होय मी 'तिला' डेट करतोय : रणबीर कपूर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

'मला आयुष्यातला हा टप्पा खूप आवडतोय. प्रेमात नव्याने असताना नेहमीच एक्साईटमेंट असते.' : रणबीर कपूर

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूरचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं. कधी कतरिना कैफ तर कधी दीपिका पदुकोण, अवंतिका मलिक, सोनम कपूर, नर्गिस फाक्री, माहिरा खान...अशी अनेक नावं रणबीरच्या 'अफेअर्स लिस्ट'मध्ये होती. आपल्या रिलेशनशीपबद्दल उघडपणे बोलणं कायमच टाळणाऱ्या रणबीरनं अभिनेत्री आलिया भटसोबतच्या नात्याची कबुली मात्र दिली आहे.

'जीक्यू' मासिकाला दिलेल्या मुलाखतीत आलियाला डेट करत असल्याचं रणबीरनं मान्य केलं. 'हे खरंच सध्या नवीन आहे. त्यामुळे मला इतक्यात फार काही याबद्दल बोलायचं नाही. आमच्या नात्याला वेळ आणि स्पेस देण्याची गरज आहे. एक अभिनेत्री आणि माणूस म्हणून आलिया सळसळती आहे. जेव्हा मी तिला अभिनय करताना किंवा ऑफ स्क्रीन पाहतो, ती मला प्रोत्साहित करते. आमच्यासाठी हे नवीन आहे. हे नातं थोडं बहरु द्या' असं रणबीर म्हणाला.

'मला आयुष्यातला हा टप्पा खूप आवडतोय. प्रेमात नव्याने असताना नेहमीच एक्साईटमेंट असते. मला वाटतं मी सध्या खूप संतुलित आहे. रिलेशनशीप माझ्यासाठी खूप मौल्यवान असतात. दुखावलं जाणं काय असतं, याची मला कल्पना आहे. दोन वर्षांपूर्वी मी जसा होतो, त्यापेक्षा आता वेगळा आहे' असं रणबीरनं सांगितलं.

आलिया आणि रणबीर आगामी 'ब्रम्हास्त्र' चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. आलियाच्या 'राझी' चित्रपटातील भूमिकेचं कौतुक रणबीरने नुकत्याच एका मुलाखतीत केलं होतं. रणबीर आणि आलिया यांनी यापूर्वीही एकमेकांवर क्रश असल्याचं कबूल केलं होतं. मात्र पहिल्यांदाच रिलेशनशीपमध्ये असल्याचं आता जाहीर सांगितलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Ranbir Kapoor is dating Alia Bhatt