कोल्हापूरनं शिकवली माणसातली माणुसकी!

संभाजी गंडमाळे
बुधवार, 24 एप्रिल 2019

नाटक, शूटिंगच्या निमित्तानं जेव्हा मी सतत बाहेर असतो. त्यावेळी मला सतत माझ्या पेठेनं, कोल्हापूरनं जपलेली माणसातली माणुसकी आठवत राहते. ती फारशी बाहेर कुठे दिसतच नाही.

- युवा अभिनेता सुमित सासने

मी शिवाजी पेठेतील मरगाई गल्लीतला. चौथीला असताना शाळेतील गॅदरिंगमध्ये सहभागी झालो आणि रंगमंचावरचं ते पहिल पदार्पण ठरलं. आता नाटक, दूरचित्रवाणी मालिका, लघुपट अशा विविध माध्यमातून यशाचा एकेक टप्पा पार करतो आहे. पण, नाटक, शूटिंगच्या निमित्तानं जेव्हा मी सतत बाहेर असतो. त्यावेळी मला सतत माझ्या पेठेनं, कोल्हापूरनं जपलेली माणसातली माणुसकी आठवत राहते. ती फारशी बाहेर कुठे दिसतच नाही...युवा अभिनेता सुमित सासने संवाद साधत असतो. त्यातून त्याचा प्रवास उलगडत जातो.

सुमितची शाळा रा. ना. सामाणी विद्यालय, एस. एम. लोहिया हायस्कूल. कॉमर्स कॉलेजला पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यानं मुंबई गाठली. मुंबई विद्यापीठात अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्टस्‌ विभागात दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नाटक हेच करिअर मानून तो मुंबईतच झपाटून काम करू लागला. कोल्हापुरात असताना सुगंध रंगकर्मी संस्थेचं अभिनय शिबिर, संतोष शिंदे, विकास पाटील आदींचं मार्गदर्शन आणि कॉलेजच्या माध्यमातून यूथ फेस्टिव्हल, सकाळ करंडक, उत्कर्ष अशा अनेक स्पर्धांतून त्यानं बक्षिसांची लयलूट केली.

प्रत्यय नाट्य संस्थेच्या ‘कबीर’, ‘राजा लियर’ ही नाटकंही केली. ज्येष्ठ अभिनेते डॉ. शरद भुताडिया, पवन खेबुडकर यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरलं. केवळ अभिनयच नव्हे तर सेट डिझाईन, दिग्दर्शन, मेकअप, वेशभूषा, प्रकाश योजना आदी तांत्रिक बाजूंच्या बाबतीतला अनुभवही अधिक समृद्ध होत गेला. फ्रान्सचे प्रसिद्ध दिग्दर्शक असिल रईस यांच्या दिग्दर्शनाखाली केलेला अभिनय असो किंवा पुरुषोत्तम बेर्डे यांच्यासोबत केलेलं ‘टूर टूर’ या नाटकानं एक वेगळाच आत्मविश्‍वास त्याला दिला. ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘महाराष्ट्र जागते रहो’ आदी मालिका केल्या आणि काही लघुपटही केले.

सुमित सांगतो, ‘‘सध्या विश्वास सोहोनी दिग्दर्शित ‘भूमिकन्या सीता’ या नाटकाच्या प्रयोगात व्यस्त आहे. रत्नाकर मतकरींच्या एका कथेवरही त्याचं काम सुरू आहे. लवकरच या नाटकाचे प्रयोगही सुरू होतील. आजवरच्या सात वर्षांच्या प्रवासात चौदा नाटकं केली असून, येत्या काळात रंगमंचावर बऱ्याच काही गोष्टी करायच्या आहेत.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Sumit Sasane interview in Amhi Kolhapuri