जिल्हा परिषदांत भाजप-शिवसेना एकी शक्‍य 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 मार्च 2017

मुंबई - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेत भाजप आणि शिवसेना एकत्र येण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही तसा सूर आळवण्यात आला असून, एकत्र आल्यास युतीला राज्यातील सोळा ते सतरा जिल्हा परिषदांमध्ये आणि बहुतांश पंचायत समित्यांमध्ये सत्ता स्थापन करता येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुजोरा दिला. 

मुंबई - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेत भाजप आणि शिवसेना एकत्र येण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही तसा सूर आळवण्यात आला असून, एकत्र आल्यास युतीला राज्यातील सोळा ते सतरा जिल्हा परिषदांमध्ये आणि बहुतांश पंचायत समित्यांमध्ये सत्ता स्थापन करता येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुजोरा दिला. 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेत रुंदावलेली दरी कमी करण्याचे प्रयत्न आता सुरू झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर निवडणुकीत भाजपने अनपेक्षितपणे शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करून साखर पेरणीचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईत भाजप महापौरपदासाठी उमेदवार देणार नाही, असा निर्णय जाहीर केला होता. त्यामागे राज्य सरकारला स्थिरता देतानाच राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांची सत्ता हस्तगत करण्याची भाजपची रणनीती स्पष्ट आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीतही शिवसेनेसोबत युती करण्याच्या निर्णयावर भाजपच्या नेत्यांमध्ये बराच खल झाला. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निकालात खूपच त्रांगडे झाले आहे. 25 पैकी 18 जिल्हा परिषदांमध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. केवळ सात जिल्हा परिषदांमध्ये विशिष्ट एका पक्षाला बहुमत आहे. उर्वरित सर्व जिल्हा परिषदांमध्ये एकीकडे भाजप-शिवसेनेला आणि दुसऱ्या बाजूला कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला एकत्र यावे लागणार अशी परिस्थिती आहे. जिल्हा परिषदांमधील सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजप आणि शिवसेनेत मात्र अजूनही संभ्रमाचे वातावरण होते. शिवसेनेच्या दृष्टीने मुंबई महापालिका प्रतिष्ठेची आहे हे ओळखून भाजपने दोन घरे मागे येत शिवसेनेचा मार्ग मोकळा केला. आता जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी भाजपने पुढची रणनीती स्पष्ट केली आहे. वर्धा, चंद्रपूर, लातूर अशा तीन जिल्हा परिषदांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे, तर शिवसेनेला रत्नागिरी जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे उर्वरित किमान नऊ जिल्हा परिषदांमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास जिल्हा परिषदांवर युतीची सत्ता येणार आहे. 

युतीला सत्तेची संधी 
सर्वाधिक सदस्य असलेल्या पक्षाचा अध्यक्ष आणि दोन नंबरची सदस्यसंख्या असलेल्या पक्षाचा उपाध्यक्ष, तसेच इतर विषय समित्यांमध्ये युतीचा फॉर्म्यूला निश्‍चित होणार आहे. या सूत्रानुसार कोल्हापूर, सांगली, जालना, औरंगाबाद, बुलडाणा आणि गडचिरोलीमध्ये भाजपचा अध्यक्ष होऊ शकणार आहे, तर यवतमाळ, नाशिक आणि हिंगोलीमध्ये शिवसेनेचा अध्यक्ष होऊ शकणार आहे. या तेरा जिल्हा परिषदांसह आणखीही तीन ते चार जिल्हा परिषदांमध्ये भाजप आणि शिवसेनेची सत्ता येऊ शकेल, असा दावा केला जात आहे. तसेच संख्याबळाच्या आधारावर 283 पैकी बहुतांश पंचायत समित्यांमध्येही युतीला सत्तेची संधी आहे. 

Web Title: Zilla Parishad, Shiv Sena-BJP unity possible