ऊसतोडणीकडे पाठ; एमआयडीसीची वाट

संदीप लांडगे
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

कामगारांच्या नवीन पिढीचा शेतीपेक्षा कंपनीकडे ओढा 

औरंगाबाद-  ऊसलागवड ते गाळपापर्यंतच्या प्रक्रियेत ऊसतोडणी अतिशय कष्टाची असते. ऊन, वारा, थंडी यांची कसलीही तमा न बाळगता मिळेल त्या ठिकाणी माळांवर चटईबांबूची पालं करून किंवा उघड्यावर वस्ती करून कामगारांना राबावे लागते. त्यामुळे असे जगणे नव्या पिढीला नको आहे. त्यामुळे त्यांनी ऊसतोडणीकडे पाठ फिरवून औद्योगिक वसाहतीची (एमआयडीसी) वाट धरली आहे.

दिवाळीच्या आधी किंवा नंतर गळीत हंगामाला सुरवात होते. साधारणतः सहा ते सात महिने साखर कारखाने सुरू राहतात. या महिन्यांत दररोज पहाटे चार वाजताच उठून उसाच्या फडात जाऊन कष्टाचे काम करावे लागते. शिवाय, ऊसतोड मजूर म्हणजे सालगड्यासारखा वाटू लागल्याने नव्या उमेदीची पिढी हे काम करण्यास बिलकूल तयार नाही. ज्यांच्याकडे भरपूर शेती आहे, त्या मुलांना मुली देण्यास टाळाटाळ होत असताना ऊसतोड करणाऱ्याला मुलगी कोण देणार, हा मुद्दाही महत्त्वाचा बनला आहे. त्यामुळे कोणत्याही खासगी कंपनीत काम करण्याची त्यांची तयारी आहे. अशातच एमआयडीसीतील मोठमोठ्या कंपन्या या नव्या पिढीला रोजंदारीला पर्याय देत आहेत, अशी नोकरी प्रतिष्ठेची ठरू लागली आहे.

"मी बालपणापासून ऊसतोड करतो. यावरच मुलांचे शिक्षण, घरखर्च चालतो. मुलाचे लग्न झाल्यापासून त्याने ऊसतोडीला येण्याचे टाळले. अंगमेहनतीचे काम असल्यामुळे, त्याच्या पत्नीला उसाची मोळी बांधणे, मोळ्यांची वाहतूक करणे जमत नाही. दोघेही गाव सोडून एमआयडीसीत कामाला गेले आहेत. - मदन मंगू चव्हाण, मुकादम 

"दिवसेंदिवस ऊसतोड कामगारांची टोळी करणे अवघड जात आहे. तरुण पिढीतील मुले ऊसतोडीच्या कामास नकार देत आहेत. शहरात जाऊन कंपनीत काम करण्यास ते जास्त प्राधान्य देत आहेत. - संताराम दराडे, मुकादम 

Web Title: youngsters Reject Option of Sugercane Cutting he choose Working in MIDC