नवा चित्रपट : मलंग : अनेक स्वाद, सब बकवास...

Malang
Malang

चित्रपट एकच कोणता तरी जॉनर घेऊन पुढं गेल्यास गोंधळ उडत नाही. प्रेमकथेच्या जोडीला थ्रिलर आणि सस्पेन्सपासून अनेक उपकथानकं आणि त्यांतील राग, लोभ, द्वेष यांचा भडिमार केल्यास आपण नक्की काय पाहतोय हेच प्रेक्षकांना समजत नाही. मोहित सुरी यांच्या ‘मलंग’चं असंच काहीसं झालंय. कथेत अनेक ‘खून का बदल खून’ टाइपच्या सिनेमांप्रमाणं धक्के दिल्यानं ती काही काळ खिळवून ठेवते, मात्र त्याच्या जोडीला पाजलेले अनेक डोस पचनी पडायला जड जातात. आदित्य रॉय कपूर, दिशा पटनी आणि अनिल कपूर यांचे प्रयत्न, तसेच संगीत आणि गोव्याचं देखणं छायाचित्रण चित्रपटाला काही प्रमाणात तारतात. 

‘मलंग’ची कथा तुरुंगातील तुफान हाणामारीनं सुरू होते. आपला नायक अद्वैत (आदित्य रॉय कपूर) तुरुंगात बंद आहे आणि त्याच्या प्रेयसीनं दिलेलं ब्रेसलेट घेतलं म्हणून एका दैत्याला तुडवतो आहे. कट टू...कथा गोव्यात दाखल होते. अद्वैत पोलिस इन्स्पेक्टर अनंजय आगाशे (अनिल कपूर) यांना फोन करून आज एक खून होणार असल्याचं सांगतो. पुन्हा कट टू आणि कथा पाच वर्षं मागं जाते. सारा (दिशा पटनी) परदेशातून काही ‘थ्रिलिंग’ अनुभव घेण्यासाठी गोव्यात आली आहे. तिची गाठ अद्वैतशी पडते आणि दोघं अर्थातच प्रेमात पडतात. एक अनुभव घेतल्यावर ब्रेसलेटला एक गाठ बांधायची हा तिचा फंडा. बरीच गाणी वगरै म्हटल्यानंतर सारा गरोदर राहते, मात्र एका मैत्रिणीमुळं अडचणीत येते. कट टू...पोलिस इन्स्पेक्टर मायकेल रॉड्रिग्जच्या (कुणाल खेमू) प्रवेश करतो आणि कथा वेग पकडते. आता या पुढं अमिताभ बच्चन यांचा ‘आखरी रास्ता’ ते आमीर खानचा ‘गजनी’ पाहिलेल्यांना कथा नक्की काय आहे आणि पुढं काय होतं हे सांगण्याची थोडीही गरज नाही...

कथेत नावीन्य नसल्यानं दिग्दर्शक सुरवातीच्या टप्प्यात मूळ कथानक झाकून ठेवत अनेक आजूबाजूच्या गोष्टी सांगत राहतो. त्या मनोरंजक आहेत, मात्र मुख्य पात्रांशी प्रेक्षकांची नाळ काही केल्या जुळत नाही. नायकाला संसारात रस का नाही आणि नायिकेला इतके अनुभव काय घ्यायचे आहेत, हे सांगण्यासाठी भरपूर वेळ खर्च होतो.

मुख्य कथानक सुरू झाल्यानंतर ट्विस्टचा भडिमार सुरू होतो. मात्र, त्यासाठी दिग्दर्शकाला उपकथानकांची मदत घ्यावी लागल्यानं ट्रॅक बदलाचा खडखडाट वाढत जातो. शेवट आणि त्यातला ट्विस्ट छान असला, तर तोपर्यंत प्रेक्षकांचा संयम संपून जातो. त्यातल्या त्यात चित्रपटाचं टायटल सॉंग, अरिजित सिंगच्या आवाजातील ‘चल घर चले’ हे गाणं व गोव्याचं चित्रण थोडीफार मलमपट्टी करीत राहतात... 

आदित्य रॉय कपूरच्या पात्राच्या लिखाणात त्रुटी आहेत. थंड डोक्यानं विचार करणारा नायक दाखवताना त्याच्या चेहऱ्यावरही कोणतेच हावभाव यायला नकोत, हा फंडा काही समजत नाही. बाकी ॲक्शन सिनमध्ये तो शोभून दिसतो. दिशा पटनीनेही चेहऱ्यावर फारसे हावभाव न दाखवता ग्लॅमरस दिसण्याची कसरत करून दाखवली आहे. अनिल कपूरचा अभिनय जोरदार आहे, मात्र त्यात ओव्हरॲक्टिंगची त्रुटी जाणवतेच. कुणाल खेमूला फारशी संधी नाही. अमृता खानविलकरच्या वाट्याला आलेली भूमिका छोटी आहे. 

एकंदरीतच, दिग्दर्शकाचा प्रयत्न प्रेक्षकांना एकाच कथेच अनेक स्वाद देण्याचा दिसतो, मात्र तो ‘बकवास’ ठरतो...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com