तुमच्या शहरात या दिवशी दिसणार शून्य सावली

जयपाल गायकवाड
शनिवार, 13 मे 2017

राज्यात सात मे पासून विविध जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या तारखेला दुपारी बारा वाजता सुर्य ९० अंशाच्या कोनात डाेक्यावर येणार असल्याने शुन्य सावलीचा अनुभव नागरिकांना घेता येणार आहे.

नांदेड - महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरात सात मे पासून वेगवेगळ्या तारखेला दुपारी १२ वाजता सुर्य अगदी ९० अंशाच्या कोनात डोक्यावर येणार आहे. त्यामुळे सावली गायब होण्याचा अनुभव नागरिकांना घेता येणार आहे. नांदेडात हा अनुभव मंगळवार (ता. १६) राेजी येणार आहे.

पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडेच्या भागात तर कर्क वृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्‍यावर येत नाही. तो सदैव क्रमशः उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो. पण या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्‍यावर आलेला अनुभवयाला मिळतो. जेव्हा सूर्य बरोबर डोक्‍यावर असतो, तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू काही ती सावली गायब होते. शून्य सावलीचा हा एक रोमांचकारी अनुभव आहे.

आपल्या पृथवीचा अक्ष हा २३.३० अंशाने कलला आहे. त्यामुळे आपण सुर्याचे दक्षिणायण, उतरायण व दिवसाचे लहान मोठे होणे हे अनुभवत असतो. याचाच परिणाम म्हणून सावलीचा अनुभवसुध्दा आपल्याला येतो. भारत उत्तरगोलार्धात असून गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्‍चिम बंगाल, त्रिपुरा व मिझोरम या प्रांतातून कर्कवृत्ताची रेषा गेली आहे. तेव्हा भारताच्या दक्षिण टोकाकडून सुर्य क्रमाक्रमाने सरकत जाऊन या रेषेपर्यंत २१ जूनला डोक्यावर आलेला असेल. त्यापुढील उत्तरेकडील प्रदेशात सुर्य कधी डोक्यावर येणार नाही. सात मे पासून राज्यातील वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या दिवशी दुपारी १२ वाजता सुर्य अगदी डोक्यावर येणार आहे. १६ मे रोजी नांदेड शहरात शुन्य सावलीचा अनुभव नागरिकांना घेता येणार आहे. दुपारी वाजता सुर्य अगदी डोक्यावर येणार असल्याने आपली सावली आपल्या पायातच राहील. सरळ उभ्या वस्तुची तर सावली दिसणार नाही.

राज्यातील या शहरात शून्य सावली दिवस

 • ०७ मे - कोल्हापूर, मिरज, सांगली.
 • १० मे - सातारा, अक्कलकोट.
 • ११ मे - वाई, महाबळेश्‍वर. १२ मे - बार्शी, बारामती.
 • १३ मे - लातूर.
 • १४ मे - अलिबाग, दौंड, पुणे.
 • १५ मे - मुंबई.
 • १६ मे - नगर, कल्याण, नांदेड, ठाणे.
 • १८ मे - पैठण.
 • १९ मे - जालना.
 • २० मे - औरंगाबाद, नाशिक.
 • २१ मे - मनमाड.
 • २२ मे - यवतमाळ.
 • २३ मे - बुलडाणा, मालेगाव.
 • २४ मे - अकोला.
 • २५ मे - अमरावती.
 • २६ मे - भुसावळ, जळगाव, नागपूर.

राज्यात सात मे पासून विविध जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या तारखेला दुपारी बारा वाजता सुर्य ९० अंशाच्या कोनात डाेक्यावर येणार असल्याने शुन्य सावलीचा अनुभव नागरिकांना घेता येणार आहे. शुन्य सावली बाबत अधिक माहिती घेण्यासाठी महात्मा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील खगोलशास्त्र व अंतराळ तंत्रज्ञान केंद्रात मंगळवारी (ता.१६) दहा ते बाराच्या दरम्यान एमजीएम महाविद्यालयात यावे. गेल्यावर्षीही शुन्य सावलीचा अनुभव नागरिकांनी घेतला होता.
- श्रीनिवास औंधकर, संचालक, खगोलशास्त्र व अंतराळ तंत्रज्ञान केंद्र, एमजीएम नांदेड.

Web Title: zero shadow you see in this day in Maharashtra