महाराष्ट्र स्नुषेचा विश्‍वभ्रमंतीचा विश्‍वविक्रम

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

या भ्रमंतीदरम्यान भारतीय असल्यामुळे रशिया, कझाकस्तान, म्यानमारमध्ये आलेले सुखद, तर बेलारूसमध्ये आलेला कटु अनुभवही त्यांनी नमूद केले.

नवी दिल्ली : इंग्लड ते भारत हा 32 हजार किलोमीटरचा प्रवास 32 देशांमधून कारद्वारे एकटीने पूर्ण करून जागतिक विक्रम नोंदविणाऱ्या आणि "बेटी बचाव, बेटी पढाव'चा संदेश देणाऱ्या भारूलता कांबळे यांना दिल्लीत गौरविण्यात आले. विश्‍वविक्रमाच्या अखेरच्या टप्प्यात दिल्लीत पोचलेल्या भारूलता कांबळे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच स्वागत केले होते. त्यानंतर काल (ता. 19) महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे त्यांना गौरविण्यात आले.

इंग्लंडमध्ये वास्तव्य असणाऱ्या भारूलता कांबळे या व्यवसायाने वकील व इंग्लंडमधील निवृत्त शासकीय अधिकारी असून, त्या गुजरातच्या कन्या व महाराष्ट्राच्या (महाड, जि. रायगड) स्नुषा आहेत. गुजरात येथील नवसारी जिल्ह्यात जन्मलेल्या भारूलता या महाड (जि. रायगड) येथील डॉ. सुबोध कांबळे यांच्या पत्नी आहेत. महाराष्ट्राची सून म्हणून मला सार्थ अभिमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

विपरीत हवामान, निर्मनुष्य रस्ते, विविध देशांतील कायदे नियम या अडचणींवर केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर मात करून जागतिक विक्रम बनवू शकले, अशा भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली. 13 सप्टेंबर 2016 ला इंग्लडमधून सुरू केलेल्या प्रवासादरम्यान आर्क्‍टिक सर्कलमधील देशांमधून 2,792 किलोमीटरचे खडतर अंतर एकाकी पार करणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. या भ्रमंतीदरम्यान भारतीय असल्यामुळे रशिया, कझाकस्तान, म्यानमारमध्ये आलेले सुखद, तर बेलारूसमध्ये आलेला कटु अनुभवही त्यांनी नमूद केले. ब्रिटिश नागरिक असूनही जन्माने भारतीय असल्याने परदेशात स्वागत झाले. मात्र, ईशान्य भारतातील बंडखोर गटांच्या भागामध्ये ब्रिटिश नागरिक असल्यामुळे सुखरूप मार्गक्रमण करता आल्याचा विरोधाभासी अनुभवही त्यांनी या वेळी कथन केला. 17 नोव्हेंबर 2016 रोजी दिल्लीत त्यांची ही कारयात्रा संपली. दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले स्वागत केले आणि हा आयुष्यातील बहुमोल प्रसंग ठरल्याचे श्रीमती कांबळे म्हणाल्या. या प्रवासासाठी त्यांनी वापरलेल्या बीएमडब्लू एक्‍स-3 या कारवर "बेटी बचाव, बेटी पढाव'चे संदेश चित्रित करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.

Web Title: world record of world tour