ज्येष्ठ योगगुरु डॉ. धनंजय गुंडे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

ज्येष्ठ योगगुरु डॉ. धनंजय गुंडे यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.

ज्येष्ठ योगगुरु डॉ. धनंजय गुंडे यांचे आज सकाळी निधन झाले. कल्पेटा (केरळ) येथे ते पत्नीसह मुलीकडे गेले होते. मॉर्निंग वॉक करुन घरी आल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. दरम्यान, आज सायंकाळी पार्थिव एअर अॅम्ब्युलन्सने कोल्हापुरात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर कोल्हापुरात अंत्यसंस्कार होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

केवळ महाराष्ट्र आणि भारतातच नव्हे, तर जगभरात त्यांची योग शिबिरे झाली. जवळपास 40 ते 50 वर्षे डॉ. गुंडे यांनी शिबिरांच्या माध्यातून योग उपचाराचे धडे दिले. योगासनांच्या माध्यमातून मधूमेह, रक्तदाब यांसारख्या रोगांवर कायमस्वरूपी इलाज होऊ शकतो, यावर त्यांनी भर दिला होता. यासह वृत्तपत्र, नियतकालिके, मासिके यांतून त्यांनी याविषयावर भरपूर लिखाण करून योग विद्येबाबत जागृती केली.

राष्ट्रपती के. आर. नारायणन यांनाही डॉ. गुंडे यांनी योग उपाचारांतून बरे केले होते. योग विषयी त्यांनी आजवर सहा पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. योग विद्या विभूषित असलेले डॉ. गुंडे अतिशय मितभाषी होते. भेटणाऱ्या प्रत्येकाला ते त्याचे वय विचारून योगासने केली पाहिजेत, असा सल्ला द्यायचे.  

Web Title: Yog Guru Dr Dhananjay Gunde Passes Away