अभिनयातला वीरम कुणाल 

तेजल गावडे
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

"रंग दे बसंती' ते "डिअर जिंदगी' प्रत्येक सिनेमात आपल्या अभिनयाची वेगळी छवी दाखवणारा अभिनेता कुणाल कपूर. त्याचा रॉयल लूक असलेला चित्रपट "वीरम' लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर त्याचा "व्हाईट शर्ट' हा लघुपट सध्या यू-ट्युबवर ट्रेडिंगमध्ये आहे. यात कुणाल कपूर अविक नावाच्या मुख्य भूमिकेत आहे. त्यानिमित्ताने त्याच्याशी केलेली ही बातचीत... 

"रंग दे बसंती' ते "डिअर जिंदगी' प्रत्येक सिनेमात आपल्या अभिनयाची वेगळी छवी दाखवणारा अभिनेता कुणाल कपूर. त्याचा रॉयल लूक असलेला चित्रपट "वीरम' लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर त्याचा "व्हाईट शर्ट' हा लघुपट सध्या यू-ट्युबवर ट्रेडिंगमध्ये आहे. यात कुणाल कपूर अविक नावाच्या मुख्य भूमिकेत आहे. त्यानिमित्ताने त्याच्याशी केलेली ही बातचीत... 

आगामी चित्रपट "वीरम'बद्दल थोडक्‍यात सांग. 
- हा खूप वेगळा चित्रपट आहे. आतापर्यंत मी कधीच असा चित्रपट आणि अशा प्रकारची भूमिका केली नव्हती. यात मी योद्‌ध्याच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्यांदाच मला ऍक्‍शन चित्रपटात काम करण्याची संधी मिळते आहे आणि ऍण्टी हिरोचा रोल साकारायला मिळतो आहे. ही फारच वेगळी भूमिका आहे. 

चित्रपटातील लूकवर मेहनत... 
- या भूमिकेसाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली. शारीरिकदृष्ट्या मला माझ्यात खूप बदल करावा लागला. बारा ते तेरा किलो वजन वाढवावं लागलं. तो एक योद्धा आहे; तर त्याची शरीरयष्टी दणकट व भारदस्त वाटली पाहिजे. त्यामुळे पाच ते सहा महिने खूप मेहनत घ्यावी लागली. यासाठी मी जिममध्ये गेलो. डाएट केलं आणि त्याचसोबत मार्शल आर्टसचा प्रकार कलारीपयट्टूचे धडे गिरविले. 

"वीरम'चा अनुभव... 
- खूप छान व इंटरेस्टिंग अनुभव होता. "वीरम' आम्ही मल्याळम, हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषेत चित्रीत केला आहे. प्रत्येक सीन मी तीन वेळा केला आहे. असं मी पहिल्यांदाच केलंय. या सिनेमाच्या बाबतीत खूपच उत्सुक आहे. कारण हा चित्रपट फक्त केरळातच प्रदर्शित होणार नाही; तर भारतात आणि जगभरात इंग्रजीत रिलीज होणारेय. या चित्रपटाच्या रिलीजची आणि याला लोकांच्या कशा प्रतिक्रिया मिळताहेत, याची मी वाट पाहतोय. 

चित्रपट व भूमिकांची जाणीवपूर्वक निवड 
- हो. चित्रपट निवडताना खूप गोष्टी असतात. एकाच गोष्टीला प्राधान्य देऊन चित्रपटाची निवड करता येत नाही. कथा व पटकथा चांगली आहे की नाही, ज्या लोकांसोबत काम करायचंय ते कसे आहेत आणि जी भूमिका साकारायची आहे ती कशी लिहिली आहे? मी यापूर्वी तसा रोल साकारला आहे की नाही? या सर्व बाबी महत्त्वाच्या असतात. 

''व्हाईट शर्ट' लघुपट 
- हल्ली खूप लघुपट बनत आहेत. मात्र व्हाईट शर्टसारखा लघुपट आतापर्यंत बनलेला नाही. यात रिलेशनशिप ड्रामा आहे. त्यामुळे ही कथा मला खूप आवडली. शॉर्टफिल्म हे माध्यम हल्ली खूप इंटरेस्टिंग होतंय. त्यात व्हाईट शर्टसारखी गोष्ट आतापर्यंत लघुपटाच्या माध्यमातून कोणीही सांगण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे मला हा लघुपट खूप मनोरंजक वाटला. दुसरं म्हणजे यातील अविक हे पात्र मला फार जवळचं वाटलं. कारण आपण सगळे नातेसंबंधाच्या गुंत्यामध्ये कधी ना कधी सापडतो आणि सगळ्याच प्रेमकथांचा शेवट आनंदी नसतो. ही गोष्ट खऱ्याखुऱ्या आयुष्यात घडणारी आहे. आजच्या पिढीला ही शॉर्ट फिल्म नक्कीच आपलीशी वाटेल. 

सक्षम डिजिटल माध्यम 
- हो. डिजिटल माध्यमं सक्षम आहेत. ही खूप चांगली बाब आहे. शॉर्ट फिल्म आणि वेबसिरीज आजच्या काळातली प्रभावी माध्यमं आहेत. त्यांचा योग्य प्रकारे वापर केला पाहिजे. अनेक चांगले लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते या माध्यमाकडे वळताहेत, ही चांगली गोष्ट आहे. 

Web Title: Acting viram kunal kapoor