बाणावर खोचलेल्या प्रेमाची कहाणी रूपेरी पडद्यावर

टीम ई सकाळ
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

प्रेम कर भिल्लासारखं..बाणावरती खोचलेलं..मातीमध्ये उगवून सुद्धा..मेघापर्यंत पोहोचलेलं.... कवी कुसुमाग्रज यांच्या या कवितेसारखं खरंच आज कुणी प्रेम करतं का? तर उत्तर आहे हो. मग तुम्ही म्हणाल आम्हाला कसं माहित नाही. कारण ते एका सामान्य मुलाचं प्रेम आहे, जे आता तुम्हाला आरती- द अननोन स्टोरी या मराठी सिनेमातून बघायला मिळणार आहे. सत्य घटनेवर आधारित या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन सारिका महेश मेने यांनी केली आहे. १८ ऑगस्ट पासून हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

मुंबई : प्रेम कर भिल्लासारखं..बाणावरती खोचलेलं..मातीमध्ये उगवून सुद्धा..मेघापर्यंत पोहोचलेलं.... कवी कुसुमाग्रज यांच्या या कवितेसारखं खरंच आज कुणी प्रेम करतं का? तर उत्तर आहे हो. मग तुम्ही म्हणाल आम्हाला कसं माहित नाही. कारण ते एका सामान्य मुलाचं प्रेम आहे, जे आता तुम्हाला आरती- द अननोन स्टोरी या मराठी सिनेमातून बघायला मिळणार आहे. सत्य घटनेवर आधारित या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन सारिका महेश मेने यांनी केली आहे. १८ ऑगस्ट पासून हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

२००६ मध्ये एका मुलाच्या मैत्रिंणीचा ग्रुप उत्तनला फिरायला गेला होता आणि तिथेच त्याच्या प्रेयसीचा अपघात झाला. अपघातात तिचा रक्तस्त्राव अधिक झाल्याने ती कोमात गेली मग तिला जसलोक रुग्णालयात भरती करावे लागले. तिचे आई वडील विभक्त असल्याने तिची सुश्रुषा करायला विशेष असे कुणी नव्हते पण तिचा प्रियकर सर्व सोडून सलग अडीच वर्ष तिच्या बेडशेजारी बसून तिची सुश्रुषा करत होता. या अडीच वर्षात त्याने कधीच स्वतःचा विचार केला नाही. फक्त आणि फक्त आपल्या प्रेमाची कमीटमेंट पूर्ण करत होता. हिंदीच्या ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांनी त्यावेळी त्यांच्या संस्थेअंतर्गत खूप सहकार्य केले. ती मुलगी कोमातून बाहेर आली, तिला घरी नेण्यात आले आणि घरी देखील एखाद्या लहान बाळाप्रमाणे तो तिची देखभाल करत होता. पुढे निमोनियाच्या आजाराने ती दगावली. पण त्या मुलाने पुढे वहिदा रहमान यांच्या संस्थेतून अशा मुलांची सेवा करण्याचे व्रत अंगिकारले. अशा प्रकारे त्याने आपले प्रेम निभावले. हे सर्व तुम्हाला सिनेमाच्या गोष्टीप्रमाणे वाटले असेल ना? पण ही सत्य घटना आहे यावरच हा सिनेमा बेतला आहे.  

सिनेमात रोषण विचारे त्या मुलाच्या भूमिकेत आहे आणि त्या मुलीच्या म्हणजेच आरतीच्या भूमिकेत अंकिता भोईर आहे. सोबत उमेश दामले, कांचन पगारे, सुजित यादव, तेजस बने, सुप्रीत वर्मा, मेघाली जुवेकर, प्रियंका करंदीकर, राधिका देशपांडे, सपना कारंडे, आरजे रिया, आशुतोष दीक्षित आणि तृप्ती गायकवाड यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत.
सामान्य  मुलाची ही असामान्य प्रेमकथा रुपेरी पडद्यावर आणण्याचा हा प्रयत्न खुद्द त्याची बहिण  अर्थात सिनेमाच्या लेखिका, दिग्दर्शिका आणि निर्मात्या सारिका मेने यांनी केला आहे. यावर सिनेमा करणे तेवढे सोपे नव्हते सिनेमाची कोणतीही पार्श्वभूमी नसतांना हे धाडस त्यांनी लिलया पेललं आहे. जग हे सकारात्मक आहे, फक्त आपला बघण्याचा दृष्टीकोन हा सकारात्मक हवा हेच त्यांना या सिनेमातून सांगायचे आहे. याचा सिनेमा करतांना त्याची गाणी देखील साधी असावी या हेतूने सर्व गाणी साधी सोपी ठेवण्यात आली आहे.

आजवर आपण मोठ्या लोकांचे बायोपिक बघितले असणार परंतु कधीच सामान्य लोकांचे असामान्य प्रयत्न, गोष्टी आपल्याला बघायला मिळत नाही म्हणून हा थोडा वेगळा सिनेमा आहे असे मत दिग्दर्शिका सारिका मेने यांनी व्यक्त केले आहे. विशेष बाब म्हणजे सिनेमा करण्यासाठी त्यांनी आपली नोकरी देखील सोडली आहे. उद्देश हाच कि खऱ्या प्रेमाची व्याख्या काय असते ते जगासमोर यावे म्हणून.

Web Title: aarati new movie marathi essakal news