फर्जंदच्या निमित्ताने सहा दिग्दर्शकांचा एकाच चित्रपटात अभिनय! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचा मावळा कोंडाजी फर्जंदच्या पराक्रमाची गाथा मांडणाऱ्या "फर्जंद' चित्रपटाच्या निमित्ताने एक अनोखा योग जुळून आला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील तब्बल सहा दिग्दर्शकांनी त्यात अभिनय केला आहे. मृणाल कुलकर्णी, प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर, गणेश यादव, प्रवीण तरडे आणि मृण्मयी देशपांडे अशी त्यांची नावे आहेत. तब्बल सहा दिग्दर्शक एका मराठी चित्रपटात एकत्रित काम करण्याची पहिलीच घटना आहे. 

"फर्जंद'चे निर्माते आहेत अनिरबान सरकार. दिग्पाल लांजेकर यांनी चित्रपट दिग्दर्शित केला आहे. पन्हाळा किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवाजी महाराजांनी वीर कोंडाजी फर्जंद याच्यावर सोपविली आणि जीवाची बाजी लावून त्याने ती कामगिरी फत्ते केली. तोच इतिहास चित्रपटात मांडण्यात आला आहे. मराठीतील नामवंत कलाकारांबरोबरच चित्रपट-नाटक दिग्दर्शित करणारे सहा अभिनेते-अभिनेत्री त्यात काम करीत आहेत. मृणाल कुलकर्णीने "प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं' आणि "रमा माधव' चित्रपट दिग्दर्शित केले होते. प्रसाद ओकने "कच्चा लिंबू'चे दिग्दर्शन केले होते.

"समुद्र' आणि "अलबत्या गलबत्या' नाटके चिन्मयने दिग्दर्शित केली आहेत. गणेश यादवनेही काही हिंदी नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. मृण्मयी देशपांडेने दिग्दर्शित केलेला "के सरा सरा' चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. "देऊळ बंद' चित्रपट प्रवीण तरडेने दिग्दर्शित केला होता. आता त्याचा दिग्दर्शक म्हणून "मूळशी पॅटर्न' चित्रपट येत आहे. "फर्जंद'मध्ये चिन्मय छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मृणाल कुलकर्णी जिजाऊंची भूमिका साकारत आहे. मृण्मयीने केसरची भूमिका केली आहे. तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत गणेश यादव आहे. प्रसाद ओक बहिर्जी नाईकांची भूमिका करतोय. प्रवीण तरडे मार्त्या रामोशीच्या भूमिकेत आहे. 

अनोख्या योगाबाबत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर म्हणाले की, एका मराठी चित्रपटात सहा दिग्दर्शकांनी अभिनय करण्याची पहिलीच घटना आहे. सर्वांनी माझ्यावर विश्‍वास टाकला आणि चांगले सहकार्य केले. प्रत्येकाशी कोणत्या ना कोणत्या कारणाने याआधी संबंध आलेला होता. त्यामुळे आम्ही सर्व एकत्रित येऊ शकलो.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 6 directors in one film farjand