युतीत आता "नाणार'चा अडसर

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

मुंबई - आगामी निवडणुकीसाठी युती व्हावी म्हणून भाजपने शिवसेनेला चुचकारायला सुरवात केली असून, याच प्रयत्नांचा भाग म्हणून शिवसेनेचा तीव्र विरोध असलेला नाणार रिफायनरी प्रकल्प अन्यत्र हलविण्याची तयारी सरकारने केल्याचे सांगण्यात आले.

मुंबई - आगामी निवडणुकीसाठी युती व्हावी म्हणून भाजपने शिवसेनेला चुचकारायला सुरवात केली असून, याच प्रयत्नांचा भाग म्हणून शिवसेनेचा तीव्र विरोध असलेला नाणार रिफायनरी प्रकल्प अन्यत्र हलविण्याची तयारी सरकारने केल्याचे सांगण्यात आले.

गेल्या दोन-अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या नाणार हटाव संघर्षाला यश मिळण्याची शक्‍यता आहे. कारण नाणारमध्ये उभ्या राहणाऱ्या प्रस्तावित रिफायनरीला आता रायगडमध्ये स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. प्रकल्पासाठी योग्य जमिनीचा शोध सुरू झाला असला, तरी शिवसेनेचे खासदार अनंत गिते यांचा हा मतदारसंघ असल्याने येथेही त्याला विरोध होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे प्रकल्प नेमका कुठे न्यायचा, असा पेच सरकारसमोर आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून नाणार प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे. त्यातच, शिवसेनासुद्धा या प्रकल्पाच्या विरोधात उभी राहिली असल्याने सध्या या प्रकल्पाच्या भूसंपादनाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. युतीच्या आड येणारा हा प्रकल्प स्थलांतरित करून रायगड जिल्ह्यात आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पाहणी सुरू
नाणार प्रकल्पासाठी आता रायगड जिल्ह्यातील रोहा ते माणगावदरम्यानच्या जमिनीची पाहणी करण्यात येत आहे. रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकल लिमिटेडच्या सहा अधिकाऱ्यांच्या एका पथकामार्फत पर्यायी जागेचा शोध घेतला जात आहे. राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्ससाठी याआधीच रोहा जवळच्या चमेरामध्ये एमआयडीसीने जागा संपादित केली आहे. या एमआयडीसीला लागून शेकडो एकर खासगी आणि निझामांच्या वंशजांना दिलेल्या इनामी जमीन उपलब्ध आहेत. याच जमिनीवर नाणार रिफायनरी प्रकल्पाचा नवा मुक्काम असण्याची शक्‍यता आहे.

संघर्ष समिती आक्रमक
दुसरीकडे नाणार रिफायनरी संघर्ष समिती शिवसेनेविरोधात आक्रमक झाली आहे. नाणार प्रकल्पाचा अध्यादेश रद्द केल्याशिवाय शिवसेनेने युतीची चर्चा करू नये. अन्यथा नाणार रिफायनरीविरोधी संघर्ष समितीकडून कोकणात शिवसेनेविरोधात उमेदवार देण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. कोकणातील एक लाख शिवसैनिक जाहीर कार्यक्रमात शिवबंधन सोडणार आहेत. तर, महाराष्ट्रात एक कोटी पत्रके वाटून शिवसेनेविरोधात प्रचार करणार असल्याचा इशारा संघर्ष समितीने शिवसेना खासदार, आमदारांना पत्राद्वारे दिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेसमोरही नाणारचे आव्हान आहे.

Web Title: Yuti Problem by Nanar project