भाजपचा विकासाचा मुद्दा तरुणांचे आकर्षण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

मुंबई - शहराचा विकास, अत्याधुनिक सोयी-सुविधांमार्फत शहराचा तोंडावळा बदलण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुद्दा तरुण मतदारांना आकर्षित करत असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई - शहराचा विकास, अत्याधुनिक सोयी-सुविधांमार्फत शहराचा तोंडावळा बदलण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुद्दा तरुण मतदारांना आकर्षित करत असल्याचे दिसून येत आहे.

अनेक वर्षे रस्त्यातले खड्डे, तुंबलेली गटारे, वाहतूक कोंडी यामधून मार्ग काढणाऱ्या मुंबईकरांना या बाबी अंगवळणी पडल्यासारख्याच होत्या. स्मार्टफोन घेऊन फिरणाऱ्या तरुणांना यातून बदल हवा आहे. एकंदरीतच भाजप सरकारने मांडलेले बुलेट ट्रेन, मोनो-मेट्रो, ट्रान्स हार्बर सी लिंक हे मुद्दे जरी पालिका निवडणुकीशी संबंधित नसले, तरीही त्याकडे तरुणांचे लक्ष वेधले जात आहे. त्यातच काँग्रेस राजवटीच्या काळात वर्सोवा घाटकोपर मेट्रो जेमतेम सुरू झाली. मोनोची प्रगती खुंटलेलीच होती. तिचे वडाळ्यापुढील कामही बंद पडले होते. त्या पार्श्‍वभूमीवर सरकारने धडाक्‍याने पर्यावरण व अन्य प्रलंबित मुद्द्यांवर निर्णय घेऊन अडलेल्या फायली मार्गी लावल्या. त्यामुळे मोनोच्या पुढील टप्प्यांचे काम सुरू झाले. बोरिवली-अंधेरी परिसरात लिंक रोडवर अगदी चर्चगेटपासून प्रभादेवीपर्यंत, पश्‍चिम द्रुतगती महामार्गावर मेट्रोची कामे वेगाने सुरू झाले. वर्सोवा-घाटकोपर मेट्रोचे काम अत्यंत संथगतीने झाले, पण आता मेट्रो प्रकल्पांचे काम वेगाने होत असल्याचा बदल सर्वांनाच अचंबित करत आहे. या कामांमुळे सध्या वाहतूक कोंडी होत असली तरी भविष्यातील सुखद प्रवासासाठी थोडा त्रास सहन केलाच पाहिजे, असेही एकमेकांना सांगत ही तरुण मंडळी पुढील सुखद प्रवासाची स्वप्ने रंगवत आहेत.

Web Title: youth attraction BJP development point