समाजविकासासाठी सकाळ, यिनचा सेतू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

मुंबई - लोकशाही देशांमधील संवेदनशीलता संपत चालली आहे. मात्र, आपल्याकडे सुदृढ लोकशाही व संवेदनशील समाज निर्माण व्हावा आणि लोकसहभागातून समाजाचा विकास व्हावा, यासाठी ‘यिन’ आणि ‘सकाळ माध्यम समूह’ सेतूची भूमिका बजावेल, अशी ग्वाही डिलिव्हरिंग चेंज फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष आणि ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी शनिवारी (ता. २६) येथे दिली.

मुंबई - लोकशाही देशांमधील संवेदनशीलता संपत चालली आहे. मात्र, आपल्याकडे सुदृढ लोकशाही व संवेदनशील समाज निर्माण व्हावा आणि लोकसहभागातून समाजाचा विकास व्हावा, यासाठी ‘यिन’ आणि ‘सकाळ माध्यम समूह’ सेतूची भूमिका बजावेल, अशी ग्वाही डिलिव्हरिंग चेंज फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष आणि ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी शनिवारी (ता. २६) येथे दिली.

यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)च्या दुसऱ्या मंत्रिमंडळाचा शपथविधी व यिन जिल्हा प्रतिनिधींच्या तीन दिवसीय कार्यशाळेची सुरुवात येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात शनिवारी झाली, त्या वेळी ते बोलत होते. यिन सदस्यांच्या विकासाचा पवार यांनी सांगितलेला आराखडा ऐकून सर्व प्रतिनिधी भारावून गेले. त्यामुळे त्यांच्यात उत्साह निर्माण झाला. त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.

ब्रेक्‍झिटचे म्हणा किंवा अमेरिकी निवडणुकीचे निकाल पाहून समाजात खोल विभागणी झाल्याचे निदर्शनास येते. ट्रम्प यांचा विजय हिलरी क्‍लिंटन समर्थकांना रुचला नाही व ते रस्त्यावर आले. हे वातावरण काळजी करण्यासारखे आहे. भारतातही अशी परिस्थिती येईल, अशी भीती काहींना आहे; मात्र तात्त्विक विरोध असला, तरी समाजाचे हित कोणीही विसरू नये. आपल्याकडेही महाविद्यालयाचे शुल्क परवडत नाही म्हणून असंतोष आहेच. अशा स्थितीत उद्योग समूहांनी समाजासाठी काम केले पाहिजे. सरकार व तळागाळातील नागरिक यांच्यात सेतू बांधले गेले पाहिजेत. नेमके हेच काम ‘सकाळ माध्यम समूह’ करत आहे, असे  पवार म्हणाले.

पवार यांनी ‘यिन’च्या तरुणांशी थेट संवाद साधत त्यांच्या प्रश्‍नांनाही उत्तरे दिली. यिनच्या तरुणांनी आपल्या गावाचा विकास करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा. इस्रायलमध्ये फारसे पाणी नसूनही त्यांनी प्रगती साधली आहे, तर आपल्याला ते का जमू नये? यिन सदस्यांनी ‘सकाळ समूह’, आपले स्थानिक वार्ताहर यांच्या सोबतीने काम करावे. जी गावे किंवा जे ग्रामस्थ स्वतःहून प्रयत्न करण्यास तयार आहेत, अशांनाच आता ‘सकाळ रिलीफ फंडा’ची मदत देण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. गावांनी मदतीची अपेक्षा करत केवळ स्वस्थ बसून राहू नये. कारण ते स्वतःहून हातपाय हलवत नाहीत, तोपर्यंत काहीही होणार नाही. पुरस्कार विजेत्या किंवा काहीतरी करून दाखवलेल्या गावांनाच मदत केली पाहिजे. कारण त्यामुळे ते ग्रामस्थ इतरांनाही मदत करतील. परिणाम दिसेल अशाच ठिकाणी यिन सदस्यांनी पुढाकार घेऊन हे काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

बलात्कार, हुंडाबळी अशा समस्यांबाबत काही करता येईल का? या तेजस पाटील (नाशिक) याच्या प्रश्‍नावर अभिजित पवार म्हणाले की, या समस्या म्हणजे विकृती आहे. हे प्रकार दुर्दैवी आहेत, त्यासंदर्भात आपणही काही करीत आहोत. तुमच्याकडे काही ठोस उपाय असतील, तर जरूर प्रयत्न करा. आपणही याबाबत विचार करू शकतो. आपल्याला जे आतून वाटते, जे करावेसे वाटते, त्यावर निर्णय घेऊन कृती करा. यिन हे तुमचेच व्यासपीठ आहे.

आरोग्य क्षेत्रात आपण काय करू शकतो? या बारामती येथील अनुराधा मुसळे हिच्या प्रश्‍नावर पवार म्हणाले की, आपली क्षमता पाहून आपले कार्यक्रम, विषय हे तुमचे तुम्हीच ठरवा; मात्र त्या कार्यक्रमाचे दूरगामी भवितव्य काय, याचाही आढावा घ्या. आपण मोठी स्वप्ने पाहायला काहीच हरकत नाही; मात्र त्यातील जमतील तेवढ्या गोष्टी नक्कीच करा.

उपायांचा आराखडा 
आपल्याला यावर्षी यिनला दुसऱ्या टप्प्यात न्यायचे आहे. ही जबाबदारी तुमची आहे. आज आपले राज्य, तसेच देश अनेक अडचणींना सामोरे जात असताना, आपण एकत्र येऊन काम केले पाहिजे. आपल्या कामात कोठेही पक्ष नको किंवा राजकारणही नको. आपल्याला फक्त समाजसेवा करायची आहे. आपण एरवी फक्त सरकारवर टीका करतो. अडचणी असतील तर सरकारनेच सर्वकाही करावे, अशी अपेक्षा करतो; मात्र तशी अपेक्षा न करता लोकसहभागातून समस्यांवरील उपायांचा आराखडा तयार केला पाहिजे, असे पवार यांनी स्पष्ट केले.  निवडणूक प्रक्रियेत धमाल आली का? असे पवार यांनी तरुणांना विचारताच, एका सुरात ‘हो’ असा प्रतिसाद आला. त्यानंतर यिनचे महत्त्व वाढत असल्याचेही पवार यांनी निदर्शनास आणले. दुसऱ्या टप्प्यात यिनच्या तरुणांचा व्यक्तिमत्त्व विकास; तसेच त्यांना उद्योजक म्हणून घडवण्यासाठी यिनतर्फे लवकरच सुरू होणाऱ्या उपक्रमांचा आराखडा पवार यांनी विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट केला.

Web Title: 'Yin' and 'Sakal Media Group "will play the role for social development