
पोलिस चालक पदासाठी रविवारी लेखी परीक्षा! उमेदवारांना सकाळी ६ वाजताच केंद्रांवर यावे लागणार
सोलापूर : पोलिस शिपाई भरतीतील चालक पदांसाठी मुंबई शहर वगळता रविवारी (ता. २६) सकाळी साडेआठ ते दहा वाजेपर्यंत लेखी परीक्षा होणार आहे. लेखीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना ‘महाआयटी’च्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेता येणार आहे. परीक्षार्थींना दोन तास अगोदर केंद्रांवर उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सोलापूर शहर व ग्रामीण पोलिसांनी भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली. त्यानंतर तृतीयपंथी उमेदवारांच्या मैदानी चाचणीचे निकष ठरविण्यासाठी काही कालवधी गेला. त्यामुळे चालक व शिपाई पदाची लेखी परीक्षा लांबणीवर पडली होती. पण, आता भरतीच्या प्रतीक्षेतील उमेदवारांच्या लेखी परीक्षेची तारीख निश्चित झाली आहे. मुंबई शहरासाठी स्वतंत्र लेखी परीक्षा होणार आहे.
तत्पूर्वी, राज्यातील सर्वच जिल्ह्यातील शिपाई व चालक भरतीची मैदानी चाचणी यशस्वीपणे पार केलेल्यांना लेखी परीक्षेला संधी मिळणार आहे. एका जागेसाठी दहा उमेदवारांची लेखीसाठी निवड करण्यात आली आहे. दरम्यान, प्रारंभी चालक पदांसाठी लेखी परीक्षा होईल आणि त्यानंतर शिपाई पदांसाठी लेखी परीक्षा होणार आहे. परीक्षेपूर्वी प्रत्येक उमेदवाराची कसून अंगझडती घेतली जाणार असल्याने त्यांना परीक्षेपूर्वी दोन तास अगोदर केंद्रावर हजर राहावे लागणार आहे.
‘एसव्हीसीएस’ प्रशालेत परीक्षा
पोलिस चालक पदाची लेखी परीक्षा येत्या रविवारी होणार आहे. तर शिपाई पदासाठी २ एप्रिलला लेखी परीक्षा होईल. उमेदवारांनी पेपर सुरु होण्याच्या दोन तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. अक्कलकोट रोडवरील एसव्हीसीएस प्रशालेत ही परीक्षा होणार आहे.
- अजित बोऱ्हाडे, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर
एकमेव तृतीयपंथी उमेदवार ‘मैदानी’तून बाहेर
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यंदा प्रथमच तृतीयपंथींना पोलिस भरतीत संधी देण्यात आली होती. पण, सोलापूर ग्रामीणमध्ये एकही तृतीयपंथी उमेदवार नव्हता, सोलापूर शहरात मात्र एक उमेदवार होता. महिला उमेदवारांना मैदानीचे जे निकष होते, तेच निकष तृतीयपंथी उमेदवारांसाठी ठेवले होते. शहरात पोलिस शिपाईसाठी अर्ज केलेल्या तृतीयपंथी उमेदवाराला गोळाफेकीत १२ गुण मिळाले. मात्र, १०० मीटर व ८०० मीटर धावण्यात काहीच गुण मिळाले नाहीत. ५० गुणांच्या मैदानी चाचणीत किमान ५० टक्के गुण अपेक्षित होते. पण, तेवढे गुण न मिळाल्याने तो एकमेव उमेदवार पोलिस भरतीतून बाहेर पडला.