नवा चित्रपट : बियाँड द क्‍लाउड्‌स 

Beyond The Clouds
Beyond The Clouds

गुन्हेगारी विश्‍व आणि माणुसकीचा गहिवर... 

मुंबईतील एका फ्लाय ओव्हरवर दोन माणसं भेटतात. पार्श्‍वभूमीवर मुंबईतील सुबत्ता, भव्य होर्डिंग्ज व त्यावरील महागड्या उत्पादनांच्या जाहिराती लक्ष वेधून घेतात. कॅमेरा फ्लाय ओव्हरवरून खाली येऊन मुंबईतील झोपडपट्टीतील विश्‍वावर येऊन स्थिरावतो आणि शेवटपर्यंत तिथंच राहतो... या विश्‍वामध्ये भरून राहिलेली गरिबी, गुन्हेगारी यांच्या पार्श्‍वभूमीवर जिवापाड जोपासल्या जाणाऱ्या माणुसकीचं हेलावून टाकणारं, विचार करायला लावणारं दर्शन चित्रपटभर होत राहतं... इराणचे विख्यात दिग्दर्शक माजिद माजिदी यांचे चित्रपट पाहणं हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील प्रेक्षकांसाठी आनंदानुभव असतो. माजिदी यांचा पहिलाच भारतीय चित्रपट 'बियाँड द क्‍लाउड्‌स' एका वेगळ्याच विश्‍वाची अनोखी सैर घडवून आणतो. हा चित्रपट झोपडपट्टीतील चित्रणावरच भर देत असला, तरी तो 'स्लमडॉग मिलेनिअर'प्रमाणं गरिबी आणि गुन्हेगारीचं ओंगळवाणं चित्र मांडत नाही. खिशात दमडी नसली, तरी आपल्या माणसांसाठी, प्रेमासाठी, मायेचा ओलावा अनुभवण्यासाठी मनुष्य काय त्याग करू शकतो याचं नेटकं दर्शन चित्रपट घडवतो. इशान खट्टर (शाहीद कपूरचा धाकटा भाऊ) आणि मालविका मोहन या नव्या दमाच्या कलाकारांची जबरदस्त कामगिरी आणि ए. आर. रहेमान यांचं संगीत यांमुळं चित्रपट लक्षात राहतो. 

आमीर (इशान खट्टर) हा मुंबईच्या झोपडीत राहणारा, अमली पदार्थांचा चोरटा व्यवसाय करणार तरुण. अनेक समस्या असूनही तो मोठी स्वप्न पाहतो. तारा (मालविका मोहन) ही त्याची बहिण, मात्र आई-वडिलांच्या मृत्युनंतर त्यांचं विश्‍व वेगळं झालं आहे. त्यातच स्वत:ची अब्रू वाचवताना ताराच्या हातून एक गुन्हा घडतो आणि कथा मोठं वळण घेते. ताराला वाचविण्यासाठी आमीरला आपलं सर्वस्व पणाला लावावं लागतं, स्वत:मध्ये आमूलाग्र बदल घडवून आणावे लागतात. आमीरचं बदलत चाललेलं विश्‍व आणि ताराला तुरुंगात आलेले अनुभव याचा समांतर पट दिग्दर्शक अत्यंत तरलपणे उभा करतो. 

माजिद माजिदी यांचे 'चिल्ड्रेन ऑफ हेवन' ' द कलर ऑफ पॅरेडाईज' किंवा 'द सॉंग ऑफ स्पॅरोज'सारखे चित्रपट पाहिलेल्यांना त्यांची कथेची हाताळणी सुपरिचित आहे. मानवी भावभावनांचे अनेक पदर उलगडून दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आमीर आणि ताराचं विस्तारत गेलेलं भावविश्‍व आणि त्यातून मानवी स्वभावाचे गूढ कंगोरे दिग्दर्शक दाखवत जातो. यात अनेकदा मूळ कथा कोणती, असा संभ्रमही निर्माण होतो. मात्र, अबोलपणे एकमेकांचं आयुष्य समृद्ध करू पाहणारी अनेक पात्रं कथेत जुळत जातात आणि प्रेक्षक त्यांत गुंतून जातो. तुरुंगातील एक अभागी महिला, तिचा कोठडीत जन्मलेला व त्यामुळं गोष्टीतला चंद्र कधीतरी प्रत्यक्षात पाहण्याची इच्छा असलेला मुलगा, मृत्यूशी लढणाऱ्या एका गुन्हेगाराचं रस्त्यावर आलेलं कुटुंब, आमीरचा मित्र ही पात्रं माणुसकीच्या अविश्‍वसनीय गोष्ट सांगतात. आमीर व ताराची पुन्हा एकत्र येण्यासाठीची धडपडणं एका पातळीवर सुरू असली, तरी ती दुय्यम ठरते. कथेचा शेवटही दिग्दर्शक या दोघांच्या समृद्ध झालेल्या विश्‍वाची साक्ष देतच करतो. माजिदी यांची प्रकाश व सावल्यांचा खेळ करीत प्रसंग जिवंत करण्याची हातोटी, अनिल मेहता यांचा मुंबईतील झोपडपट्टीतून बेमालूमपणे फिरणारा (आणि ओंगळवाणं दृश्‍यं टाळणारा) कॅमेरा व ए. आर. रहेमानचं संगीत यांमुळं कथा अधिक तीव्रतेने प्रेक्षकांपर्यंत पोचते. 

इशान खट्टर यानं पदार्पणातच केलेला अभिनय त्याच्याबद्दलच्या अपेक्षा खूप उंचावतो. पीळदार शरीर व जोरदार हालचालींमुळं गुन्हेगारी प्रवृत्तीचा आमीर उभं करणं त्याला अधिक सोपं गेलं आहे. नैराश्‍याच्या एका टप्प्यावर स्वत:च उभं केलेलं छोटसं विश्‍व उधळून टाकताना त्यानं केलेला अभिनय केवळ अप्रतिम. मालविका मोहननं साकारलेली ताराची भूमिका आव्हानात्मक आहे आणि तिनं तिला पूर्ण न्याय दिला आहे. तनिष्ठा चटर्जी छोट्या भूमिकेतही लक्षात राहते. जी. व्ही. शारदा या ज्येष्ठ तमीळ अभिनेत्रीनं साकारलेली वृद्धाही लक्षवेधक. 

एकंदरीतच, परदेशी दिग्दर्शकाचा (पुन्हा एकदा) भारतातील गरिबी व गुन्हेगारीचंच विश्‍व उभा करणारा, मात्र या विश्‍वातील माणुसकीचा गहिवरही मांडणारा हा वेगळा चित्रपट त्यातील तांत्रिक अंग, अभिनय व दिग्दर्शनासाठी पाहायला हवा. 

  • निर्मिती : शरीन मंत्री केडिया 
  • दिग्दर्शक : माजिद माजिदी 
  • भूमिका : इशान खट्टर, मालविका मोहन, तनिष्ठा चटर्जी, जी. व्ही. शारदा आदी.

श्रेणी : 3

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com