पुलंमुळेच रंगभूमीवर यशस्वी पाय रोवले! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

अभिनेते भरत जाधव यांचे भावोद्‌गार

मुंबई : पुलंचा अभिनय, पुलंचे लेखन वाचत आम्ही घडत गेलो. आमच्यासारख्यांच्या पिढ्या पुलंच्या नाटक, लेखनावर पोसल्या गेल्या आहेत. पुलंचे एक तरी पात्र साकारावे, अशी प्रत्येक नवोदित कलाकाराची इच्छा असते. पु. ल. देशपांडे आजच्या काळातही आमच्यासाठी आदर्श आहेत. त्यांच्यामुळे आज आम्ही रंगभूमीवर यशस्वी पाय रोवू शकलो, अशा भावना अभिनेते भरत जाधव यांनी व्यक्त केल्या. 

पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रभादेवीच्या पु. ल. देशपांडे कला अकादमीत पु. ल. महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाची सांगता नुकतीच हिमालयाची सावली या नाटकाने करण्यात आली. समारोपाच्या कार्यक्रमात अभिनेते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव भूषण गगराणी, अभिनेते शरद पोंक्षे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे आदी मान्यवर उपस्थित होते. 

महाविद्यालयात एकांकिकांमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा नुसता बागडत होतो. असे नुसते बागडून उपयोग नाही, बेरिंग घ्यायला हवे असे जेव्हा मला सुचवण्यात आले, तेव्हा पहिले पुलंचे बटाट्याची चाळ हे पुस्तक हाती घेतले, अशी आठवण सिद्धार्थ जाधव यांनी या वेळी सांगितली. 

शरद पोंक्षेंची कर्करोगावर मात

शरद पोंक्षे कर्करोगाचा सामना करून पुन्हा रंगभूमीवर परतले. त्यांच्या या संघर्षासाठी संपूर्ण प्रेक्षागृहातील प्रेक्षकांनी उभे राहून त्यांना दाद दिली. प्रेक्षकांचा मिळालेला हा भरभरून प्रतिसाद पाहून शरद पोंक्षे यांनी नतमस्तक होऊन रसिकांचे आभार मानले. या पु. ल. महोत्सवाची सांगता वसंत कानेटकर यांच्या "हिमालयाची सावली' या अजरामर नाटकाने करण्यात आली. शरद पोंक्षे यांनी या नाटकातून रंगभूमीवर पुनरागमन केले. त्यांचा अभिनय पाहण्यासाठी संपूर्ण रवींद्र नाट्य मंदिर खचाखच भरले होते. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: p. l. deshpande is the one who is behind my success