निर्मनुष्य पुलावर भल्या पहाटे...

निर्मनुष्य पुलावर भल्या पहाटे...

हॉलिवूडचा प्रतिभावंत दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्गची एक कलाकृती म्हणजे ‘ब्रिज ऑफ स्पाइज’ हा चित्रपट. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या प्रदीर्घ शीतयुद्धातली एक थक्‍क करणारी सत्यकथा. त्या अजोड चित्रपटाची ही ओळख...
 

स्टिव्हन स्पिलबर्गचा ‘ब्रिज ऑफ स्पाइज’ हा एक नितांतसुंदर चित्रपट आहे. अचानक हाताला लागलेल्या एका सत्यकहाणीचं स्प्पिलबर्गनं नेहमीप्रमाणे सोनं केलं. एरवी चित्तचक्षुचमत्कारिक काल्पनिकांमध्ये रमणाऱ्या स्पिलबर्गला पहिल्या किंवा दुसऱ्या महायुद्धातलं एखादं कथानक मिळालं, की बहुधा तो थरारून जातो. ‘एम्पायर ऑफ द सन’ असो, ‘सेव्हिंग प्रायवेट रायन’ असो, ‘म्युनिक’ असो किंवा ‘वॉरहॉर्स’. काल्पनिकांचं एक वेगळं विश्व कोरणाऱ्या स्पिलबर्गला इतिहास पालवू लागतो, तेव्हा त्याची मानसी वेगळंच काही सांगू लागते. ‘ब्रिज ऑफ स्पाइज’ हे त्याचं लखलखीत उदाहरण.

गेल्या शतकाच्या पन्नाशीच्या दशकातली ही एक चिमुकली कहाणी. म्हणायची चिमुकली; पण तीमधला जीव आभाळाएवढा आहे. अमेरिका आणि रशियातल्या शीतयुद्धाचा ऐन भरातला हा काळ. दोन्ही महासत्ता एकमेकींच्या आण्विक क्षमतेच्या भयानं ग्रासून गेलेल्या होत्या. अमेरिकेनं, सहा आणि नऊ ऑगस्ट १९४५ रोजी जपानमधल्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबाँब टाकून दुसरं महायुद्ध निर्णायकरीत्या संपवलं होतं. त्याच युद्धात ‘जनरल विंटर’च्या मर्दुमकीच्या जोरावर हिटलरच्या फौजांना मॉस्कोच्या वेशीवर बर्फात गाडून रशिया दशांगुळं उरला होता; पण पुढं या दोन्ही महासत्तांमध्ये विस्तव जाईनासा झाला. सोव्हिएत रशियानं एक पोलादी पडदा मध्ये उभा करून आपली सगळी सृष्टी जगाच्या दृष्टिआड नेली होती. अमेरिकेचा दबदबा वाढत होता. त्याच काळात दोन्ही देशांमध्ये गुप्तहेरगिरीनं कळस गाठला होता. प्रश्‍न एकच छळत होता : यांच्याकडं किती मोठा अणुबाँब तयार होतोय?

प्रसिद्ध ब्रिटिश गुप्तहेर जेम्स बाँडच्या कादंबऱ्यांचा हाच तो काळ. या शीतयुद्धाच्या टायमाला गुप्तहेरगिरीच्या कथांचा इतका प्रादुर्भाव झाला होता, की गल्लोगल्ली गुप्तहेरच हिंडताहेत, असं एखाद्याला वाटावं; पण त्याच वेळेला काही उत्कट सत्य कहाण्याही घडत होत्या. त्यापैकी एक जेम्स डोनोव्हान नावाच्या वकिलाची. या एका साध्यासुध्या वकिलानं मात्र एकट्यानं या भयानक शीतयुद्धाला एक जोरदार तडाखा दिला. त्याची कहाणी म्हणजे ‘ब्रिज ऑफ स्पाइज्‌’.

* * *

एकांड्या आबेलनं आरशात बघत बघत आपलं सेल्फ पोर्टेट पुरं करत आणलं, तेवढ्यात फोनची घंटी वाजली. फोन उचलून कानाला लावून तो शांतपणे बाहेर पडला. हातात कॅनव्हासची भेंडोळी. फोल्डिंगचं तिकाटणं. रंगांच्या बाटल्या. ब्रश. नदीकिनारी पुलाचं मनोरम चित्र साकारता साकारता त्यानं हलकेच बसायच्या बाकाखाली हात घालून एक नाणं काढलं...कॅनव्हास गुंडाळून तो आपल्या कोठीकडं परतला. दाढीच्या ब्लेडनं त्यानं नाणं उभं ‘चिरलं’- आत गुप्त संदेश होता.

...आबेलचं हे कर्तृत्व सीआयएपासून लपून राहिलं नव्हतंच. त्याचा पाठलाग करून त्याला त्यांनी पकडलं. ‘माय लॉर्ड, रुडॉल्फ इवानोविच आबेल हा रशियन गुप्तहेर असून, तो चित्रकार वगैरे अजिबात नाही. तो तर एक कर्नल आहे. गेली अनेक वर्षं अमेरिकेतच राहून अमेरिकेच्या आण्विक क्षमतेसंबंधीची बरीच माहिती त्यानं शत्रूला मिळवून दिली आहे. अमेरिकेच्या जनतेच्या जिवाला आणि एकंदरीतच मानवतेला त्यानं धोका पोचवलाय. सबब, त्याला फासावर लटकवावं,’ ‘हा सीआयएचा अमेरिकी न्यायव्यवस्थेला आग्रह, तर अणुबाँबच्या भीतीनं आधीच घाबरलेल्या अमेरिकी लोकांमध्ये आबेल या नावाची दहशतच बसलेली; पण फोक्‍स, अमेरिका ही अमेरिका आहे. इथं परदेशी गुन्हेगारालाही त्याची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. न्यायानं काम करणारी संस्कृती आहे ही...आबेलला त्याची बाजू मांडण्यासाठी सक्षम वकील मिळेल. हा घ्या, सरकारी वकील..,’ न्यायपालिकेनं करारीपणानं सांगितलं. एक वकील मुक्रर केला. आबेलची बाजू लुटूपुटू लढवून विद्वान वकिलांनी शांतपणे बाजूला व्हावं. आबेलनं तितक्‍याच शांतपणे विजेच्या खुचींत जाऊन बसावं. रशियाचं नाक कापलं जायला हवं. बात खतम. इतका सोपा डाव.

...पण त्या वकिलानं सगळा घोटाळा केला! त्यानं आबेलची बाजू सीरिअसली लढवली, अन्‌ इतिहास घडला.

* * *

जेम्स डोनोव्हान. ब्रुकलिनमधला एक सुखवस्तू वकील. विम्याची प्रकरणं हाताळणारा. उदाहरणार्थ: ‘‘माझ्या अशिलानं गाडीनं पाच जणांना उडवलं हे खरं आहे; पण नुकसानभरपाईचे पाच जणांनी वेगवेगळे पाच दावे करून कसं चालेल? अपघात तर एकच झाला आहे, पाच नाही...,’’ असले चतुर युक्‍तिवाद करणारा. तीन मुलं, प्रेमळ बायको. ‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’ याच विमावाक्‍यानुसार जेम्स डोनोव्हानचं बरं चाललं होतं. आबेलचं वकीलपत्र त्याच्यावर जवळजवळ लादण्यात आलं. 

‘‘तुला काय करायचंय? कोर्टात जाऊन नुसता उभा राहा. युक्‍तिवादाचा प्रश्‍नच नाही. गोळीबंद केस आहे. सगळे पुरावे आहेत. तो गुप्तहेर विजेच्या खुर्चीत जाणार ही काळ्या दगडावरची रेघ. घे ही केस...देशसेवाच आहे ही!’’ त्याच्या फर्मच्या पार्टनरनं त्याला सल्ला दिला.

डोनोव्हाननं तुरुंगात आबेलला गाठलं.

कृश शरीरयष्टीचा, टक्‍कल पडलेला, सर्दीनं बुजबुजलेला आबेल हा खरंच भयंकर गुप्तहेर आहे? डोनोव्हान हैराण झाला. आबेलला त्यानं ‘मी तुझा वकील आहे,’ असं सांगितलं. आबेल निर्विकार राहिला. 

‘‘तुला मी वकील म्हणून मान्य आहे?’’ डोनोव्हान.

‘‘माझ्यासाठी सिगारेटी, कागद-पेन्सिली मिळण्याची व्यवस्था करू शकण्याइतपत चलाख वकील तू आहेस?’’ आबेल.

नेहमी थंड, नेमकी उत्तरं देणारा आबेल, डोनोव्हानला थोडाथोडा आवडायला लागला.

‘‘जिम, मी मरणाला घाबरत नाही. पण...पण ती माझी प्रायॉरिटीसुद्धा नाही,’’ नाक पुसत आबेलनं एकदा सांगितलं. आबेलच्या सुटकेसाठी डोनोव्हाननं आपलं सारं वकिली कौशल्य पणाला लावून पार्टनरपासून कुटुंबीयांच्या शिव्या खाऊन घेतल्या. एका देशद्रोह्याला वाचवण्याच्या दुर्बुद्धीला काय म्हणावं, असं आप्तेष्टच बडबडत होते. पब्लिक तर त्याच्यावर भडकलेलंच. एकदा तर त्याच्या घरावर गोळीबारदेखील झाला; पण डोनोव्हाननं आपलं कर्तव्य बजावलं.

‘‘तुझा अशील तुझ्याकडं काय बोलतोय, हे आम्हाला कळायला हवं,’’ सीआयए एजंट हॉफमननं त्याला एकदा रात्री रस्त्यात गाठून सुनावलं.

‘‘हा अशील आणि वकिलामधला गोपनीय भाग आहे...’’ डोनोव्हानचा वकिली येळकोट जाता जात नव्हता.

‘‘हे बघ जिम, तो काही पुण्यात्मा नाही. साला गुप्तहेर आहे. त्यानं कुठली माहिती पोलादी पडद्याआड पोचवलीये, हे कळलं तर बरं होईल ना? तू कशाला एवढा हळवा होतोयस? मी सीआयएचा एजंट आहे. तू वकील. दोघंही अमेरिकी. तो रशियन. काय संबंध आपला? इथं काही कुठलं रुलबुक नाहीए...’’ एजंट म्हणाला.

‘‘रुलबुक? आहे तर...त्याला आपण अमेरिकेची घटना म्हणतो मि. एजंट. थॅंक यू!’’ एवढं बोलून डोनोव्हान तिथून निघाला.

न्यायमूर्ती मॉर्टिमर बायर्स कडवे देशभक्‍त म्हणून ओळखले जातात. उद्याच्या निकालपत्रात ते आबेलच्या मृत्युदंडावर शिक्‍कामोर्तब करणार, हे सगळ्यांनाच माहीत आहे. आपल्या कोर्टात रशियाचं नाक ठेचलं जातंय, यातच त्यांना केवढा आनंद होतोय. पण...

रात्री न्या. बायर्सच्या घरी डोनोव्हान गेला.

‘‘बोल, जिम...काय म्हणतोस?’’ न्या. बायर्सनं त्याच्या हातात ड्रिंक दिलं.

‘‘आबेलचं काय होणार, हे कळतंय...’’ डोनोव्हाननं चाचरत सुरवात केली.

‘‘निकाल उद्या आहे, सन. त्याचं इथं काय?’’ बायर्सना त्याचं हे आगाऊ वागणं आवडलेलं नाही. थेट जज्जाच्या घरात घुसतो म्हणजे काय? ओळख असली म्हणून काय झालं?

‘‘मला वाटतं अमेरिकेच्या हितासाठीच आबेलला फाशी होऊ नये. तो तर त्याच्या देशानं नेमून दिलेलं काम करत होता. पकडला गेला, म्हणून तो गुन्हेगार आहे. भविष्यकाळात आपलाही एखादा हेर तिथं पकडला जाऊ शकतो. त्याला सोडवण्यासाठी वाटाघाटी कराव्या लागतील. आबेलचा त्यासाठी उपयोग होऊ शकतो. इमर्जन्सी म्हणून आपण एखादी नोट पाकिटात घडी करून ठेवतो, तसंच...वेळेला उपयोगी पडेल,’’ डोनोव्हाननं आपलं मत दिलं.

‘‘नाइस स्पीच...आता जा!’’ न्या. बायर्सनं त्याला जवळजवळ हाकललं. 

जेम्स डोनोव्हान हा अस्सल विमाप्रकरणांचा वकील होता, हेच यातून सिद्ध झालं - ‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी!

न्या. बायर्स यांनी भरगच्च कोर्टात आबेलला ३० वर्षं तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आणि डोनोव्हानकडं बघून ते गालातल्या गालात किंचित हसले.

* * *

त्याच वेळी दोन घटना घडल्या. १९६२ चा हा सुमार असेल. सीआयएचा रंगरुट पायलट गॅरी पॉवर्स एक यू-२ स्पाय प्लेन उडवत ७० हजार फुटांवरून रशियातल्या भूभागाचे फोटो काढत असताना रशियन बाँबर्सनं त्याचं विमान टिपलं. पॅराशूटनिशी उडी मारणारा पॉवर्स उतरताक्षणी जेरबंद झाला.

दुसरी घटना बर्लिनमध्ये घडली. मैत्रिणीला भेटायला पूर्व बर्लिनमध्ये गेलेला अर्थशास्त्राचा विद्यार्थी फ्रेडरिक प्रायर हकनाक अडकला. नुकतीच बांधण्यात आलेली बर्लिन भिंत त्याला पुन्हा ओलांडताच आली नाही. मग अमेरिकेची मुस्कटदाबी रशियानं सुरू केली...

पॉवर्सला सोडवणं भाग होतं; पण कसं? अखेर अमेरिकी सरकारला डोनोव्हान आठवला. त्यानं आबेलच्या बदल्यात पॉवर्सला आणावं; पण त्यासाठी त्यानं खासगी वाटाघाटी केल्या पाहिजेत. अमेरिका सरकार किंवा सीआयए त्यात उघडपणे सामील होणार नाही. देशाची अब्रू चव्हाट्यावर येऊ न देता हे काम करावं...डोनोव्हान हैराण झाला.

एक साधा सिंपल वकील महासत्तेशी, त्यातही केजीबीशी बोलणी करणार होता.

जेम्स डोनोव्हाननं बर्लिन गाठलं आणि आबेलच्या बदल्यात पॉवर्स तर सोडवलाच, पण फ्रेडरिक प्रायरही पदरात पाडून घेतला. 

हे नाट्य घडलं १० फेब्रुवारी १९६२ या तारखेला बर्लिनमधल्या एका निर्मनुष्य पुलावर भल्या पहाटे. 

‘चेकपॉइंट चार्ली’ या ठिकाणी त्याच वेळेला प्रायरला पूर्व जर्मनी सरकारनं सोडलं आणि या ऐतिहासिक ग्लिएनिके पुलावर आबेलच्या बदल्यात रशियानं पॉवर्स देऊन टाकला.

‘ब्रिज ऑफ स्पाइज’ म्हणून त्याची इतिहासात ओळख कायम राहिली. 

* * *
 

आपण करतोय ते योग्य करतोय, हे जेम्स डोनोव्हानला कळत होतं. शत्रुत्वानं बेभान झालेल्या दोन महासत्तांना नमतं घ्यायला लावून केवळ मानवतेसाठी आपण हा धोका पत्करलाय, याचीही त्याला जाणीव होती.

एक दगडी पूल. इकडून तिकडं जाणारा. त्याचं एक टोक इथं आहे. पश्‍चिम बर्लिनमध्ये. दुसरं, पूर्व जर्मनीतल्या पॉट्‌सडॅममध्ये. एक मित्रभूमीत. दुसरं शत्रूभूमीत. दोन्ही टोकांना उभय सैन्यांचे मोर्चे आहेत. फ्लडलाइट्‌सच्या प्रकाशात दोन्ही बाजू उजळून निघाल्या आहेत. बंदुका रोखलेल्या. तोफांची तोंडं नेम धरून वासलेली. 

थोड्याशा संशयस्पद हालचालीनं इथं धूर आणि स्फोटांचं साम्राज्य उभं राहील. 
जेम्स डोनोव्हान इथं, त्या तसल्या हाडं फोडणाऱ्या थंडीत मानेवरला घाम टिपत उभा आहे. त्याच्या शेजारी निर्विकारपणे उभा आहे आबेल. अमेरिकी सरकारनं बळे बळे त्याला उपलब्ध करून दिलेल्या वकिलानं त्याच्या गळ्याभोवतीचा फास हलक्‍या हातानं सोडवलाय. इतकंच नव्हे, तर त्याला मायदेशी रवाना करण्याचं चक्‍क कारस्थानही रचलंय. पुढल्या तीन-चार मिनिटांत ते कारस्थान तडीला जाईल.

जेम्स डोनोव्हान त्याला विचारतोय : ‘‘आबेल, तुला टेन्शन नाही आलं?’’

‘‘त्यानं काही मदत होईल? वुड इट हेल्प?’’ नाक पुसत आबेल उत्तरतो. 

‘‘तुला तुझ्या मायदेशात कशी वागणूक मिळेल? मला लिहिशील?’’ डोनोव्हान विचारतो.

‘‘ त्यांनी मला मिठी मारून, शेकहॅंड करून ड्रायव्हरशेजारच्या सीटवर बसवलं, तर माझं पत्र तुला येईल. नुसताच गाडीचा दरवाजा उघडून मागं बसायला लावलं तर...कधीच येणार नाही!’’ नाक पुसत निर्विकारपणे आबेल सांगतो.

‘चेकपॉइंट चार्ली’वर प्रायर पोचला आहे,’ असा सांगावा येईपर्यंत आबेलनं पूल ओलांडला नाही. तणावाची काही मिनिटं गेल्यानंतर तो सांगावा आला. निरोप घेताना आबेलनं काहीही पसरट न बोलता एक भेंडोळं डोनोव्हानला दिलं, म्हणाला ः ‘‘ही माझ्या वकिलाची फी आहे...हे एवढंच आहे माझ्यापाशी.’’ 

त्यात डोनोव्हानचं एक सुरेख पोर्ट्रेट होतं.

* * *

एक साधासुधा वकील महासत्तांच्या निर्दय गुप्तचर संस्थांशी झुंजतोय, ही कहाणी एरवी कपोलकल्पित वाटलीही असती; पण जेम्स डोनोव्हाननं लिहिलेल्या ‘स्ट्रेंजर्स ऑन द ब्रिज’ या आत्मकथनाची प्रत स्पिलबर्गच्या हाती लागली आणि सत्य जगासमोर जिवंत होऊन उलगडलं. या वकीलमहाशयांनी पुढे फिडेल कॅस्ट्रोशी वाटाघाटी करून क्‍यूबात अडकलेल्या अमेरिकेच्या तब्बल दहा हजार युद्धकैद्यांना सोडवलं. ‘बे ऑफ पिग्ज’ ही अमेरिकेची एक लाजिरवाणी हार मानली जाते. कॅस्ट्रोची राजवट उलथण्यासाठी सीआयएनं १७ एप्रिल १९६१ रोजी हा लक्ष्यभेदी हल्ला चढवला होता; पण क्‍यूबन क्रांतिकारकांनी तीन दिवसांत अमेरिकी सैन्याचा अक्षरश: धुव्वा उडवला. त्या लाजिरवाण्या युद्धातले हे कैदी होते.

जेम्स डोनोव्हाननं हे उद्योग का केले असावेत? चांगली चाललेली विम्याची वकिली सोडून या लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचा उद्योग त्याला कुणी सांगितला असावा? स्पिलबर्गनं याचं उत्तर अचूक शोधलं आहे. ते चित्रपट बघूनच समजावून घ्यायला हवं. 

स्पिलबर्गच्या सर्वोत्कृष्ट कलाकृतींमध्ये ‘ब्रिज ऑफ स्पाइज’ बऱ्याच वरच्या नंबराला आहे. सत्यकहाणीचं हे रूपेरी निरूपण फक्‍त स्पिलबर्गलाच जमावं. अर्थात टॉम हॅंक्‍स या स्पिलबर्गच्या आवडत्या अभिनेत्यानं साकारलेला जेम्स डोनोव्हान मनात घर करतो. याच स्पिलबर्गच्या ‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’मध्येही टॉम हॅंक्‍स होता. पुढं ‘द टर्मिनल’मध्ये तर हॅंक्‍सनं कहर केला. स्पिलबर्गबरोबर हॅंक्‍स आणखीच खुलतो. आबेलच्या अल्पाक्षरी भूमिकेतल्या मार्क रायलन्सनं तर ऑस्कर पटकावलं; पण निव्वळ तगड्या अभिनेत्यांपेक्षाही अधिक मोठा रोल आहे तो कलादिग्दर्शकाचा आणि अर्थात कथाकथनाचा अजोड नमुना पेश करणाऱ्या दिग्दर्शकाचा.

‘ब्रिज ऑफ स्पाइज’ दोन वर्षांपूर्वी येऊन गेला. कुठल्याशा इंग्लिश चित्रपटांच्या वाहिनीवर अधूनमधून लागतो. देशभक्‍ती म्हणजे फक्‍त वळलेल्या मुठी, ताणलेले घसे आणि उच्चरवातल्या घोषणा नव्हेत. 

किंबहुना, हा अभिनिवेश म्हणजे देशभक्‍ती नव्हेच, असं सांगणारा हा एक अजोड चित्रपट आहे. त्यातलं गहिरं सत्य म्हणजे : सरहद्दीच्या कुंपणांपेक्षा तिथले माणुसकीचे पूल अधिक महत्त्वाचे असतात.

‘ब्रिज ऑफ स्पाइज’ नावाचा एक पूल दूरदेशी व्हेनिसमध्ये आजही पर्यटक खेचतो. पुरातन कैद्यांचे उसासे आजही तिथं बंदिवान आहेत. त्याच नावात थोडा बदल करून ‘ब्रिज ऑफ स्पाइज’ साकार झाला. 

...व्हेनिसमधला पूल उसाशांचा आहे. बर्लिनमधला पूल दिलाशांचा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com