
बॉलीवूडला हवा गोरा रंग त्यांच्याकडे नाही, रुप नाही. तरीही एखाद्या सिनेमात, वेब सीरिजमध्ये दिसला, तर तो लक्षातच राहतो. त्याचं नाव दिब्येंदू भट्टाचार्य. ''बॉलीवूड शब्दाला मी मनात नाही. प्रयोगशील आणि विचारांच्या मर्यादा ओलांडणारा भारतीय सिनेमा माझा आहे, असे म्हणणाऱ्या दिब्येंदूबरोबर केलेली ही बातचीत.
मुंबईतील बाँबस्फोटाचे सत्य सांगणाऱ्या ब्लॅक फ्रायडेमधील 'येडा याकूब', 'देव डी'मधील 'चुन्नी', अनदेखी या थ्रिलर वेबसीरिजचा डीसीपी बरुण घोष, मिर्झापूरमधील 'डॉक्टर' आणि क्रिमिनल जस्टसमधील क्रूर 'लायक तालुकदार', अशी अभिनय कौशल्याची व्यापक 'बँडविड्थ' अंगी असलेला दिब्येंदू भट्टाचार्य व्यक्तिगत जीवनात मात्र अत्यंत साधा आहे. ''कुणाचाही विचार हा कंजूष नसावा, नाहीतर तुमच्याकडून भव्य दिव्य असे काहीच घडणार नाही,'' या तत्त्वज्ञानावर त्याची वाटचाल सुरू आहे.
दिब्येंदू मूळचा कोलकात्याच्या. पण आता मी मुंबईकर आणि पुणेकरही असल्याचं तो सांगतो. त्याची सासुरवाडी पुण्याची आहे. मराठी संस्कृतीचे खाद्य पदार्थ हा त्याचा आवडीचा विषय. पुरणपोळी, बाजरीची भाकरी आणि मिरचीचा गावरान ठेचा ते वांग्याची रस्सेदार भाजी हे त्याचे 'विक पॉइंट.' गप्पांच्या ओघात कोकणी जेवणाची चवही त्याच्या जिभेवर तरळत राहते.
योगशील मराठी सिनेमावर निरतिशय प्रेम करणारा, भास्कर चंदावरकर यांच्याकडून विनयशीलता हा गुण आत्मसात केल्याचं अभिमानाने सांगणारा हा गुणी कलाकार लहान वयातच अभिनयाच्या प्रेमात पडला. त्याचा प्रवास सांगताना तो म्हणतो, "पुण्यातल्या मध्यमवर्गीय कुटुंबात आजही मुला मुलीला एखादी संगीत कला आली पाहिजे, असे मानतात. तसंच कोलकात्यातही आहे. त्यामुळं आमच्या घरात हार्मोनियम आणि तबला असतोच. कलेशी जोडण्याची ही प्रक्रिया घरातूनच झाली. प्रयाग संगीत समितीशी जोडला गेलो. संगीत प्रभाकर पूर्ण केलं. तबला सुरू झाला. काहीकाळ तबलावादन केले. नंतर रंगमंचावर पाय ठेवला आणि मी मला सापडलो.अभिनय हेच माझं 'आध्यात्म' असल्याची खात्री पटली.''
''कोलकात्यात बंगाली रंगभूमीवर नाटकं सुरू झाली. नुक्कड नाटक, पथ नाटक, अभिनय, दिग्दर्शन आणि बरंच काही, अशी खूप 'नाटकं' केली. त्यात 'आयपीटीए'ने 1993 मध्ये 'सर्वोत्तम' ठरविले होते. मात्र डॉक्टर, इंजिनियर होण्यासाठी शिक्षण घ्यावं लागतं, तसं अभिनयाचंही शिक्षण घ्यावं असं वाटू लागलं. मग 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'मध्ये प्रवेश झाला. 'एनएसडी'ने ऊर्जा आणि अभिनयाला गरज असलेली ताकद दिली. त्यानंतरही मला सिनेमासाठी मुंबईकडे वळावे कधीच वाटले नाही. रंगमंचावरच जीव रमत होता. म्हणून 'एनएसडी'च्या 'रिपेर्टरी'त तीन वर्षे काढले. मग वाटू लागले की नाटक खूप झाले, आता सिनेमाच्या पडदा अनुभवला पाहिजे. ते एक स्वत:ला सिद्ध करण्याचं सशक्त माध्यम आहे. म्हणून तिथे प्रवेश केला.
मला तिथेही कधी '100 कोटी' श्रेणीतल्या सिनेमाचं आकर्षण नव्हते. प्रयोगशील, वास्तववादी आणि हिंदी सिनेमाची 'टेस्ट' बदलणाऱ्या कथांचे मला अधिक आकर्षण होते. म्हणूनच मॉन्सून वेडिंग, अब तक 56 सारखे चित्रपट केले. भूमिका छोटी असली, तरी चालेल; पण ती प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली पाहिजे, अशाच भूमिका करत गेलो. सिनेमात तुम्हाला किती फुटेज मिळते, यापेक्षा तुम्ही प्रेक्षकांशी किती 'कनेक्ट' होता, हे मला अधिक महत्त्वाचे वाटते. मला पैशांचं कधी आकर्षण राहिले नाही. त्यामागं कधी धावलो नाही. आपण आपलं काम चोखपणे करावं. प्रतिष्ठा, पैसा या गोष्टी आपोआप मागे येतात, असं मी मानतो.
''मी 'बॉलीवूड'ला या शब्दाला मानत नाही, भारतीय सिनेमा माझा आहे. मी अस्सल देशी मातीच्या रंगाचा आहे. म्हणून 'करण जोहर', 'आदित्य चोप्रा' मला कधी बोलवेल आणि काम करेल, याची वाट पाहात नाही. त्यामुळं माझ्या वाटेत 'नेपोटिझम', 'फेव्हरेटिझम' यांचा अडसर नाही. माझ्याकडे कला आहे, 'क्राफ्ट' तेच माझे आहे, तेच बलस्थान आहे. मनात, शरीरात अभिनय आहे, कपट नाही. बॉलिवूडला हवं असलेलं कुण्या 'बड्या' कलाकाराचं 'क्लोन' देखील आम्ही नाही, कुणासारखे दिसतही नाही. आम्ही 'युनिक' आहोत. म्हणूनच माझ्यासारख्या अनेक प्रयोगशील कलाकारांचा अभिनय लोकांना भावतो. भारतीय सिनेमा आमचा आहे. त्यामुळं बॉलिवूड पुरतं स्वत:ला मर्यादित करून घेतलेलं नाही. त्यामुळं मराठी, हिंदी, तमीळ, तेलगू आणि कोणत्याही भाषेतील, तसंच जागतिक स्तरावर कोणत्याही भाषेतील चित्रपटात काम करू शकेल आणि करील.''
मला वाटते की, ''बॉलिवूडमध्ये नेपोटिझम, फेव्हरेटिझम हे राहणारच आहे. कारण तिथं घराणी आहेत. ते घरातल्या मुलाला किंवा मुलीला पदार्पणासाठी प्राधान्य देणारच आहेत. यामुळे कुणी निराश होणार असेल, तर त्याने बॉलिवूडमध्ये थांबू नये. अभिनयातून स्वत:ला सिद्ध करता येत नसेल, तर दुसरे काम करावे. कुठेही संघर्ष करावाच लागतो. या जगात लगेचच कुणीच मोठे झालेले नाही. कष्ट आणि कामाप्रती निष्ठा ही हवीच. त्यात सातत्य ठेवले, तरच जग तुम्हाला ओळखू लागते.''
मोठा पडदाही बदलेल
ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या वेब सीरिजने प्रेक्षकांचे आयुष्य व्यापून टाकलेले आहे, त्याच्या भवितव्याबाबत दिब्येंदू म्हणतो, "भारतील लोकांना आता खरा सिनेमा समजू लागला आहे. ओटीटी हा सिनेमा दाखवत आहे. विशेष म्हणजे त्याला सेन्सरशीप नाही. त्यामुळं त्यावरील सिनेमा वास्तवाच्या खूप जवळ गेला आहे. दुसरे म्हणजे सिनेमा रिलीज करण्यासाठी व्यवस्था निश्चित आहे. दीडशे देशांत एकाच वेळी तो प्रदर्शित करता येतो. त्यावर जास्त खर्चही करावा लागत नाही. म्हणूनच वेबसीरिजमधून प्रचंड प्रमाणात वास्तवाने भरलेला कंटेट दिला जातो आहे. प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरत आहे. त्यामुळे ओटीटीवरील कंटेंट; मग तो कोणत्याही भाषेत असू दे, त्याचा प्रेक्षकवर्ग वाढतच राहील. कारण यात गोष्ट सांगण्याची पद्धत वेगळी आहे. ती सविस्तर सांगितली जातो. ती मांडायला तेवढा वेळही मिळतो. सिनेमा मात्र दोन तासात बसवायचा असतो. पण वेब सीरिजवर पाहिला जाणाऱ्या कंटेंटचा विचार केला, तर आता मोठ्या पडद्यालाही बदलावेच लागेल. केवळ कथांचे प्लॉट बदलून, त्याची वेष्टनं बदलून काहीही प्रेक्षकांच्या माथी आता मारता येणार नाही. आता मुख्यस्रोतामधील सिनेमालाही प्रयोग करावेच लागतील, त्याशिवाय पर्याय नाही. आजचा तरुण हे चित्र बदलेल. कारण अफाट बुद्धिमत्ता आणि क्षमता त्यांच्याकडे आहे, त्यांच्या विचारांना मर्यादा नाही, कल्पकता खूप आहे, हेच तरुण मोठ्या पडद्याला बदलून टाकतील. अशाच कलाकारांबरोबर मला काम करायचे आहे.''
''मला फक्त प्रसिद्धी नकोय. प्रत्येक पात्राला न्याय द्यायचा आहे. भले ज्यांच्याकडे पैसा कमी असेल, पण विचारांची कंजुषी न करता, विचारांच्या मर्यादा ओलांडणारे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्याबरोबर काम करणे मी जास्त पसंत करतो. अनेक कलाकार याच विचारांचे आहेत. म्हणूनच चांगला अभिनय, चांगला कंटेंट त्यांना पाहायला मिळू लागला आहे. ही फक्त सुरवात आहे. यापेक्षाही अधिक चांगले यापुढील काळात आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओटीटीमुळे गुणी कलाकारांना जोखले जाऊ लागले आहे. ज्यांना मोठ्या पडद्याने मर्यादित स्वरुपात वापरले, त्यांना महत्वाचे रोलही मिळू लागले आहेत, आमच्या कष्टाचे चीज आता होऊ लागले आहे.
अजित पवारांचे 'कमबॅक'; कोरोना आणि विश्रांतीनंतर पु्न्हा कामाचा धडाका!