'सध्या तरी माझी डायरी फुल्ल...' : अभिनेता राजकुमार राव

संतोष भिंगार्डे
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

'न्यूटन', 'बरेली की बर्फी', 'शादी में जरूर आना' यांसारख्या यशस्वी चित्रपटांनंतर अभिनेता राजकुमार राव आता 'ओमेर्टा' या चित्रपटातून डार्कशेड भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यानिमित्ताने ही खास मुलाखत - 

  • एकापाठोपाठ एक यशस्वी चित्रपट दिल्यामुळे निर्मात्यांचा तुझ्यावरील विश्‍वास वाढलाय. एक ठराविक बजेट घेऊन निर्माते तुला साईन करत आहेत. तुला याबद्दल काय वाटतं? 

 

- ही गोष्ट निश्‍चित आहे. एक काळ असा होता, की निर्माते माझ्यावर पैसे लावायला काहीसे कचरत होते. कदाचित त्याला काही कारणं असतील. त्यांचा माझ्यावर तेव्हा विश्‍वास नसावा, असं मला वाटतं. परंतु आता अनेक निर्माते मला साईन करण्यासाठी उत्सुक आहेत. 'सिटीलाईट' वगैरे चित्रपटानंतर काहीसा फरक झाला आहे आणि 'न्यूटन'नंतर माझं सगळं जगच बदललं आहे. मात्र मी सगळ्यांबरोबर काम करण्यास तयार आहे. चांगली कथा आणि माझी भूमिका चांगली असलेले चित्रपट साईन करत आहे. सध्या तरी माझी डायरी फुल्ल झाली आहे. 

  •  हंसल मेहता यांचा 'ओमेर्टा' चित्रपट तू कधी स्वीकारलास? 

- जेव्हा माझ्या 'शाहीद' चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं, तेव्हा या चित्रपटाची पटकथा मला वाचायला मिळाली. तेव्हा दुसरा कुणी तरी कलाकार या चित्रपटात काम करणार होता. परंतु नंतर काय झालं ते मला माहीत नाही. हंसल मेहता यांनी मला ही कथा ऐकवली. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे, यामध्ये मी एका आतंकवाद्याची भूमिका साकारत आहे. कंदार विमान हायजॅक करणाऱ्या दहशतवादी ओमर सईद शेखची भूमिका साकारत आहे. 

Rajkumar Rao

  •  एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे आणि त्यातच मुस्लिम व्यक्तिरेखा. त्यामुळे होमवर्क किती करावा लागला? 

- सत्य घटनेवर आधारित चित्रपट असल्यामुळे त्यामध्ये तुम्ही गिमिक्‍सचा वापर करू शकत नाही. हंसल मेहता यांनी याची पुरेपूर काळजी घेतली आहे. शिवाय भूमिका कोणतीही असली तरी तिची पूर्वतयारी ही करावीच लागते. ती व्यक्ती कशी बोलेल...तिची बॉडी लॅंग्वेज कशी असेल... या सगळ्याचं निरीक्षण करावं लागतं. उमर शेखबद्दल ऐकलेलं होतं. त्याबाबतीत 'अ माईटी हार्ट' हा चित्रपट आलेला होता. तो पाहिला आणि ही भूमिका साकारली. या चित्रपटात आम्ही एका दहशतवाद्याची कथा दाखवली आहे. तो दहशतवादी मुस्लिम होता एवढेच. यापूर्वी "शाहीद' या चित्रपटात मी मुस्लिम व्यक्तिरेखा साकारली होती. तो चित्रपटही सत्य घटनेवर आधारित होता. या दोन्ही भूमिका भिन्न टोकाच्या आहेत. 

Rajkumar Rao

  •  हंसल मेहता यांच्याबरोबर तुझी ही चौथी फिल्म आहे. त्यांच्याबरोबर तुझी केमिस्ट्री चांगलीच जुळलीय. त्याबद्दल तू काय सांगशील? 

- कलाकार आणि दिग्दर्शक यांची केमिस्ट्री चांगली जुळलेली असली की त्याचा फायदा चित्रपटाला अधिक होतो हे नक्की. कारण विचारांची देवाण-घेवाण चांगली होत असते. हंसल मेहता यांच्या कामाची पद्धत मला माहीत झाली आहे. त्यांना नेमकं माझ्याकडून काय हवं आहे, हे मला माहीत असतं. एखादा शॉट मी बरोबर दिला नाही हे मला त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की लगेच समजतं. मग पुन्हा तोच शॉट द्यावा लागतो. ते माझ्या वडिलांसारखे आहेत. हा चित्रपट संवेदनशील आहे आणि त्याची हाताळणी हंसल मेहता यांनी चांगली केली आहे. लंडन, लडाख, दिल्ली वगैरे ठिकाणी चित्रीकरण झालेलं आहे. 

  •  एकीकडे तू 'न्यूटन' करतोस; तर दुसरीकडे तू 'ओमेर्टा' करतोस. यातील कोणती भूमिका तुला सोपी वाटली? 

- 'न्यूटन'मधील. कारण ती भूमिका माझ्या वास्तव जीवनाशी मिळतीजुळती आहे. 'न्यूटन'ची आयडॉलॉजी आणि फिलॉसॉफी मला खूप भावते. प्रत्यक्ष जीवनात माझे ते प्रिन्सिपॉल आहेत. 'ओमेर्टा'मधील भूमिका डार्क आहे आणि ती साकारताना मला खूप त्रास झाला. 

Rajkumar Rao

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Rajkumar Raos Interview For Sakal