जागतिक मराठी परिषद तरुणांकडे सोपवावी - शरद पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 8 जानेवारी 2017

मुंबई - शून्यातून यशस्वी झालेल्या व्यक्‍तींचे अनुभव तरुण पिढीने ऐकले पाहिजेत. जगाच्या पाठीवर विविध देशांमध्ये असलेला मराठी माणूस संघर्षातून उभा राहिला आहे, असे कौतुकोद्‌गार जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनी "शोध मराठी मनाचा' या 14 व्या जागतिक मराठी संमेलनात शनिवारी काढले. यापुढे परिषदेचे कामकाज चाळिशीच्या आतील तरुणांच्या खांद्यावर सोपवावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

जागतिक मराठी अकादमी व श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट) या संस्थेच्या या जागतिक मराठी संमेलनाचे उद्‌घाटन दादरमधील शिवाजी मंदिरात पवार यांच्या हस्ते आज झाले. त्या वेळी 'जगातील यशस्वी माणसांचे विचार ऐकण्यासाठी जागतिक मराठी परिषदेने जागतिक मराठी अकादमी स्थापन केली. मराठी माणसे देशात आणि देशाबाहेर विविध क्षेत्रांत यशस्वी झालेली दिसतात. मराठी माणसे कधी कुणासमोर हात पसरताना दिसत नाहीत. कष्ट करायलाही मागे-पुढे बघत नाहीत,'' असे सांगून पवार यांनी परदेशांत यशस्वी झालेल्या अनेकांची उदाहरणे दिली. यादृष्टीने आखण्यात आलेला जागतिक मराठी अकादमीचा हा उपक्रम मला महत्त्वाचा वाटतो, अशा शून्यातून यशस्वी झालेल्या माणसांना निमंत्रित करा, त्यांचा सत्कार करा, त्यांचे विचार लोकांना कळू द्या. त्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे म्हणाले, की आम्ही सर्वच आता सत्तरीत आलो आहोत. यापुढे पन्नाशीतल्यांकडे सूत्रे द्यायला हवीत. मात्र, त्यात सुधारणा करत पवार यांनी चाळिशीच्या आतील तरुणांकडे सूत्रे दिली पाहिजेत, असे मत नोंदवले. जागतिक मराठी संमेलनाचे अध्यक्ष, अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती अविनाश राचमाले यांनी या वेळी लातूरमधील वायगावपासून वॉशिंग्टनपर्यंतची आपली वाटचाल नव्या पिढीसमोर मांडली. या समारंभात ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर व जयंत सावरकर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हे जागतिक मराठी संमेलन चित्रपट, रंगभूमी, कला, साहित्य, क्रीडा आणि ज्ञान, माहिती व मनोरंजन यावर आधारित आहे. या संमेलनात अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इस्राईल, कतार, ब्रिटन आदी देशांतील लोक सहभागी झाले होते. मुंबईतील मनोरंजन आणि उद्योगक्षेत्रातील मान्यवरही या संमेलनास उपस्थित होते.

Web Title: world council marathi conferance gives to youth