राज्याला बसतोय दम्याचा विळखा 

योगिराज प्रभुणे
बुधवार, 3 मे 2017

पुणे - बेसुमार वृक्षतोड आणि दिवस-रात्र धूर ओकत धावणारी वाहने, राज्यातील प्रमुख शहरांमध्ये असलेली वस्त्यांची आणि वाहनांची दाटी, धुळीचे वाढते साम्राज्य यामुळे दम्याच्या रुग्णांचे प्रमाण गेल्या पाच वर्षांत दुप्पट झाले असल्याची भीती या क्षेत्रातील डॉक्‍टरांनी मंगळवारी व्यक्त केली. "स्वच्छ भारत'बरोबरच "स्वच्छ हवा' हा संदेश प्रत्येकापर्यंत पोचवण्याचीही गरज आहे, तरच दम्याचा विकार नियंत्रणात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

पुणे - बेसुमार वृक्षतोड आणि दिवस-रात्र धूर ओकत धावणारी वाहने, राज्यातील प्रमुख शहरांमध्ये असलेली वस्त्यांची आणि वाहनांची दाटी, धुळीचे वाढते साम्राज्य यामुळे दम्याच्या रुग्णांचे प्रमाण गेल्या पाच वर्षांत दुप्पट झाले असल्याची भीती या क्षेत्रातील डॉक्‍टरांनी मंगळवारी व्यक्त केली. "स्वच्छ भारत'बरोबरच "स्वच्छ हवा' हा संदेश प्रत्येकापर्यंत पोचवण्याचीही गरज आहे, तरच दम्याचा विकार नियंत्रणात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

जागतिक दमा दिनानिमित्त राज्यातील दम्याच्या प्रसाराची स्थिती जाणून घेण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांशी "सकाळ'ने संवाद साधला. मुंबई-पुण्यासह औरंगाबाद, नाशिक, नागपूर आणि कोल्हापूर या ठिकाणांचे शहरीकरण प्रचंड वेगाने होत आहे. परिणामी, त्या-त्या शहरांमधील प्रदूषणाची पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या शहरांमधील दम्याच्या रुग्णांची संख्याही त्या प्रमाणात वाढली असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. 

या संदर्भात बोलताना बालरोगतज्ज्ञ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग म्हणाले, ""शहरांमध्ये गेल्या पाच ते दहा वर्षांमध्ये प्रदूषणाचा वेग वाढला आहे. रस्ते, बांधकामाच्या नावाखाली अनेक ठिकाणी वृक्षतोड झाली आहे. त्यामुळे शहरातील हवा शुद्ध ठेवणारी नैसर्गिक यंत्रणा कमकुवत झाली आहे. त्याचा थेट परिणाम प्रदूषणाची पातळी वाढण्यावर झाला आहे. या प्रदूषणामुळे श्‍वसनाचे विकारदेखील वेगाने वाढत आहेत. त्यात दम्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.'' शहरात गेल्या पाच ते दहा वर्षांत उपचारांसाठी येणाऱ्यांमध्ये दम्याच्या रुग्णांची संख्या मोठी असल्याचेही निरीक्षण त्यांनी नोंदविले. तसेच ऍलर्जी, सर्दी आणि दमा या दोन्हीही गोष्टी एकत्र येत असल्यामुळे या दोन्हींवर उपचार एकत्रित करणे आवश्‍यक असल्याचा सल्लाही डॉ. जोग यांनी दिला. 

देश पातळीवर कार्य करणाऱ्या "चेस्ट रिसर्च फाउंडेशन'चे संचालक डॉ. संदीप साळवी म्हणाले, ""दम्याच्या विकाराचा त्रास लहान मुले आणि वयस्कर नागरिकांमध्ये गंभीर आहे. गेल्या वीस वर्षांच्या तुलनेत शहरातील प्रदूषणाची पातळी वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सरकारने आता "स्वच्छ भारत'बरोबरच "स्वच्छ हवा' हा संदेश देण्याची वेळ आली आहे.'' 

बालदम्याच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यापूर्वी घरात होणारे प्रदूषण हे त्याला कारणीभूत होते. पण, आता बहुतांश घरांमध्ये गॅस वापरला जात असल्याने चुलीतून होणारे प्रदूषण कमी झाले आहे. त्याची जागा वाहनांद्वारे होणाऱ्या प्रदूषणाने घेतली आहे. त्यामुळे बालदम्याच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण डॉ. राहुल पाटोळे यांनी नोंदविले. 

 

शाळांमध्ये वाढलेले "इन्हेलर' 
शहरातील शाळांमध्ये "इन्हेलर' घेऊन जाणाऱ्या मुलांचे प्रमाण वाढत आहे. त्यातून दम्याच्या विकाराचे गांभीर्य लक्षात येते. प्रत्येक वर्गातील, म्हणजे 40 मुलांमागे सुमारे आठ ते दहा मुलांना बालदमा असल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. 

औषधोपचार 
तोंडावाटे घेण्याच्या औषधांपेक्षा इन्हेलर हा दम्याच्या विकारावरील प्रभावी उपाय आहे. त्यामुळे शाळेतही मुलांनी इन्हेलर बरोबर बाळगावे, असे सांगितले जाते. 

आहार 
लालजर्द बीट, ढोबळी मिरची, गाजर यांचा समावेश आहारात करावा. 

व्यायाम 
श्‍वसनमार्गाची क्षमता वाढविणारा व्यायाम रुग्णांनी करावा. त्यात पोहणे आणि बासरीवादन हे प्रभावी ठरतात.

Web Title: World asthma day