युतीसाठी भाजपला शिवसेनेच्या नाकदुऱ्या काढाव्या लागणार!

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 12 डिसेंबर 2018

मुंबई - पाच राज्यांच्या निकालाचे देशभर राजकीय पडसाद उमटणार असून, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युतीसाठी शिवसेनेच्या नाकदुऱ्या भाजपला काढाव्या लागणार आहेत. कॉंग्रेस पक्षाने तीन राज्यांत दमदार कामगिरी केल्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात आणि केंद्रात मित्रपक्ष म्हणून शिवसेनेची गरज भासणार आहे. भाजपची राजकीय अपरिहार्यता शिवसेना ओळखून असल्यामुळे युती करण्यासाठी भाजपने आग्रही पुढाकार घेतला तरीही शिवसेना आपली राजकीय "बार्गेनिंग पॉवर' नक्‍कीच वाढवणार असल्याचे मानले जाते.

मिझोराम, तेलंगण, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक निकालाकडे 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचा उपांत्य फेरीच्या सामन्याचा निकाल म्हणून राजकीय वर्तुळात पाहिले जात आहे. यात राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश या तीन राज्यांत कॉंग्रेस पक्षाला संजीवनी मिळाली आहे. यामुळे भाजपपुढे नवे आव्हान यापुढील काळात राहणार आहे. परिणामी भाजपला जास्तीत जास्त घटक पक्षांची गरज भासणार आहे. यामुळे पुढील काळात भाजपला शिवसेनेबरोबर युती करायची झाली तर शिवसेनेच्या मनाप्रमाणे वागावे लागणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. चार वर्षांत शिवसेनेला सत्तेत राहुनही भाजपने चांगली वागणूक दिली नाही, याची सल शिवसेनेच्या मनात आहे. याबरोबर शिवसेना पक्षप्रमुख यांनी यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर केले आहे, तर भाजपला शिवसेनेची साथ हवी असल्याचे भाजपच्या सर्व नेत्यांनी जाहीर केले आहे. यामुळे बदलेल्या राजकीय वातावरणाचा झोक पाहता शिवसेना भाजपने दिलेल्या मागील चार वर्षांच्या वागणुकीचे उट्टे काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मानले जाते.

Web Title: Yuti Shivsena BJP Politics