'शतप्रतिशत'ला शह देण्याची तयारी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 11 मार्च 2017

झेडपीत भाजपविरोधात कॉंग्रेस- "राष्ट्रवादी'- शिवसेनेची खेळी

झेडपीत भाजपविरोधात कॉंग्रेस- "राष्ट्रवादी'- शिवसेनेची खेळी
मुंबई - भाजपच्या "शतप्रतिशत'च्या राजकारणाला शह देण्यासाठी राज्यातल्या बहुतांश जिल्हा परिषदांत नवी समीकरणे अस्तित्वात येण्याची चिन्हे आहेत. जिल्हा परिषदांत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना असे सूत जुळण्याची शक्‍यता असून, त्या दिशेने स्थानिक कार्यकर्त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. 25 पैकी जवळपास 20 ते 22 जिल्ह्यांमध्ये भाजपसोबत युती करण्यास कोणत्याही स्थानिक पदाधिकाऱ्यांची तयारी नसल्याने पक्षाचे वरिष्ठ नेतेही हवालदिल झाले आहेत. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आघाडीचा समेट झालेला असला, तरी शिवसेना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राजकीय कुरघोडीची स्पर्धा तीव्र होत असल्याचे चित्र आहे.

ज्या जिल्हा परिषदांत शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय भाजपला सत्तेत जाणे अशक्‍य आहे, त्या सर्व जिल्ह्यांत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपसोबत युती नको, असा ठाम पवित्रा घेतला आहे. भाजपचे केवळ पाच जिल्हा परिषदांत बहुमत आहे, तर नऊ जिल्हा परिषदांत भाजप क्रमांक एकचा पक्ष आहे. मात्र, इतर नऊ जिल्ह्यांत भाजपला शिवसेनेच्या मदतीशिवाय सत्ता स्थापन करणे शक्‍य नसल्याने युद्धात जिंकलेल्या भाजपला आता तहात नमवण्याची राजकीय खेळी सुरू झाली आहे.
भाजपला जळगाव, वर्धा, बुलडाणा व लातूर या जिल्हा परिषदांत पूर्ण बहुमत आहे; तर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला सिंधुदुर्ग, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, बीड, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, अमरावती, गडचिरोली व कोल्हापूरमध्ये सत्ता स्थापन करण्याची संधी आहे.

भाजप- शिवसेनेला युती करून जळगाव, सांगली, वर्धा, चंद्रपूर, जालना, लातूर, हिंगोली, बुलडाणा, कोल्हापूर, औरंगाबाद, यवतमाळ, हिंगोली व नाशिकमध्ये; तर शिवसेनेला रायगडमध्ये शेकापसोबत सत्तेची संधी आहे. नाशिक व यवतमाळमध्ये शिवसेनेला भाजपच्या मदतीशिवाय सत्ता मिळवणे कठीण आहे, तर भाजपला जालना, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगलीमध्ये शिवसेनेशिवाय सत्ता मिळवणे कठीण आहे.

Web Title: zp oppose to bjp by shivsena, congress & ncp