'घर' या संकल्पनेबद्दल केलेलं भाष्य म्हणजे ‘वेलकम होम’ (नवा चित्रपट - वेलकम होम)

मंदार कुलकर्णी
रविवार, 16 जून 2019

एखाद्या शांत तळ्यात एक-दोन दगड पडल्यावर तरंग उमटतात. एका तरंगातून दुसरा तरंग उमटत जातो आणि तरंगांचे गुंतागुंतीचे आकृतिबंध तयार होत राहतात... तसाच काहीसा अनुभव देणारा चित्रपट म्हणजे ‘वेलकम होम.

एखाद्या शांत तळ्यात एक-दोन दगड पडल्यावर तरंग उमटतात. एका तरंगातून दुसरा तरंग उमटत जातो आणि तरंगांचे गुंतागुंतीचे आकृतिबंध तयार होत राहतात... तसाच काहीसा अनुभव देणारा चित्रपट म्हणजे ‘वेलकम होम.’ सुमित्रा भावे यांनी लिहिलेला आणि सुनील सुकथनकर यांच्यासह दिग्दर्शित केलेला हा नितांतसुंदर चित्रपट. या चित्रपटातलं शांत तळं आहे एका मध्यमवयीन महिलेचं. ही महिला स्वतःच्या घरातून बाहेर पडून आई-वडिलांच्या घरी आली आहे. दोन्ही घरं तिचीच; पण त्यातलं तिचं घर कोणतं, असा प्रश्‍न तिच्या मनात निर्माण झालाय. तिच्या या प्रश्‍नातून तिच्याच मनात तयार झालेले तरंग, विचारचक्रं आणि ‘माझं घर कुठलं’ या प्रश्‍नाची दिग्दर्शकद्वयीनं फक्त तिच्याच नव्हे, तर तिच्याशी संबंधित अनेकांच्या दृष्टिकोनातून केलेली मांडणी म्हणजे ‘वेलकम होम’ हा चित्रपट. विषयापासून मांडणीपर्यंत आणि संवादांपासून अभिनयापर्यंत प्रत्येक गोष्ट दर्जेदार असणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात अनेक तरंग उमटवून जात नसेल तरच नवल. 

सौदामिनी आचार्य (मृणाल कुलकर्णी) आपल्या आई-वडिलांच्या (उत्तरा बावकर, डॉ. मोहन आगाशे) घरी आली आहे. तिच्याबरोबर तिच्या पतीची वृद्ध आई (सेवा चौहान) आणि मुलगीही (प्रांजली श्रीकांत) आहे. तिच्या पतीचा मित्र सुरेश (सुमित राघव) काही कामानिमित्त तिच्याकडं आलाय. तिची बहीणही (स्पृहा जोशी) भारत सोडून अमेरिकेत जाऊ बघतेय. या सगळ्यांच्या एकेक गोष्टी आहेत. त्यांची ही सगळी वीण सौदामिनीमध्ये काय परिणाम करते, याची ही कथा. 

सुमित्रा भावे यांनी लेखनातच निम्मी बाजी मारली आहे. सौदामिनी गोष्ट सांगता सांगता त्या घर हा घटक असलेल्या इतक्‍या गोष्टी सांगत जातात, की त्यातून वेगवेगळे दृष्टिकोन तयार होत जातात. सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर यांच्या चित्रपटांत कोणीही रूढ नायक-नायिका किंवा खलनायक नसतो. त्या माणसांच्या गोष्टी असतात. ‘वेलकम होम’मध्ये ही माणसं अनेक प्रश्‍न आणि विचार घेऊन येतात आणि आपल्या मनात ‘घर’ करतात. सुमित्रा भावे यांचे अतिशय सहज आणि त्याच वेळी उंचीवरचं तत्त्वज्ञान व्यक्त करणारे संवाद हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य. दिग्दर्शन करताना द्वयीनं छोट्या छोट्या बारकाव्यांतून प्रत्येक व्यक्तिरेखा अतिशय ठाशीव केली आहे. सौदामिनी आणि तिच्या मुलीचा आइस्क्रीम खातानाचा संवाद, सौदामिनीनं पतीच्या घरी गेल्यावर तिनं घर आवरणं, कारमधल्या प्रवासादरम्यान घडणाऱ्या घटनांतून कथेला थोडा वेग देणं, हे सगळे भाग वैशिष्ट्यपूर्ण वाटतात. सौदामिनीचा पती चित्रपटात न दाखवण्याचा निर्णय अतिशय योग्य. ‘किर्र रान’ आणि ‘राधे राधे’ या दोन गाण्यांचा वापर  चपखल. 

हा चित्रपट सर्वार्थानं मृणाल कुलकर्णी आणि सुमित राघवन यांचा आहे. मृणाल कुलकर्णी यांचं काम खूप अवघड आहे. संपूर्ण चित्रपटभर सुजलेल्या डोळ्यांनी वावरणं आणि प्रसन्नपणाचा कुठंही लवलेशसुद्धा न दाखवणं हे अवघड आहे. अनेक ठिकाणी त्या केवळ डोळ्यांतून बोलतात. कमालीच्या प्रगल्भपणे त्यांनी ही भूमिका साकारली आहे. सुमित राघवन हा अभिनेता अनेक वेळा सुखद धक्के देतो. या चित्रपटातला त्याचा समजूतदार, प्रगल्भ, खेळकर, सुरेख बघणं आणि एखादी भूमिका अंतर्बाह्य पद्धतीनं कशी साकारता येते, हे बघणं ही एक ‘ट्रीट’ आहे. मोहन आगाशे, उत्तरा बावकर, दीपा श्रीराम ही मंडळी या दिग्दर्शकद्वयीच्या चित्रपटांचा अनेकदा भाग असतात. कोणत्याही भूमिका ते कवेत घेतात, हे या चित्रपटातही दिसतं. स्पृहा जोशीनंही खूप तरल पद्धतीनं भूमिका साकारली आहे. सेवा चौहान, छोटी प्रांजली छाप पाडून जातात. एकुणात, ‘माझं घर कोणतं’ या प्रश्‍नाचे अनेक कंगोरे मांडणारा हा चित्रपट नक्कीच बघायला हवा. तो रुढार्थानं कोणताही प्रश्‍न मांडत नाही की कोणतं उत्तरही देत नाही. या विषयाच्या अनेक बाजू तो दाखवत जातो...पण हे करताकरता प्रेक्षकांच्या मनातही तो ‘घर’ करून जातो, हेही फार  महत्त्वाचं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: welcome home marathi movie review