नोटाबंदीनंतर आता पुन्हा लागणार बँकांबाहेर रांगा (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

ग्राहकांची संख्या मोठी असल्याने त्यासाठी बॅंकांनी रिझर्व्ह बॅंकेकडे मुदत मागितली होती. त्यानुसार रिझर्व्ह बॅंकेने वेळोवेळी ही मुदतवाढ दिली. जून 2018 मध्ये ही मुदत संपल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेकडून पुन्हा 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत 10 दिवसांनी संपुष्टात येत आहे. 

पुणे : मॅग्नेटिक चीप असलेले डेबिट आणि क्रेडिट कार्ड ग्राहकांना बदलून देण्यासाठी बॅंकांना रिझर्व्ह बॅंकेने दिलेली मुदत 31 डिसेंबर रोजी संपुष्टात येत असल्याने आता नोटाबंदीनंतर पुन्हा एकदा ग्राहकांच्या बँकांबाहेर रांगा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या मुदतीत बॅंकांना ईव्हीएम चीप असलेले कार्ड उपलब्ध करून द्यावे लागणार आहे.

दरम्यान, कार्ड बदलून देण्यास आणखी मुदत द्यावी, अशी मागणी बॅंकांनी रिझर्व्ह बॅंकेकडे केली आहे. त्यामुळे यास मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. मॅग्नेटिक चीप असलेली कार्ड बॅंकांकडून ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टीने अशी चीप असलेले कार्ड योग्य नाहीत. त्या कार्डमधील डाटा (माहिती) सहजरीत्या हॅक केला जाऊ शकतो. हे लक्षात घेऊन रिर्झव्ह बॅंकेने 2016 मध्ये मॅग्नेटिक चीपऐवजी ईव्हीएम चीप असलेले कार्ड ग्राहकांना उपलब्ध करून द्यावेत, असे परिपत्रक काढले होते; परंतु ग्राहकांची संख्या मोठी असल्याने त्यासाठी बॅंकांनी रिझर्व्ह बॅंकेकडे मुदत मागितली होती. त्यानुसार रिझर्व्ह बॅंकेने वेळोवेळी ही मुदतवाढ दिली. जून 2018 मध्ये ही मुदत संपल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेकडून पुन्हा 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत 10 दिवसांनी संपुष्टात येत आहे. 

दरम्यान, आपले कार्ड बदलून घ्यावे, असे मेसेज बॅंकांकडून ग्राहकांना पाठविले जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यासंदर्भात राज्य सहकारी बॅंकेचे अध्यक्ष आणि बॅंकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ विद्याधर अनास्कर म्हणाले,"रिझर्व्ह बॅंकेने यासंदर्भातील परिपत्रक 2016 मध्येच काढले होते. बॅंकांच्या मागणीवरून त्याला मुदतवाढ दिली होती. ती मुदत 31 डिसेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. अनेक बॅंकांकडून यापूर्वीच कार्ड बदलून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. बॅंकांना आणखी मुदत द्यावी, अशी मागणी रिझर्व्ह बॅंकेकडे करण्यात आली आहे. ती मिळण्याची शक्‍यता आहे.''

Web Title: Your old debit card may get blocked soon