esakal | कोल्हापुरी टाळ्याच माझ्या अभिनयाची ऊर्जा
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापुरी टाळ्याच माझ्या अभिनयाची ऊर्जा

करवीर तालुक्‍यातील प्रत्येक विविध सोंगी भजन कार्यक्रमात रसिकांनी माझ्या एन्ट्रीला टाळ्या दिल्या. त्या प्रत्येक टाळीने दिलेल्या कोल्हापुरी उर्जेने मला चित्रपट- नाट्य- मालिका अशा चंदेरी दुनियेतील स्थान भक्कम करण्यास बळ दिले. अभिनेता संजय मोहिते कोल्हापूरविषयी भरभरून सांगू लागले.  

कोल्हापुरी टाळ्याच माझ्या अभिनयाची ऊर्जा

sakal_logo
By
शिवाजी यादव

आरे (ता. करवीर) येथे आजोबा सोंगी भजन म्हणायचे. त्यांच्याबरोबर जात होतो. भजनाची गोडी लागली. सोंगी भजनातील एक पात्र आले नव्हते, ते पात्र रंगविण्याची संधी मला आली. रोज भजन बघून पाठ झालेले संवाद माझ्या खास ठसकेबाज थाटात सादर केले. ‘नव पोरगं कस दमात बोलतंय’ असे म्हणत करवीर तालुक्‍यातील प्रत्येक विविध सोंगी भजन कार्यक्रमात रसिकांनी माझ्या एन्ट्रीला टाळ्या दिल्या. त्या प्रत्येक टाळीने दिलेल्या कोल्हापुरी उर्जेने मला चित्रपट- नाट्य- मालिका अशा चंदेरी दुनियेतील स्थान भक्कम करण्यास बळ दिले. अभिनेता संजय मोहिते कोल्हापूरविषयी भरभरून सांगू लागले.  

पुढे भजन नृत्यातून कलापथकात शंभर रुपये नाईटवर नृत्याची संधी लाभली नृत्य अभिनयाची गोडी वाढली आणि कोल्हापुरात आलो तस ‘सोकाजीराव टांगमारे’, ‘सासू ४२०’ व ‘कथा नाम्या जोग्याची’ या नाटकातील भूमिका मिळाल्या तसे केशवराव भोसले नाट्यगृहात हौशी रंगभूमीवर संजूच्या इंट्रीला टाळी हमखास मिळू लागली. ‘संजू, आपल्या घरातले कोणी या नाटक सिनेमात काम केलेले नाही अशा क्षेत्रात कशाला जातोस’ अशा शंकाकुशंका घरातून उपस्थित झाल्या. तरीही मला कोल्हापूरच्या रंगभमीवर टाळ्या खूणावत होत्या. म्हणून मी काम सुरू ठेवले. सोकाजीव मधील भूमिका एक दिवस अभिनेते भरत जाधव यांनी पाहीली त्यासोबत टाळ्याही अनुभवल्या.

त्यांनी अभिनेते दिग्दर्शक केदार शिंदे यांना माझे नाव सुचवले. पुढे लता नार्वेकरांनी ‘लोचा’ नाटकात पंचरंगी भूमिका सादर करण्याची संधी दिली. ते नाटकाला सर्वत्र हाऊसफुल्ल चालत होतं, नाशिकला प्रयोग असताना वडीलांच्या निधनाची बातमी आली. दुःख अनावर झाले तरीही प्रयोग सादर केला, थेट गाडीत बसून कोल्हापूर गाठले रात्री उशिरा अंत्यसंस्कार दिले. त्यावेळी सावरण्यासाठी पुन्हा धीर द्यायला कोल्हापूरचे कलावंत सहकारी प्रेक्षक पाठीशी उभे राहीले. 

मना पासून साकारलेली भूमिका, अचूक बेअरिंग, बिनचूक पाठांतराचे संवाद अशी तिन्ही गुणसुत्रे एकत्र आली तरच कोल्हापूरात टाळी हमखास पडते वर्षानुवर्षाच्या सादरीकरणातून कोल्हापूरच्या प्रेक्षकांनी मला शिकवले होते. त्याचा आधार घेत मी नाटक चित्रपटातील भूमिका साकारात गेलो त्याला प्रेक्षकांचा उंदड प्रतिसाद मिळत गेला. तस तब्बल ४५ मराठी चित्रपटात भूमिका केल्या. पाच मालिका, चार नाटकांतील भूमिका लाभल्या आणि ‘लोचा’ सारखे पंचरंगी व्यवसायिक रंगभूमीवरील नाटक यशस्वी करता आले.

या साऱ्यांच्या मागे उर्जा आहे ती कोल्हापूरच्या प्रेक्षकांनी पहिल्यांदा सोंगी भजनातील भूमिकापासून नाटकातील माझ्या भूमिकांना दिलेल्या टाळ्यांची दाद तिच माझ्या करियरची मार्गदर्शक बनली आहे. असे कोल्हापूर काळजात असल्याने कोणत्याही मंचावर हजारोच्या गर्दीला खिळून ठेवणारी उर्जा लाभते. मुखातून बाहेर पडणारे संवाद मला दाद मिळवून देतात. यामागे इथल्या मातीतील रसिकांच्या टाळ्यांची गुंज माझ्या मनात सतत नंदादिपा सारखी तेवत असते. म्हणून मला माझ्या कोल्हापूर विषयीचा आदर वाढतो. जातो तोच माझा श्‍वास आहे. या सर्व प्रवासात नृत्य दिग्दर्शक प्रकाश हिलगे, पोर्णिमा खटावकर, शाहीर रंगराव पाटील आदीचे मार्गदर्शन लाभले.    

loading image
go to top