फुटबॉल मॅचच्या नावावर जायचो शुटींगला

संभाजी गंडमाळे
बुधवार, 15 मे 2019

चित्रकलेत रमलो; पण अभिनयाची आवड गप्प बसू देत नव्हती. घरातून तर या गोष्टीसाठी प्रचंड विरोध. मग, फुटबॉलच्या मॅचला जातो म्हणून घरातून बाहेर पडायचो आणि शूटिंगला जायचो. एके दिवशी रवींद्र महाजनी यांच्याबरोबरचा फोटो वृत्तपत्रात आला आणि अखेर माझं बिंग फुटलं. मात्र, मी पुढं याच क्षेत्रात करिअर करायचा निर्णय घेतला.

- अभिनेता प्रमोद शिंदे

माझं शिक्षण शहाजी कॉलेज आणि त्यानंतर दळवीज्‌ आर्टस्‌ इन्स्टिट्यूटमध्ये ‘जीडी आर्ट’ही केलं. चित्रकलेत रमलो; पण अभिनयाची आवड गप्प बसू देत नव्हती. घरातून तर या गोष्टीसाठी प्रचंड विरोध. मग, फुटबॉलच्या मॅचला जातो म्हणून घरातून बाहेर पडायचो आणि शूटिंगला जायचो. एके दिवशी रवींद्र महाजनी यांच्याबरोबरचा फोटो वृत्तपत्रात आला आणि अखेर माझं बिंग फुटलं. मात्र, मी पुढं याच क्षेत्रात करिअर करायचा निर्णय घेतला... अभिनेता प्रमोद शिंदे संवाद साधत असतात आणि ब्लॅक-व्हाईट ते रंगीत चित्रपटांचा प्रवासही उलगडत जातात.  

दक्षिणेतील एक निर्माते मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. त्याची सध्या तयारी सुरू असून, स्क्रिप्टवर काम सुरू आहे. संगीतावर आधारित हा चित्रपट असून, लेखन माझेच आहे.
- प्रमोद शिंदे

शिंदे यांचा पहिला चित्रपट ‘ठिणगी’. हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट. त्यामुळं लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ त्यांना ‘ब्लॅक अँड व्हाईट’ जमान्यातला हिरो म्हणून चिडवायचे, अशी आठवणही ते सांगतात. ‘माहेरची माणसं’, ‘बहुरूपी’, ‘पूर्णसत्य’, ‘मंगळसूत्र’, ‘आंधळा साक्षीदार’, ‘हिंदकेसरी’ आदी ऐंशीहून अधिक मराठी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या.

‘पूर्णसत्य’ या चित्रपटाला चोवीसाव्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात पुरस्कारानं गौरवण्यात आलं तर ‘आंधळा साक्षीदार’ या चित्रपटाला छत्तीसाव्या चित्रपट महोत्सवात तीन पुरस्कार मिळाले. निर्माता व दिग्दर्शक म्हणून त्यांनी ‘काल रात्री बारा वाजता’, ‘भाऊबीज’, ‘भूक’ या कलाकृती साकारल्या. ‘काल रात्री बारा वाजता’ या चित्रपटाला शासनाचे चार पुरस्कार मिळाले. ‘सूत्रधार’ या चित्रपटात नाना पाटेकर आणि स्मिता पाटील यांच्याबरोबर त्यांनी काम केलं. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. स. खांडेकर यांच्या साहित्यकृतीवर आधारित ‘अमृतवेल’, ‘संजीवनी’, ‘आई’, ‘गावू त्यांना आरती’ या मालिकांसह ‘डार्लिंग डार्लिंग’, ‘चोर सोडून संन्यासी’, ‘महाचालू कार्टी’ या नाटकातूनही त्यांनी भूमिका केल्या. 

शिंदे सांगतात, ‘‘पहिला चित्रपट १९८१ चा. त्यानंतर सुमारे तीन दशकं चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमातून आजही कार्यरत आहे. निर्माता व दिग्दर्शक म्हणूनही काम केल्याचे समाधान नक्कीच आहे.’’

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Pramod Shinde interview Amhi Kolhapuri