यंदाही पद्म पुरस्कारासाठी इच्छुकांची मांदियाळी

सिद्धेश्‍वर डुकरे 
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

मुंबई - यंदाही पद्म पुरस्कारांसाठी इच्छुकांची मांदियाळी झाली असून या पुरस्कारासाठी केंद्राकडे शिफारस करावी, यासाठी सुमारे ७५ अर्ज राज्य सरकारकडे आले आहेत. साध्या आंतरदेशीय पत्रापासून ते बायोडेटा आणि केलेल्या कामाच्या नोंदीच्या बाडासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अर्ज केले आहेत. 

मुंबई - यंदाही पद्म पुरस्कारांसाठी इच्छुकांची मांदियाळी झाली असून या पुरस्कारासाठी केंद्राकडे शिफारस करावी, यासाठी सुमारे ७५ अर्ज राज्य सरकारकडे आले आहेत. साध्या आंतरदेशीय पत्रापासून ते बायोडेटा आणि केलेल्या कामाच्या नोंदीच्या बाडासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अर्ज केले आहेत. 

दर वर्षी प्रजासत्ताकदिनी केंद्र सरकार पद्म पुरस्कारांची घोषणा करते. भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, असे या नागरी पुरस्कारांचे स्वरूप आहे. भारतरत्न पुरस्काराची घोषणा केंद्र स्वतः करते. तर पद्म पुरस्कारांसाठी राज्य सरकार आपल्या राज्यातील अर्ज केलेल्या मान्यवरांच्या नावांची शिफारस केंद्र सरकारला करते. दर वर्षी केंद्र सरकारला शिफारस करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर असते. यंदा या पुरस्कारासाठी राज्य सरकारच्या शिष्टाचार विभागाकडे ७० ते ७५ अर्ज आले आहेत. राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी  सरकारकडे अर्ज केले आहेत. सामान्य नागरिकांपासून ते अभिनेते, संगीतकार, गायक, क्रीडापटू, डॉक्‍टर आदींचा यामध्ये समावेश आहे. नेहमीप्रमाणे याहीवेळेस मान्यवरांच्या अर्जाची छाननी राज्य सरकार करणार आहे. छाननीसाठी राजशिष्टाचार खात्याचे मंत्री प्रमुख असून, त्यांच्या अध्यक्षतेखाली इतर खात्यांच्या मंत्र्यांची एक समिती असते. ती समिती याबाबत निर्णय घेते.

राम शिंदे यांची छाननी समिती
राजशिष्टाचार मंत्री राम शिंदे यांची छाननी व शिफारस समिती असून, यामध्ये महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, गृह राज्यमंत्री रणजित पाटील आदींचा समावेश आहे. या समितीची चार सप्टेंबर रोजी बैठक आहे.

मान्यवरांचे अर्ज
या पुरस्कारांच्या शिफारशीसाठी अभिनेते प्रशांत दामले, गायिका आरती अंकलेकर, अन्नू मलिक यांच्यासह डॉ. झुनझुनवाला, डॉ. सुराशे,  सामाजिक कार्यकर्ते शांतिलाल मुथा, उद्योजक पुरुषोत्तम अग्रवाल आदींनी अर्ज केल्याचे समजते.

Web Title: This year Interested for the Padma awards