उत्तर प्रदेशात योगी, येथे निरुपयोगी सरकार - उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

मुंबई - ""उत्तर प्रदेशात योगी सरकार आहे आणि महाराष्ट्रात निरुपयोगी सरकार आहे,'' अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. गाय वाचवण्यापेक्षा देश वाचवा, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. 

मुंबई - ""उत्तर प्रदेशात योगी सरकार आहे आणि महाराष्ट्रात निरुपयोगी सरकार आहे,'' अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. गाय वाचवण्यापेक्षा देश वाचवा, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. 

शिवसेनेच्या जिल्हा परिषदेतील लोकप्रतिनिधींचे प्रशिक्षण शिबिर बुधवारी वांद्रे येथील "रंगशारदा'मध्ये झाले. या वेळी ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच मुख्यमंत्र्यांवरही जोरदार हल्ला चढवला. "जय जवान, जय किसान' हा नारा देण्याचा अधिकार आपल्याला उरला आहे का? भाजप नव्हे, तर देश मजबूत करण्याची गरज आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली. आपला शत्रू कोण हे तुमच्या मनात पक्के झाले आहे का, असा प्रश्‍न शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना विचारून भाजपविरोधातील संघर्ष अधिक तीव्र होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. 

""सर्जिकल स्ट्राइक'ही कुचकामी ठरला आहे. जवानांचे बलिदान व्यर्थ चालले आहे. शेतकरी आत्महत्या करतो आहे. हा शेतकरी पेटून उठला, तर या देशात अणुबॉम्बपेक्षा भयंकर स्फोट होईल, तो कुणीही रोखू शकणार नाही,'' असा इशारा देतानाच राज्यातील शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे, अशी मागणीही ठाकरे यांनी या वेळी केली. 

""पाकिस्तान भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना करत आहे. आपण फक्त इशारेच देतो आहोत. एका सर्जिकल स्ट्राइकमुळे पाकिस्तान सुधारणार नाही. पाकिस्तानमध्ये घुसा, त्याचे तुकडे पाडा. कारभार देशासाठी करावा नेतृत्वाच्या पोळ्या भाजण्यासाठी नाही, अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान मोदींना सुनावले. सावरकर गायीला उपयुक्त पशू मानत, आता गायीविरोधात बोलणाऱ्याला हिंदू मानले जात नाही,'' असा टोलाही त्यांनी लगावला. 

"मुदतपूर्व निवडणुका आजच घ्या' 
शिवसेना- भाजपमधील दुरावा वाढल्यावर राज्यात मध्यावधी निवडणुकांविषयी चर्चा सुरू होते. त्याबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले, की मुदतपूर्व निवडणुका उद्या कशाला, आजच घ्या. आम्ही तयार आहोत. पूर्वी आपण कुणाला मत दिले हे मतदाराला दिसत होते. आता तो अधिकारही ईव्हीएमने हिरावून घेतला आहे, असे ठाकरे म्हणाले. 

Web Title: Yogi in Uttar Pradesh maharashtra government