World Cancer Day 2023 : आर.आर.आबांनी शरद पवारांचं ऐकलं असतं तर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

World Cancer Day 2023

World Cancer Day 2023 : आर.आर.आबांनी शरद पवारांचं ऐकलं असतं तर...

महाराष्ट्रातील एक लाडकं व्यक्तीमत्व म्हणून राष्ट्रवादीचे कट्टर नेते आर.आर.पाटील यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. आबांसारखे साधे सरळ नेतृत्व पुन्हा या जनतेने पाहिले नाही. आणि कदाचित तसे दुसरे कोणी होणारही नाही, असा दृढ विश्वास त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आहे.

आज जागतिक कर्करोग दिन. याच गंभीर आजाराने आबांचा बळी घेतला आणि आबा राज्याला पोरकं करून गेले. आबांबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. त्यांची राहणी साधी होती पण विचारसरणी उच्च होती. यामुळेच त्यांना कोणताही शत्रू नव्हता. पण, एक शत्रू त्यांच्या शरीरावर लपून छपून वार करत होता. आणि त्याच शत्रूने त्यांचे प्राण हिसकावून घेतले. तो शत्रू म्हणजे कर्करोग होय.

आबांना व्यसन होतं केवळ तंबाखू खाण्याचं. हेच व्यसन त्यांचा अस्त करेल याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती. पण, कॅन्सर काय असतो हे जवळून अनुभवलेल्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मात्र त्याचा अंदाज आला होता. म्हणूनच आबांना लाखमोलाचा सल्ला त्यांनी दिला होता.

अनेक राजकीय व्यासपिठावर शरद पवार यांनी तो किस्सा सांगितला आहे. ते आबांना म्हणाले होते की,  आबा तुम्ही माझं ऐकलं असतं, तर आज तुम्ही आमच्यात असता. पण दुर्दैवाने या रोगाने तुमच्यावर घाला घातला, हे तोंडात तंबाखू टाकणं बंद करा. तुमची सुपारी, तंबाखू जे काही आहे ते खाणं तुम्ही थांबवलं पाहिजे.

असं मी त्यांना अनेकदा सांगितलं होतं. हे मी माझ्या अनुभवाने त्यांना सांगितलं. मी एकेकाळी त्या रस्त्यानं जात होतो. त्याचा परिणाम माझ्या तोंडावर झाला. पण मी थांबलो आणि वेळीच काळजी घेतली.

पुढे ते म्हणाले की, तुम्ही थांबवा आणि वेळीच काळजी घ्या. मला माहितीय यातले उत्तम डॉक्टर कोण आहेत. आपण सगळी व्यवस्था करु असंही सांगितलं. त्यांना घेऊनही गेलो डॉक्टरांकडे. डॉक्टरांनी त्यांना काळजी घ्यायला सांगितली. त्यांनी काळजी घेतली नाही. त्यांनी डॉक्टरांनी सल्ला घेतला पण कृतीत आणला नाही. शेवटी त्या रोगानं त्यांच्यावर घाला घातला आणि ते निघून गेले,’ अशी खंत पावर यांनी व्यक्त केली.

‘माझं वय ८० त्यांच वय आज ६०-६१ असतं. माझ्या २० वर्ष आधी ते गेले. त्यांना जायचा काय अधिकार होता. माझं जाण्याचं वय होतं. माझ्यासारख्याला मागे ठेऊन तुम्ही माझ्याआधी गेलात ही गोष्ट मला पटली नाही. तुमच्या कर्तृत्वाला अजून बहार यायचा होता.

तुमच्या कर्तृत्वाचं समग्र चित्र महाराष्ट्राच्या घराघरात पोहचायचं होतं. तुम्ही अचानक सोडून गेलात. हे काही योग्य केलं नाही. तुमच्या जाण्याचं दु:ख माझ्या अंतकरणामध्ये कायम राहिलं,’ असंही शरद पवार आबांना म्हणाले होते.

कर्करोगाला हरवून एक आरोग्यदायी जीवन सध्या शरद पवार जगत आहेत. कधीतरी हा महाभयंकर कर्करोग त्यांनाही जडला होता. जेव्हा पवारसाहेबांना कॅन्सर झाला तेव्हा त्यांनी तातडीने शस्त्रक्रिया केली. तेथे डॉक्टर त्यांना वेगळे काही सांगत होते, मात्र पवारसाहेबांनी त्या डॉक्टरांना अगोदर तुम्हाला पोचवेन, नंतर मी जाईन असे सांगतिले होते.

त्याच इच्छाशक्तीच्या जोरावर शरदजींनी आबांना सल्ला दिला होता. पण, आबांनी त्यांचे ऐकून तंबाखूच्या व्यसनावर पाणी सोडले असते तर आजही ते आपल्यात असते हेच खरे.