Satish Kaushik Death: कौशिक मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण! पतीने हत्या केल्याचा महिलेचा खळबळजनक दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satish kaushik death suspicious Delhi Police recovers medicines from farmhouse

Satish Kaushik Death: कौशिक मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण! पतीने हत्या केल्याचा महिलेचा खळबळजनक दावा

चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. 66 वर्षीय सतीश कौशिक यांचे मंगळवार मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी एका महिलेने खळबळजनक दावा केला असल्याचं समोर आलं आहे.

आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहीतीनुसार, महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली की, तिच्या पतीने सतीश कौशिक यांची 15 कोटी रुपयांसाठी हत्या केली आहे. दिल्ली पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल केलेल्या तक्रारीमध्ये महिलेने हा दावा केला आहे. सतीश कौशिक दिलेले पैसे परत मागत होते, जे पती देऊ इच्छित नव्हते, असा आरोपही यावेळी त्या महिलेने केला आहे. कौशिकची हत्या पतीनेच औषध देऊन केली, असा आरोप महिलेने केला आहे.

तर याआधी शनिवारी, सतीश कौशिक यांच्या मृत्यूपूर्वी ज्या पार्टीत सहभागी झाले होते, त्या दिल्लीच्या फार्महाऊसमधून काही 'औषधे' जप्त केली असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीची प्रत पाहिल्यानंतर IANS वृत्तसंस्थने तिच्याशी संवाद साधला.

तिने ही पूर्वनियोजित हत्या असल्याचाही यावेळी आरोप केला आहे. महिलेने यावेळी सांगितले की तिने 13 मार्च 2019 रोजी त्या व्यावसायिकाशी लग्न केले. त्यानेच सतीश कौशिक यांच्याशी तिची ओळख करून दिली होती. सतीश कौशिक तिला भारत आणि दुबईमध्ये नियमित भेटत असे असंही तिने यावेळी सांगितले आहे.

तर 23 ऑगस्ट 2022 रोजी सतीश कौशिक दुबईतील तिच्या घरी आले होते. त्यांनी तिच्या पतीकडे 15 कोटी रुपयांची मागणी केली. तक्रारीत महिलेने म्हटले आहे की, “मी ड्रॉईंग रूममध्ये हजर होते जिथे कौशिक आणि माझे पती दोघांमध्ये वाद झाला. कौशिक म्हणत होते की मला पैशाची नितांत गरज आहे. पैसे देऊन तीन वर्षे झाली आहेत. कौशिक यांनी गुंतवणुकीसाठी माझ्या पतीला 15 कोटी रुपये दिले होते. मात्र, कौशिक म्हणत होते, की कोणतीही गुंतवणूक केली नाही किंवा त्यांचे पैसेही परत दिले नाहीत, त्यामुळे त्यांची फसवणूक केल्याचे ते बोलत होते.

दुबईतील एका पार्टीतला फोटो तिने शेयर केला आहे. त्यामध्ये बिझनेसमन आणि कौशिकचा सोबत दिसत आहेत. या पार्टीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा मुलगाही उपस्थित असल्याचा आरोप महिलेने केला आहे. तिचा पती अनेक प्रकारच्या ड्रग्जचा व्यवसाय करतो, असेही तक्रारीत म्हंटलं आहे.

तर दिलेल्या तक्रारीमध्ये महिलेने म्हंटलं आहे की, त्यानंतर मी कौशिकला माझ्या पतीला प्रॉमिसरी नोट दिल्याचे सांगताना ऐकले होते. कौशिकच्या मृत्यूची बातमी वाचली. मला दाट संशय आहे की माझ्या पतीनेच त्याच्या साथीदारांसोबत कट रचला आणि कौशिकला पैसे परत करावे लागू नयेत म्हणून त्याला गुंगीचे औषध पाजले असं त्या महिलेने आपल्या तक्रारीत म्हंटलं आहे. याबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

टॅग्स :policedelhi