अभिनेता अशोक सराफ यांचे सिनेसृष्टीतील 50 वर्ष ‘सम्राट सराफ’ सप्ताहाने होणार साजरे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

‘सम्राट सराफ’ 24 ते 30 सप्टेंबर असा सप्ताह चालणार असून 24 ते 29 सप्टेंबर या कालावधीत रोज दुपारी 3 वाजता अशोक सराफ यांचे ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘घायाळ’, ‘आई नं. 1’, ‘एकापेक्षा एक’, ‘गुलछडी’ हे चित्रपट प्रेक्षक पाहू शकणार आहेत.

गेली 49 वर्षं सिनेप्रेमींचं मनोरंजन करणारे अशोक सराफ यंदा व्यावसायिक क्षेत्रातल्या 50 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. आपल्या एकापेक्षा एक चित्रपटांनी प्रेक्षकांना कधी हसवणाऱ्या तर कधी प्रेक्षकांचा थरकाप उडवणाऱ्या या अवलियाच्या योगदानाला सलाम करत सोनी मराठीने अशोक सराफ सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 49 वर्षांची कामगिरी लक्षात घेता या सप्ताहाला ‘सम्राट सराफ’ हे नाव देण्यात आलं आहे. 

‘सम्राट सराफ’ 24 ते 30 सप्टेंबर असा सप्ताह चालणार असून 24 ते 29 सप्टेंबर या कालावधीत रोज दुपारी 3 वाजता अशोक सराफ यांचे ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘घायाळ’, ‘आई नं. 1’, ‘एकापेक्षा एक’, ‘गुलछडी’ हे चित्रपट प्रेक्षक पाहू शकणार आहेत.

Ashok Saraf

पोलिसांच्या संवेदना दर्शवणाऱ्या ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटाने सप्ताहाची सांगता होणार आहे. आजपर्यंत प्रेक्षकांसमोर एक तर पोलिसांची लाचखोरी किंवा त्यांचा जाच मांडला गेला आहे किंवा खूपच धीट अशा पोलिसांची कथा मांडली गेली आहे. मात्र पोलिसांच्या संवेदना आणि आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा परिणाम जसा सामान्य माणसांवर होतो, तसाच तो पोलिसांवरही होतो, समोरच्याचं दु:ख बघून सेंटी होणाऱ्या या पोलिसांची कथा ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटातून समीर पाटील या दिग्दर्शकानी मांडली आहे. 

मराठी प्रेक्षकांसाठी सुरू झालेल्या सोनी मराठी या नवीन वाहिनीवर या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर होणार आहे. वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियरची सुरवात ही गेली 49 वर्षं प्रेक्षकांशी अनोखं नातं जपणाऱ्या 'अशोकमामां'च्या ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटाने होणार आहे. या 49 वर्षांत अशोक सराफ यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. विनोदाचं अचूक मीटर जपणाऱ्या सराफ यांनी कित्येक संवाद अजरामर केले आहेत. त्यांनी साकारलेल्या भूमिकांसाठी संवादफेक करण्याची त्यांची शैली, आपल्या भूमिकेतलं वेगळेपण दाखवण्यासाठी घेतलेली मेहनत सगळंच अभूतपूर्व, या सगळ्यांचाच परिणाम की काय, आजही दार ठोकल्यावर धनंजय मानेंची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तर गमतीनी 'वॉख्खॅ, विख्खी, विख्खू' हेही सहज येतं. केवळ विनोदच नाही, तर अशोक यांनी साकारलेला खलनायकही तितकाच ताकदीचा होता. चतुरस्र अभिनेता म्हणून ओळख असणाऱ्या या ‘सम्राट सराफ’च्या चित्रपटांची मजा या सप्ताहानिमित्त घेता येईल. 

Ashok Saraf


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Ashok Sarafs fifty years of career will be celebrate as samrat saraf