‘पानिपत’ चित्रपटाचा मार्ग अखेर मोकळा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

ऐतिहासिक घटनांचा दाखला देताना त्यावर स्वतःचा हक्क सांगणे चुकीचे आहे, असे मत मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले. ‘पानिपत’ कादंबरीचे लेखक विश्‍वास पाटील यांना ‘पानिपत’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत तूर्तास कोणताही दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबई : ऐतिहासिक घटनांचा दाखला देताना त्यावर स्वतःचा हक्क सांगणे चुकीचे आहे, असे मत मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले. ‘पानिपत’ कादंबरीचे लेखक विश्‍वास पाटील यांना ‘पानिपत’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत तूर्तास कोणताही दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा मार्ग मोकळा झाला आहे.

ज्येष्ठ साहित्यिक विश्‍वास पाटील यांनी ‘पानिपत’ चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका केली आहे. या चित्रपटातील मूळ कल्पना, पात्रे आणि प्रसंग मूळ कांदबरीतून विनापरवानगी घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी याचिकेत केला आहे. ‘पानिपत’ कादंबरी १९८८ मध्ये प्रकाशित झाल्यानंतर मराठ्यांच्या या संग्रामाला शूरवीरांचा लढा म्हणून पाहिले जात आहे. त्याआधी या लढाईची ओळख वेगळी होती. त्याचबरोबर चित्रपटाच्या तीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये दाखवलेला सदाशिवराव आणि पार्वती यांच्यातील प्रसंग आणि कांदबरीतील प्रसंग यांच्यात साधर्म्य असल्याचा दावा त्यांनी याचिकेत केला आहे.

फक्त तीन मिनिटांच्या ट्रेलरमधून चित्रपटाबाबत असा अंदाज व्यक्त करणे अयोग्य आहे, अशी बाजू निर्मात्यांच्या वतीने ॲड्‌. रवी कदम यांनी मांडली. त्यानंतर न्या. एस. सी. गुप्ते यांनी ‘पानिपत’कार विश्‍वास पाटील यांना तूर्तास दिलासा देण्यास नकार दिला. चित्रपटातील प्रसंगांबाबत आक्षेप घेण्यासाठी पुरेसे दाखले देणे आवश्‍यक आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. या याचिकेवर पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the movie 'Panipat' is finally free to release