परप्रांतीय मजुरांनी केले ट्विट; अन् अभिनेता सोनू सूद मदतीसाठी आला धावून... 

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 23 May 2020

कोरोना विषाणूने देशभरात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सगळी कामं ठप्प झाली आहेत. अशातच मजुरांचे बरेच हाल होत असल्याने त्यांनी आता आपल्या घरची वाट धरली आहे. काहीजण पायीच प्रवास करून आपल्या घरी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

मुंबई : कोरोना विषाणूने देशभरात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सगळी कामं ठप्प झाली आहेत. अशातच मजुरांचे बरेच हाल होत असल्याने त्यांनी आता आपल्या घरची वाट धरली आहे. काहीजण पायीच प्रवास करून आपल्या घरी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारही त्यांच्या परीने या मजुरांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या मजुरांना मदत करण्यासाठी बॉलीवूडमधील अनेक कलाकारही पुढे आले आहे. आता मजुरांच्या मदतीसाठी अभिनेता सोनू सूद देखील पुढे आला आहे. तो त्याच्या परीने जमेल तितकी मदत मजुरांना करत आहे.

मोठी बातमी ः दररोज हजार पंधराशे कोरोना रुग्ण वाढणाऱ्या मुंबईत 'मे' महिन्याच्या अखेरीस इतकी असेल रुग्णसंख्या...

काही मजुर पायीच प्रवास करून आपल्या गावी पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच सोनूने अनेक मजुरांना त्यांना त्यांच्या गावी पोहचवण्याची जबाबदारी घेतली आहे. आता पुन्हा एकदा सोनूने ट्विटरच्या माध्यमातून घरी जाऊ इच्छिणाऱ्या मजुरांशी संपर्क साधला आहे आणि त्यांची मदत केली आहे. अनेक मजुरांनी ट्विटरद्वारे सोनूकडून त्यांच्या गावी जाण्यासाठी मदत मागितली आहे आणि सोनूने त्यांना त्याच्या गावी पोहचवण्याचे वचन दिले आहे.

मोठी बातमी ः कोरोनाने मुंबईतली नोकरी गेली; चक्री वादळाने बंगालमधील घरही उद्धवस्त झाले

बिहारमध्ये राहणाऱ्या एका मजुराने ट्विट करत सोनूकडून मदत मागितली आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिले आहे की,' मी बऱ्याच दिवसांपासून पोलिस स्टेशनमध्ये फॉर्म घेऊन फेऱ्या मारत आहोत, पण आमचं काम होत नाही आहे. आम्ही धारावीला राहतो आणि आम्ही बिहारला जायचे आहे.' या मजुराच्या ट्विटवर सोनू उत्तर देत म्हणाला की, 'पोलिस स्टेशनला फेऱ्या मारणं बंद करा आणि रिलॅक्स व्हा. दोन दिवसात तुम्ही तुमच्या बिहारच्या घरी पोहचाल. डिटेल्स पाठवा.'  याशिवाय दुसऱ्या ट्विटमध्ये एका मजुराने लिहिले की, 'सोनू सूद सर पूर्व यूपीमध्ये आम्हाला कुठेही नेऊन सोडा. तेथून आम्ही आमच्या गावी चालत जाऊ.' यावर सोनू म्हणाला आहे की, 'मित्रा चालत जाण्याची गरज पडणार नाही. नंबर पाठवा तुमचा.' अशाप्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनू मजुरांना मदत करत आहे.

मोठी बातमी ः कोरोना झाल्यास पोलिसांवर तातडीने उपचार होणार, महाराष्ट्र कुटूंब आरोग्य योजनेत कोव्हिडचा समावेश

याशिवाय एका मजुराने सोनू करत असलेल्या मदतीची तुलना दिवंगत माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी करून सोनूची स्तुती केली आहे, त्याचे आभारही मानले आहेत. त्याने लिहिले की, 'एक सुषमा स्वराज होत्या ज्या परदेशात अडकलेल्या व्यक्तींना आपल्या देशात घेऊन आल्या आणि एक सोनू सूद आहे जो देशात अडकलेल्या मजुरांना त्यांना त्याच्या घरी पोहचवत आहेत. मी चोवीस तासांसाठी सोनूचा फोटो माझ्या प्रोफाइलवर ठेवणार आहे. खूप प्रेम सोनू.' यावर सोनूने मजेशीर उत्तर दिलं आहे. त्याने या ट्विटवर लिहिले आहे की, 'फक्त चोवीस तासांसाठी नको, आयुष्यभरासाठी माझा फोटो तुमच्या मनात प्रोफाइल फोटो बनवून ठेव.' 

मोठी बातमी ः शहरात कोरोनाचे संकट; तर गावाकडे चाकरमान्यांसमोर अडचणींचे डोंगर

याआधी सोनूने बिहारच्या अनेक मजुरांना त्याच्या घरी बसने पाठवले आहे. ट्विटरच्या माध्यमातून जे मजूर त्यांच्याशी संपर्क करत आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला सोनू मदत करत आहेत. त्याने जुहू येथील त्याचं हॉटेलही आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी खुले केले आहे. याशिवाय जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झाले आहे, तेव्हापासून त्याच्या वडिलांच्या नावाने तो रोज 45 हजार लोकांना जेवण देत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sonu sood helps migrants to reach their home via twitter