पुलवामा हल्लाप्रकरणी चाकणमध्ये तरुणाला अटक 

पुलवामा हल्लाप्रकरणी चाकणमध्ये तरुणाला अटक 

पुणे - काश्‍मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याशी संबंधित असलेल्या दोघांशी संपर्कात असल्याच्या संशयावरून बिहार दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) चाकण येथून एकास अटक केली. आरोपीचा बांगलादेशातील दोन प्रतिबंधित संघटनांशी संबंध असल्याचे चौकशीत पुढे आले आहे. दरम्यान, त्यास न्यायालयाने गुरुवारी प्रवासी कोठडी (ट्रान्झिट रिमांड) दिल्यानंतर पटना येथे हलविण्यात आले. 

शरीयत अन्वरउलहक मंडल (वय 19, मूळ, रा. बाजीपूर, नाडिया, पश्‍चिम बंगाल) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध बेकायदा हालचाल प्रतिबंधक कृत्य (यूएपीए) या कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुलवामा येथे हल्लाप्रकरणी बिहार एटीएसने बांगलादेशमधील अबू सुलतान व खैरुल मंडल या दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडे भारतीय लष्कराची सुरक्षा यंत्रणांसंबंधीच्या गोपनीय माहितीची कागदपत्रे आढळून आली होती. दोघेही बांगलादेशने बंदी घातलेल्या इस्लामिक स्टेट ऑफ बांगलादेश (आयएसबीडी) आणि जमाल उल मुजाहिदीन या दोन दहशतवादी संघटनांच्या संपर्कात होते. अबू व खैरुलच्या संपर्कामध्ये शरीयत असल्याची खबर एटीएसला मिळाली होती. 

दरम्यान, बिहार एटीएसने महाराष्ट्र एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चाकणमधील खालुंब्रे गावात सापळा रचून शरीयतला ताब्यात घेतले. स्थानिक पोलिसांना याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नव्हती. शरीयत हा चाकणमधील एका बांधकाम प्रकल्पावर मजूर म्हणून काम करत होता. त्याच ठिकाणी एका खोलीमध्ये तो वास्तव्य करत होता. गुरुवारी विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांच्यासमोर त्यास हजर करण्यात आले. त्यास ट्रान्झिट रिमांड मंजूर झाल्यानंतर पुढील चौकशीसाठी पटना येथे नेण्यात आले. 

शरीयत काय करत होता? 
शरीयत हा अबू व खैरुल या दोघांच्या संपर्कात होता. त्याचा "आयएसबीडी' व जमात उल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांशी संबंध होता. संबंधित संघटनांच्या संपर्कात राहून तरुणांना त्यामध्ये भरती करण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. त्यांनी भारतातील काही शहरांची पाहणी केल्याचीही माहिती पुढे आली आहे. 

बांगलादेशी तरुण ताब्यात 
चाकण पोलिसांनी चाकणमध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकास ताब्यात घेतले. असगरअली रफिकअली (वय 22, मूळ रा. शोरूपपूर, महेशपूर, बांगलादेश) असे संशयित आरोपीचे नाव आहे. तो भारतात बेकायदा प्रवेश करून चाकण येथे वास्तव्य करत होता. त्याने बनावट कागदपत्रांद्वारे आधारकार्ड, पॅनकार्ड काढले होते. त्याच्यावर फसवणूकप्रकरणी तसेच परकीय नागरिक कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. याप्रकरणी पोलिस कर्मचारी उद्धव गर्जे यांनी फिर्याद दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com