सई आणि प्रियाची जुळलेली केमिस्ट्री (वजनदार)

संतोष भिंगार्डे
शनिवार, 12 नोव्हेंबर 2016

श्रेणी : 3
निर्माती : विधी कासलीवाल
दिग्दर्शन : सचिन कुंडलकर
भूमिका : सई ताम्हनकर, प्रिया बापट, सिद्धार्थ चांदेकर
 

"वजनदार' या चित्रपटाची कथा आहे कावेरी (सई ताम्हनकर) आणि पूजा (प्रिया बापट) या दोन जिवलग मैत्रिणींची. कावेरीचे लग्न झालेले असते. लग्नापूर्वी कावेरी अगदी आनंदी आणि मौजमजेत जीवन जगलेली असते. मात्र, लग्नानंतर तिच्यावर काही बंधने येतात. सासरचे जाधव कुटुंब सुखवस्तू असते. त्यांच्या घराण्याचे काही नियम असतात आणि त्याप्रमाणे कावेरीला वागावे अन्‌ जगावे लागते. कावेरी नृत्यांगना असते.

लग्नानंतर तिच्या या आवडीवरही बंधन येते. मात्र, एकेदिवशी ती आणि तिची मैत्रीण पूजा डान्स क्‍लबमध्ये जातात. तेथे मनसोक्त डान्स करताना फ्लोअरवरून खाली पडतात. त्यांच्या या फिजितीचा व्हिडिओ व्हायरल होतो. हा व्हिडिओ असतो त्यांच्या स्थूलपणावर भाष्य करणारा आणि हीच घटना त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरते. त्याच दरम्यानच्या कालावधीत आलोक दीक्षित (सिद्धार्थ चांदेकर) पूजाच्या जीवनात येतो. या दोघांच्या प्रेमाचे काय होते, झालेल्या फजितीच्या घटनेमुळे कावेरी आणि पूजा किती आणि कशा व्यथित होतात व त्यातून काय निर्णय घेतात, याची उत्तरं चित्रपटाच्या शेवटी मिळतात.

"गंध', "निरोप', "रेस्टॉरंट', "हॅपी जर्नी' असे वेगळ्या धाटणीचे चित्रपट देणारा दिग्दर्शक सचिन कुंडलकरने "वजनदार'चे दिग्दर्शन केले आहे. कथा-पटकथा आणि संवादही त्याचेच आहेत. लॅण्डमार्क फिल्मची ही निर्मिती आहे. सई ताम्हनकर, प्रिया बापट, चिराग पाटील, सिद्धार्थ चांदेकर, समीर धर्माधिकारी, चेतन चिटणीस, वंदना वाकनीस आदी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येकाची कामगिरी चोख झाली आहे. विशेषकरून सई आणि प्रियाची पडद्यावरील केमिस्ट्री अगदी उत्तम जुळली आहे. दोघींनीही सफाईदार अभिनय केला आहे. स्थूल ते बारीक होण्याची दोघींची धडपड खिळवून ठेवणारी आहे. घरातून दुपारी जिममध्ये जाणे आणि जिममधून धावत-पळत घरी येणे ही कावेरीची कसरत आणि त्या वेळी तिच्या मनाची होणारी घालमेल दिग्दर्शकाने छान टिपली आहे. सिद्धार्थ चांदेकरही आलोक दीक्षितच्या भूमिकेत भाव खाऊन गेला आहे. चित्रपटाची कथा पाचगणीत घडते, तेथील निसर्गसौंदर्य सिनमॅटोग्राफर मिलिंद जोगने आपल्या कॅमेऱ्यात अप्रतिमरीत्या बंदिस्त केले आहे. अविनाश- विश्‍वजित यांचे संगीतही जुळून आले आहे.

चित्रपटात काही उणिवा राहून गेल्या आहेत. पूजा आणि कावेरी ज्या एका घटनेवरून निराश होतात, ते कारण काहीसे तकलादू वाटते, तो प्रसंग मनाचा ठाव घेत नाही. तसेच, कावेरीचा पती ओंकार जाधव सारखा झोपतच का दाखविला आहे, हा प्रश्‍न प्रेक्षकांना सतावत राहतो. कावेरीचा जिम ट्रेनर अचानक गायब का होतो, याचेही उत्तर मिळत नाही.

एकूणच काय, तर सध्या झिरो फिगरची क्रेझ वाढत चालली आहे. प्रत्येक मुलीला झिरो फिगरची स्वप्ने पडत आहेत. मात्र, आपण जसे आहोत तसेच सुंदर दिसतो, हे त्यांना समजत नाही. चित्रपट हेच सांगत जीवनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन देतो.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sai and Priya good Chemistry (Vajandar)