हवामान बदलाचा आंब्याला फटका 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

मुंबई - या वर्षी हवामान बदलाचा मोठा फटका कोकणातील आंब्याला बसला आहे. यंदा आंब्याचे उत्पादन फक्त 30 ते 32 टक्के होईल, अशी शक्‍यता महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी व्यक्त केली. 

मुंबई - या वर्षी हवामान बदलाचा मोठा फटका कोकणातील आंब्याला बसला आहे. यंदा आंब्याचे उत्पादन फक्त 30 ते 32 टक्के होईल, अशी शक्‍यता महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी व्यक्त केली. 

हवामानातील बदलामुळे थंडी लांबल्याने आंब्यावर तुडतुडा, भुरी रोग पडला तसेच दोन-तीनदा मोहोर आला. त्यामुळे यंदा आंबा उत्पादनात मोठी घट झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. आंब्याला मोहोर येण्याची नियमित प्रक्रिया नोव्हेंबर-डिसेंबरपासून सुरू होते. या हंगामातही चांगला मोहोर आला; मात्र महिना-दोन महिन्यांनी पुन्हा मोहोर आल्यामुळे दाणेदार आंबे गळायला सुरुवात झाली आणि पहिले पीक गळून गेले. त्यातच फेब्रुवारीत कमी होणारी थंडी मार्चपर्यंत लांबली. त्यामुळे बऱ्याच झाडांना तिसऱ्यांदा मोहोर आला. त्यातच थ्रिप्सचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कोकणातील बागा काळ्याठिक्कर पडल्या. अनेक ठिकाणी रात्री दव पडल्यामुळे आंब्यावर डाग पडून गुणवत्तेवर परिणाम झाला. 

परराज्यांतील आंबा मुळावर  
मागील वर्षी कोकणातून या काळात आंब्याच्या 40 ते 45 हजार पेट्या मंडईत आल्या होत्या. या वर्षी अवघ्या 20 ते 22 हजार पेट्या आल्या आहेत. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधून हापूससारखा दिसणारा पण चवीला निकृष्ट असलेला आंबा मोठ्या प्रमाणात आला. त्यामुळे हापूस आंब्याचे भाव पडले, असे मोकल यांनी सांगितले. त्यामुळे कोकणातील आंबा उत्पादक सरकारकडून नुकसानभरपाई मिळण्याची अपेक्षा करत आहेत, असेही ते म्हणाले. 

Web Title: This year production of mangoes will be only 30 to 32 percent