
कोरोनामुळे काही काळ थांबलेल्या आणि काही नवीन अशा वेगवेगळ्या नाट्यकॄती नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनंच रसिकांच्या भेटीला येणार आहेत.
मुंबई : कोरोनामुळे संपूर्ण मनोरंजनविश्वावर गदा आली होती. हळूहळू परिस्थिती पूर्ववत होत असताना वर्षाच्या अखेरीस अखेर नाट्यसृष्टीवर पडलेला पडदा देखील काही निर्मात्यांनी हिंमत दाखवत बाजूला केला. ‘पुन्हा नव्याने सुरुवात’ हे धोरण कितपत यशस्वी होईल याबाबत नाट्यवर्तुळात शंका व्यक्त केली जात होती. यावेळी प्रेक्षकांनी दिलेला उदंड प्रतिसाद पाहून अनेक निर्मात्यांच्या जीवात जीव आला आणि मग ते पुढच्या जोरदार तयारीला लागले. परिणामी कोरोनामुळे काही काळ थांबलेल्या आणि काही नवीन अशा वेगवेगळ्या नाट्यकॄती नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनंच रसिकांच्या भेटीला येणार आहेत.
हे ही वाचा: 'काय घडलं त्या रात्री?' मालिका सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यु प्रकरणावर आधारित?
प्रेक्षकांनी दिलेला उदंड प्रतिसाद आणि आर्थिक गणित याबाबत संभ्रमात असलेल्या नाट्यसृष्टीने वर्षाच्या शेवटाला का होईना थोडा धीर करत पुनरागमनाची नांदी केली. परिस्थिती अजुन पूर्ण आटोक्यात आलेली नाहीये त्यामुळे अशा परिस्थितीत नाटक करणं ही जोखीम असल्याने काही मोजक्याच संस्थांनी पुढाकार घेतला. मात्र गेल्या काही आठवड्यात प्रेक्षकांनी नाटकावर दाखवलेल्या विश्वासामुळे नाट्यसृष्टीत सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे वर्षाअखेरीस पुन्हा सुरू झालेली नाट्यसृष्टी नव्या वर्षांत आणखी जोमाने पुढे जाण्याची चिन्ह आहेत. जानेवारीमध्ये साधारण पंधरा ते सोळा नाटकांचे प्रयोग अपेक्षित असून यात काही नवीन नाटकांचाही समावेश असल्याचं समजतंय.
ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, प्रतीक्षा लोणकर यांचं ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांचं ‘व्हॅक्यूम क्लीनर’ या दोन नाटकांचे ९ आणि १० जानेवारीला मुंबई-पुण्यात प्रयोग होणार आहेत. शुभांगी गोखले आणि प्रशांत दामले यांचं ‘साखर खाल्लेला माणूस’ हे नाटक जानेवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात, तर सुनील बर्वे यांचं ‘तिसरे बादशाह हम’ आणि मंगेश कदम यांचं ‘के दिल अभी भरा नही’ हे शेवटच्या आठवडय़ात रसिकांच्या भेटीला येणार आहे. उमेश कामत, हृता दुर्गुळे यांचं ‘दादा एक गुड न्यूज आहे’ हे नाटकदेखील याच दरम्यान येईल, तर अद्वैत थिएटर्सचं ‘आरण्यक’, ‘इब्लिस’, ‘अलबत्या-गलबत्या’, ‘निम्मा शिम्मा राक्षस’ याही कलाकृती प्रयोगांसाठी सज्ज आहेत.
येत्या नवीन वर्षांत तीन नव्या कलाकृती घेऊन येत असल्याची घोषणा २२ डिसेंबरला भद्रकालीचे निर्माते प्रसाद कांबळी यांनी केली, तर ‘देवबाभळी’ आणि ‘वस्त्रहरण’ या कलाकृतीही लवकरच पाहायला मिळतील, असं कांबळी यांनी सांगितलंं होतं. संदीप पाठक यांच्या एकपात्री अभिनयाने गाजलेल्या ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकाचा २७ डिसेंबरला पुण्यात प्रयोग झाला, पुढेही हा दौरा असाच सुरू राहणार आहे. फेब्रुवारी महिन्यात राजेश देशपांडे दिग्दर्शित आणि प्रिया बेर्डे निर्मित ‘लाखाची गोष्ट’ हे नवेकोरं विनोदी नाटक, ‘शांतेचं कार्ट चालू आहे’, ‘ह्याचं करायचं काय’ आणि इतर नाटकांची तिसरी घंटा वाजेल.
जानेवारीत रसिकांना मिळणारी नाट्य मेजवानी
‘आमने-सामने’, ‘यदा कदाचित’, ‘इशारो इशारो में’, ‘सही रे सही’, ‘संत तुकाराम’, ‘तू म्हणशील तसं’, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’, ‘व्हॅक्यूम क्लीनर’, ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’, ‘साखर खाल्लेला माणूस’, ‘दादा, एक गुड न्यूज आहे’, ‘के दिल अभी भरा नहीं’, ‘आरण्यक’, ‘इब्लिस’, ‘निम्मा शिम्मा राक्षस’, ‘अलबत्या- गलबत्या’.
2021 marathi play list includes complete details