राज्यात 32 वर्षांनंतरही पहिल्या आत्महत्येची धग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

विदर्भात सहा जणांनी संपविले होते जीवन

विदर्भात सहा जणांनी संपविले होते जीवन
यवतमाळ - जगाला जगविणारा पोशिंदा आज सुलतानी आणि अस्मानी संकटांच्या फेऱ्यात अडकला आहे. शेतकरी आत्महत्येने राज्यच होरपळून निघत आहे. यवतमाळ जिल्ह्याची तर "शेतकरी आत्महत्यांची राजधानी' अशी ओळख निर्माण झाली आहे. हातातोंडाशी आलेला पिकाचा घास हिरावल्याने 19 मार्च 1986 रोजी मूळचे चिलगव्हाण (ता. महागाव) येथील रहिवासी असलेल्या साहेबराव करपे यांनी पत्नी व चार मुलांसह दत्तपूर (जि. वर्धा) येथील मनोहर कुष्ठधामात जीवनयात्रा संपविली. या घटनेला सोमवारी 32 वर्षे पूर्ण झाली. या घटनेची पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद घेतली गेली. त्यांच्या स्मृतीत राज्यभरात विविध ठिकाणी अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.

कोण होते साहेबराव?
अकरा वर्षे सरपंच राहिलेले साहेबराव हे 40 एकर शेतीचे मालक होते. याशिवाय संगीत विशारदही होते.

नेमके काय घडले?
थकीत बिलापोटी त्यांची वीज कापली अन्‌ 15 एकरांतील गहू, हरभरा वाळला.

कशी केली आत्महत्या?
विमनस्क अवस्थेत त्यांनी दत्तपूर (जि. वर्धा) येथील कुष्ठधाम गाठले. एक खोली घेतली. या खोलीत संपूर्ण कुटुंबाने भजने गायली. नंतर पत्नी आणि चार अपत्यांसह त्यांनी विष कालवलेली भजी खाल्ली. साहेबरावांची लहान मुलगी केवळ आठ महिन्यांची होती.

कपाळावर ठेवले नाणे
खोलीत एका रांगेत पत्नी आणि मुलांचे मृतदेह ठेवून प्रत्येकाच्या कपाळावर साहेबरावांनी एक रुपयाचे नाणे ठेवले. एवढा टोकाचा निर्णय घेताना या प्रकरणात कुणीही अकारण अडकू नये याचे भान त्यांनी राखले. दाराबाहेर दोरीने बांधून फेकलेल्या चिठ्ठीवर त्यांनी कुणीही दार उघडू नये पोलिसांना कळवावे, असे लिहिले होते. यानंतर विष कालवलेले भजी खाऊन त्यांनीही देह ठेवला. मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या सविस्तर पत्रात "शेतकरी म्हणून जगणे कठीण झाले आहे' असे त्यांनी नमूद केले. ते पत्र शेतकऱ्यांची कैफियत मांडणारे होते.

Web Title: yavatmal maharashtra news first farmer suicide in maharashtra