युतीची माती व्हावी, ही कार्यकर्त्यांची इच्छा!

Shiv sena, BJP
Shiv sena, BJP

शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांत महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी युती होण्यासाठी पुन्हा एकमेकांना गूळ लावणं सुरू झालं आहे. खरे तर दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांची युती नकोच, अशी भूमिका आहे. भाजपच्या ठाण्यातील बैठकीत हेच दिसून आले. युती झाल्यावरं फायदा होण्यापेक्षा कार्यकर्ते मित्रपक्षाचा उमेदवार पाडण्याचे कार्य करण्याचा धोका जास्त आहे. 

शिवसेनेचे एक आक्रमक खासदार तणतण करत होते. आमच्या पक्षाला तीन म्हाताऱ्यांनी घेरलयं म्हणून सांगत होते. "हे म्हातारे पक्षात काही घडूचं देत नाहीत. मंत्री आमच्या कार्यक्रमाला येत नाहीतं. संघटनेकडूनं बळ मिळतं नाही. सत्तेत सहभागी असलो तरी कामं काही होतं नाहीत. सत्ताच नको असं म्हटलं की हे म्हातारे साहेबाला काही सुधरू देत नाहीत, अशा त्रागा हा खासदार करत होता. खासदारांचा त्रागा खरा किती आणि खोटा किती, हे त्यांनाच माहीत. पण एक गोष्ट मात्र खरी की शिवसेना संधीची माती करत आहे.

नगर परिषद निवडणुकीत पक्षाने कसलीही तयारी केलेली नसताना चांगली मते मिळाली. याचा अर्थ शिवसेनेची खालच्या थरातील बांधणी अजूनही भक्कम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरपालिका निवडणुकीसाठी जिवाचे रान केले. सारी सरकारी यंत्रणा भाजपच्या बाजून होती. तरीही शिवसेनेला मतदारांनी वाऱ्यावर सोडले नाही. राज्यातील तुटपुंज्या सत्ताही शिवसेनेला शेळीच्या शेपटासारखी झाली आहे. अशी शेपूट जिने पूर्ण झाकले जात नाही आणि माशाही उडविता येत नाहीत. 

शिवसेनेनं आक्रमक होऊन भाजपच्या विरोधात रान उठवावं, असं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना वाटतं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसपेक्षा भाजपनं आपल्याला जास्त अपमानित केलयं, अशी त्यांची खंत आहे. भाजपचे पालकमंत्री शिवसेनेच्या खासदार-आमदारांना दुय्यम स्थान देत असल्याची त्यांची भावना आहे. या खासदारानं तर भाजपच्या मंत्र्यांना शिव्यांची लाखोली वाहिली होती. मात्र शिवसेनेचं नेतृत्त्व सध्या मुंबईच्या पलीकडं पाहायाला तयार नाही. मुंबईतील हे त्रिकुटंही उद्धव ठाकरेंना भाजपशी पंगा घेण्यापासून दूर ठेवतं आहे. युती तुटली तरं या त्रिकुटाला त्यांचं मंत्रिपद जाण्याची भीती वाटत आहे. मुंबईतील सत्तेशिवाय शिवसेनेचा खुळखुळा होईलं, असा एक स्वभ्रम त्या पक्षाने जोपासला आहे. म्हणजे मुंबई हीच त्यांची ताकद आणि तिच कमजोरी, असा तिढा निर्माण झाला आहे. (याचा अर्थ मुंबईतील सेनेची सत्ता जाईलच असा नव्हे.)

शिवसेना हा महाराष्ट्रातील सध्या दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. मुंबईत सत्ता नसताना राष्ट्रवादी कॉंग्रेसही जन्मला आणि वाढलाचं की. त्यामुळं सेना नेतृत्त्वानं केवळ मुंबईतील सत्तेसाठी राज्याच्या इतर भागातील लक्ष कमी करू नये, अशी या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. विधानसभा निवडणुकीप्रमाणं भाजप ऐन वेळी धोका देईल, अशी धास्ती नेतृत्त्वाला वाटतं असावी. बरं युती तोडण्याचं पाप आपल्या माथी नको, याचीही काळजी सेना घेत आहे. त्यामुळेचं भाजपच्या कलाकलानं घ्यायचं उद्धव ठाकरे यांनी ठरविलेलं दिसतयं. 
याउलटं भाजपनं गेली दोन वर्षे स्वबळाची तयारी केली. कार्यकर्त्यांना हुलवलं. त्यांनी आपापल्या परीनं वॉर्डची बांधणी केली. विधानसभा निवडणुकीच्या वेळी बूथवर उभे राहायला भाजपकडे कार्यकर्ते नसलेल्या मतदारसंघात त्या पक्षाचा उमेदवार आमदार झाला. या आमदारांनाही पुढच्या वेळी अशी लाट नसेल, याची खात्री आहे. त्यामुळं पक्षाचे कार्यकर्ते तयार होण्यासाठी व पक्ष त्या बूथवर पोचण्यासाठी महापालिका निवडणुकीचा उपयोग झाला पाहिजे. पक्षाचं चिन्हं यानिमित्ताने पोचेल. कार्यकर्त्यांची फळी तयार होईल आणि पुढच्या निवडणुकीत तिचा उपयोग होऊ शकेल. भाजपकडं सध्या इच्छुक उमेदवारांची जी रिघ लागली, त्याचं कारण हेच आहे की भाजप सध्या आघाडीवर राहणार पक्ष त्यांना वाटतो आहे. निवडणुका स्वबळावर होतील म्हणून हे कार्यकर्ते भाजपकडे गेले आहेत. पुन्हा शिवसेनेशी युती झाली तर त्या मतदारसंघातील सारी समीकरणे बदलणार आहेत. नेत्यांनी या कार्यकर्त्यांना तयार राहयाला सांगितले. आता हा प्रभाग दुसऱ्या पक्षाकडे द्यायचा म्हटल्यावर हेच कार्यकर्ते नेत्यांना शिव्या दिल्याशिवाय राहणार नाहीत. भाजप कार्यकारिणीच्या ठाण्यातील झालेल्या बैठकीत याचे सूतोवाच कार्यकर्त्यांनी केलेच. सारा महाराष्ट्र भाजपमय करून टाकण्याची त्यांची इच्छा आहे. 

फडणवीस हे एक तर ठाकरे यांना गोडगोड बोलून गाफील ठेवत असावेत किंवा त्यांच्या मनात दुसरी शंका असावी. ही शंका आतापर्यंत महाराष्ट्राच्या अनेक कॉंग्रेसच्या मराठी मुख्यमंत्र्यांना आतापर्यंत वाटत आली आहे. मुंबई ही मराठी माणसाच्या ताब्यात राहावी, असे वसंतदादा पाटील यांच्यापासून ते पृथ्वीराज चव्हाण यांनाही वाटत आले. कॉंग्रेसच्या ताब्यात गेल्यानंतर या नगरीवर परप्रांतीयांचा वरचष्मा येऊ शकतो, अशी भीती मराठी माणसाला वाटते. अशी भीती वाटण्याला आतापर्यंतचे मुख्यमंत्रीही अपवाद नसावेत. त्यामुळेच वसंतदादा पाटील यांनी शिवसेनेला फायदा होईल, असे विधान 1985 मध्ये केले होते. पृथ्वीराज चव्हाण यांनीही गेल्या निवडणुकीत शिवसेना संपेल, असे विधान करून सैनिकांना चेतविले होते. त्यामुळे सेना आपले मराठी कार्ड वापरून सत्ता टिकवून ठेवते आहे. फडणवीस यांनाही या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेविषयी सहानुभूती वाटत असावी. त्यामुळे ते जरा युतीला अनुकूल असल्याचे आता तरी चित्र निर्माण झाले आहे. हा थोडा लांबचा तर्क आहे, पण तो चुकीचाही नसावा. दुसरे वास्तव म्हणजे मुंबईत स्वबळावर लढून भाजपला अपेक्षेइतक्‍या जागा मिळाल्या नाही तर ती नॅशनल हेडलाइन ठरेल. त्यामुळे "ब्रॅड फडणवीस'ला धक्का बसू शकेल, अशीही शंका त्यांच्या मनात असावी. 

राज्यात आणि केंद्रात सत्तेत असूनही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात लढण्याची "परंपरा' खरे तर दोन्ही कॉंग्रेसने घालून दिली. त्यामुळे दोन्ही पक्ष वाढले. पंधरा वर्षे त्यांनी सलग सत्ता उपभोगली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था युती न केल्याने भाजप आणि शिवसेनेचे नुकसान होईलच, असे म्हणणे योग्य वाटत नाही. कार्यकर्त्यांचेही हेच म्हणणे आहे. मुंबईत दोन्ही पक्षांतील दुसऱ्या फळीतील नेते ज्या पद्धतीने एकमेकांवर तुटून पडत आहेत, ते पाहता युती करून ते एकमेकांना सहकार्य करतीलच, याची खात्री नाही. उलट "मित्र' पक्षाचेच उमेदवार पडण्याचे काम ते करणार. त्यापेक्षा एकमेकांच्या विरोधात लढून नंतर सत्ता स्थापनेसाठी एकत्र यायचा मार्ग खुला आहेच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com