लग्नाच्या नाट्याची मनोरंजक कहाणी टी टी एम एम (तुझं तू माझं मी)

संतोष भिंगार्डे
शनिवार, 17 जून 2017

हल्ली मराठी चित्रपटसृष्टीमध्ये लग्न हा कॉमन फॅक्‍टर झालेला आहे आणि त्याच विषयाभोवती फिरणारे चित्रपट येत आहेत. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर "चि. व चि. सौ. कां'; तसेच "मुरांबा' असे काही चित्रपट त्याच पठडीत मोडणारे होते. मात्र, प्रत्येकाचा आशय आणि विषय वेगळा होता. प्रत्येकाची हाताळणी वेगळी होती आणि म्हणूनच हे चित्रपट प्रेक्षकांना भावलेले आहेत. तद्दन कौटुंबिक असे ते चित्रपट होतेच आणि ते आजच्या तरुण पिढीला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेले होते. त्यांचे विचार आणि जीवनशैली मांडणारे होते. कारण आजची पिढी खूप हुशार आणि तल्लख आहे. स्वतंत्रपणे विचार करणारी आणि आपल्या करिअरकडे गांभीर्याने पाहणारी आहे.

हल्ली मराठी चित्रपटसृष्टीमध्ये लग्न हा कॉमन फॅक्‍टर झालेला आहे आणि त्याच विषयाभोवती फिरणारे चित्रपट येत आहेत. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर "चि. व चि. सौ. कां'; तसेच "मुरांबा' असे काही चित्रपट त्याच पठडीत मोडणारे होते. मात्र, प्रत्येकाचा आशय आणि विषय वेगळा होता. प्रत्येकाची हाताळणी वेगळी होती आणि म्हणूनच हे चित्रपट प्रेक्षकांना भावलेले आहेत. तद्दन कौटुंबिक असे ते चित्रपट होतेच आणि ते आजच्या तरुण पिढीला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेले होते. त्यांचे विचार आणि जीवनशैली मांडणारे होते. कारण आजची पिढी खूप हुशार आणि तल्लख आहे. स्वतंत्रपणे विचार करणारी आणि आपल्या करिअरकडे गांभीर्याने पाहणारी आहे. आपला जोडीदार निवडतानाही त्यांची काही खास मते आहेत आणि ही मंडळी आपल्या मतांवर ठाम आहेत. "टी टी एम एम' अर्थात "तुझं तू माझं मी' हा चित्रपट तद्दन कौटुंबिक चित्रपट असला, तरी आजच्या तरुण पिढीची मतमतांतरे व्यक्त करणारा आहे. 

जय (ललित प्रभाकर) आणि राजश्री (नेहा महाजन) ही आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारी जोडी. त्यांच्या प्रेमाची अनोखी कहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे. 
या चित्रपटाचा नायक जय (ललित प्रभाकर) हा एका बिझनेसमनचा मुलगा असतो. त्याला विविध देश फिरण्याची आणि तेथील संस्कृती जाणून घेण्याची आवड असते. तब्बल 21 देश तो फिरलेला असतो आणि आणखीन काही देश फिरण्याची त्याची इच्छा असते; मात्र त्याची आई त्याच्यामागे लग्न कर लग्न कर अशी भुणभुण लावत असते. पुढे ती एवढ्यावरच थांबत नाही, तर एके दिवशी त्याचे लग्न ठरविले जाते. खरे तर जयला हे लग्न करायचेच नसते. त्यामुळे चक्क लग्नाच्या दिवशी तो मंडपातून पळून जातो. दुसरीकडे राजश्रीची आई तिला वारंवार लग्न कर... लग्न कर असे सांगत असते. कित्येक स्थळे तिच्याकरता पाहत असते; परंतु राजश्रीला एकही स्थळ पसंत पडत नाही. कारण एखादा राजयोग आपल्या नशिबात येईल, असे तिला वाटत असते; परंतु हा राजयोग येण्यापूर्वीच ती घरातून पळून जाते. 

मग काय... राजश्री आणि जयची एका गाडीत होणारी भेट. सुरुवातीला त्यांच्यामध्ये उडणारे खटके, त्यांच्या घरातील मंडळींना त्यांची लागलेली चिंता, गोव्यात पोलिसांनी पकडल्यानंतर पोलिस अधिकारी बांदेकर (भारत गणेशपुरे) यांनी जय आणि राजश्री यांच्याबाबतीत घेतलेला एक निर्णय आणि त्यानंतर त्या दोघांचा उडालेला गोंधळ... अशा काही अन्य घडामोडींसह चित्रपट पुढे सरकत जातो. दिग्दर्शक कुलदीप जाधवचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे आणि त्याने चांगला प्रयत्न केला आहे. ललित प्रभाकर आणि नेहा महाजन ही ताज्या दमाची जोडी त्याने मराठी सिनेक्षेत्रात आणली आहे. जय आणि राजश्रीच्या अचानक निघून जाण्याने त्यांच्या घरच्या मंडळींची होणारी घालमेल, त्यानंतर त्यांच्यामध्ये निर्माण झालेला एक कौटुंबिक बंध, एकूणच परिस्थिती बदलत असताना या सगळ्या पात्रांमधले बदल... वगैरे बाबी दिग्दर्शकाने छान टिपल्या आहेत. ललित आणि नेहाच्या अभिनयालाही दाद द्यावीच लागेल. त्यांनी आनंद आणि त्यानंतर मनाची होणारी घालमेल वगैरे बाबी पडद्यावर छान रेखाटल्या आहेत. अल्लड, अवखळ आणि स्वतःच्या मतावर ठाम असलेली राजश्रीची भूमिका नेहाने चोख बजावली आहे. त्याशिवाय विद्याधर जोशी, सतीश पुळेकर, सविता प्रभुणे, सीमा देशमुख, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, पुष्कर लोणारकर, शर्वरी लोहकरे, पुष्कराज चिरपूटकर या कलाकारांनीही आपली जबाबदारी चोख पार पाडलेली आहे. पुष्कर लोणारकरचे कौतुक करावे लागेल. कारण चि. व चि. सौ. कां आणि टी टी एम एम या दोन्ही चित्रपटांत तो कमालीचा भाव खाऊन गेला आहे. चित्रपटाच्या संगीताबाबत बोलायचे झाले, तर पंकज पडघन या संगीत दिग्दर्शकाने मस्त सुमधुर गाणी या चित्रपटाला दिली आहेत. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी छान असली, तरी काही चुका या चित्रपटात नक्कीच आहेत. चित्रपटाचा पूर्वार्ध छान आहे. उत्तरार्धात मात्र चित्रपट काहीसा संथ वाटतो. कौटुंबिक चित्रपटांच्या रांगेतला हा अजून एक वेगळा प्रयोग म्हणता येईल. एकूणच एका लग्नाच्या नाट्याची ही मनोरंजक कहाणी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi movie TTMM review

व्हिडीओ गॅलरी