
Shivsena : 'प्रतिनिधी सभेतील लोक आमच्या बाजूने' शिंदे गटाचा दावा; आयोगातील लेखी युक्तिवाद संपला
नवी दिल्लीः निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह गोठवल्यानंतर त्यावरील निर्णय प्रलंबित आहे. आज निवडणूक आयोगामध्ये दोन्ही गटाकडून लेखी युक्तिवाद सादर करण्यात आला. कागदपत्रांच्या बाबतीत शिंदे गटाने आज एक वेगळीच चाल खेळली आहे.
निवडणूक आयोगामध्ये दोन्ही गटांना आज लेखी युक्तिवाद सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करायचे होते. शिंदे गटाकडून १२४ पानी तर ठाकर गटाकडून ११२ पानी लेखी युक्तिवाद सादर करण्यात आला.
ठाकरे गटाने आमचीच खरी शिवसेना हे सिद्ध करण्यासाठी २३ लाख कागदपत्रं सादर केले होते. त्या कागदपत्रांच्या अनुषंगाने शिंदे गटाने एक चाल खेळली आहे. शिंदे गटाच्या दाव्यानुसार १९९९ साली शिवसेनेमध्ये लोकशाही मूल्यांना धरुन काही बदल करण्यात आलेले होते. मात्र नंतर संघटनेत केलेले बदल लोकशाही मूल्यांना धरुन नाहीत. त्यामुळे ठाकरे गटाकडून सादर करण्यात आलेले २३ लाख कागदपत्रं बघण्याची गरज नसल्याचं शिंदे गटाने नमूद केलं.
हे ही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल
तर ठाकरे गटाने घटनेच्या दहाव्या शेड्यूलचा दाखला देत शिंदे गटाने स्वेच्छेने पक्ष सोडला आहे. त्यामुळे ते शिवसेनेच्या चिन्हावर दावा करु शकत नाहीत, अशी बाजू मांडून त्यांचा युक्तिवाद ऐकला जावू नसे अशी मागणी केली आहे.
शिंदे गटाने प्रतिनिधी सभेवर दावा ठोकला. प्रतिनिधी सभेतील 144 लोक आमच्या बाजूने आहेत, असं शिंदे गटाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. यासह खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची यादी लेखी स्वरुपात सादर करण्यात आली. आज लेखी युक्तिवाद झाले. आता पुढच्या आठवड्यामध्ये निवडणूक आयोगात 'खरी शिवसेना कुणाची?' याचं उत्तर मिळण्याची शक्यता आहे.