजरसुंबेने दिले महिलांना 20 लाख
नगर - हिवरे बाजारचा आदर्श अंगिकारत जिल्ह्यातील मांजरसुंबे, गुंडेगाव, तरडगाव यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले. मांजरसुंबेने (ता. नगर) आदर्श गाव योजनेंतर्गत विविध योजना राबवून महिलांना तब्बल 20 लाख मिळवून दिले. सरपंच जालिंदर कदम यांच्या प्रयत्नातून गाव आदर्श झाले. 18 बचत गटांचा संघ बनवला. त्यांना व्यवसायासाठी 20 लाख मिळवून दिले. गावांतील कुटुंबात आर्थिक स्थैर्य आले. सध्या बॅंकाही त्यांना तातडीने अर्थसाह्य करतात.

आदर्श गाव योजनेतील कुटुंबाचे वाढलेले मासिक अंदाजे उत्पन्न
बचतीतून उत्पन्नवाढ (रुपयांत)
- एक हजार - दारूबंदीमुळे गावातील किमान 30 टक्के घरांतील बचत
- 500 - हागणदारीमुक्तीमुळे महिलांचे आरोग्यावरील खर्चात बचत
- 500 - स्वच्छता मोहिमेमुळे डास, झुरळापासून मुक्तता, आरोग्यावरील खर्चात बचत
- 500 - शिक्षणाचा दर्जा सुधारल्याने शिकवण्यांच्या खर्चात बचत

थेट उत्पन्नवाढ (रुपयांत)
- 10 हजार - शेतीपूरक व्यवसाय, दुग्धोत्पादन, शेळीपालन इत्यादींमुळे.
- 5 हजार - महिलांचे उद्योग, बचत गटाच्या माध्यमातून उत्पन्नवाढ

Web Title: Women's contribution in economic advancement is considerable