ती सध्या काय करते... (नवा चित्रपट) 

ti sadhya kay karte review
ti sadhya kay karte review

अधुऱ्या प्रेमावरची हळवी फुंकर 
 

लहानपणी एकमेकांना भिडलेल्या दोन रेषा पुढच्या आयुष्यात एकमेकाला समांतर गेल्या तर? प्रश्न गणिताचा नसून प्रेमाचा असल्यानं सुटायला अजूनच किचकट आहे, पण आहे खरा... सतीश राजवाडे दिग्दर्शित "ती सध्या काय करते...' हा चित्रपट याच प्रश्‍नाचं उत्तर शोधण्याचा प्रामाणिक, हळवा आणि मनोरंजक प्रयत्न आहे. पहिल्या प्रेमाची झालेली आठवण व त्यातून स्मरणरंजन आणि वास्तवाला सामोरं जाण्याचा त्याचा प्रयत्न हा पट दिग्दर्शक उभा करतो. प्रसंगांची नेमकी निवड, संवाद आणि गाणी यांच्या जोरावर चित्रपट छान मनोरंजन करतो. अंकुश चौधरीसह सर्व अभिनेत्यांच्या दमदार कामगिरीमुळं लक्षातही राहतो. 


"ती सध्या का करते...'ची सुरवात होते माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यातून. अनुराग (अंकुश चौधरी) या मेळाव्यासाठी येतो आणि वर्गातील तन्वीबद्दलच्या (तेजश्री प्रधान) त्याच्या आठवणी जाग्या होतात. चित्रपट भूतकाळात जातो आणि अनुराग आणि तन्वी (बालकलाकार निर्मोही अग्निहोत्री आणि हृदीत्य राजवाडे) यांच्या बालमैत्रीची ओळख करून देतो. हे दोघं थोडे मोठे झाल्यावर त्यांची मैत्री प्रेमात बदलू लागते. अनुराग आता तन्वीला (अभिनय बेर्डे आणि आर्या आंबेकर) गृहीत धरू लागतो, तन्वीच्या अतिसहवासाचा त्याला त्रास होऊ लागतो... तन्वी एक निर्णय घेते आणि दोघांचं आयुष्य बदलून जातं... हे अर्धवट राहिलेलं प्रेम नंतर कोणतं वळण घेतं, अनुरागची नेमकी चूक काय असते, तन्वी त्याला ती कशी समजून घेते आदी अनेक प्रश्‍नांची हळवी उत्तरं चित्रपटाचा शेवट देतो... 


गेल्या काही पिढ्यांतील अनेक युवक-युवतींच्या आयुष्यात हा प्रसंग घडलेला असल्यानं (आजची पिढी लगेच "व्यक्त' होते, हे दिग्दर्शक स्पष्ट करतो.) त्यांना ती अधिकच वास्तववादी वाटल्यास नवल नाही. पहिलं प्रेम मनातच राहतं, मात्र तो हळवा कोपरा सतत "जागा' असल्यानं "ती सध्या काय करते' हा प्रश्नही छळत राहतो. असे "प्रेमिक' पुन्हा भेटल्यावर नक्की कसे व्यक्त होतील, आजच्या ई-मेल, व्हॉट्‌स ऍपच्या जमान्यात त्यांनी एकमेकांशी पुन्हा कसं जुळवून घ्यावं याची उत्तर देण्याचा प्रयत्न चित्रपटाची कथा शेवटच्या टप्प्यात करते. अनुराग व तन्वीचं बालपणी फुलणारं प्रेम, तारुण्यात पोचताना त्यात आलेला गोडवा आणि एका टप्प्यावर झालेली ताटातूट हा चित्रपटाचा अर्थात सर्वांत मनोरंजक भाग, तर फसलेल्या प्रेमावर घातलेली हळवी फुंकर हा कथेतील चटका लावणारा भाग. हे सर्व टप्पे ताकदीनं मांडल्यानंच चित्रपट भिडतो, हृदयात घर करतो. संवाद, गाणी आणि संगीत यांतून गुंतवून ठेवतो. शेवटच्या भागात लांबलेले प्रसंग व कथेचा कमी झालेला वेग या त्रुटी आहेत. 


अंकुश चौधरीनं आपल्या संसारात सुखी असताना बालपणीच्या प्रेमाच्या आठवणीनं हळवा झालेला, ते प्रेम पुन्हा शोधू पाहणारा अनुराग जबरदस्त साकारला आहे. अनेक वर्षांनंतर तन्वी भेटल्यानंतरचं व्यक्त होणं त्यानं छानच उभं केलं आहे. अंकुशचं चित्रपटभर येणारं मनोगतही नेटकं, टोकदार, दिलखेच. तेजश्री प्रधाननं समजूतदार तन्वीला न्याय दिला आहे. तारुण्यातील तन्वीच्या भूमिकेत आर्या आंबेकर खूपच आत्मविश्‍वासानं वावरली आहे. तिचं विनोदाचं टायमिंग आणि हळव्या प्रसंगांतील अभिनय दाद देण्याजोगा. लक्ष्मीकांत बेर्डेचा मुलगा अभिनय सुरवातीच्या प्रसंगांत नवखा वाटतो, मात्र नंतर त्यालाही भूमिकेची लय सापडली आहे. निर्मोही अग्निहोत्री आणि हृदीत्य राजवाडे हे बालकलाकारही धमाल. संजय व सुकन्या मोने, तुषार दळवी, ईशा फडके आदींनी छान साथ दिली आहे. 
एकंदरीतच, स्मरणरंजनाची उच्चतम पातळी गाठणारा हा हलका-फुलका तरी हळवा चित्रपट एकदा पाहायलाच पाहिजे... 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com